शनिवार, १७ जानेवारी, २०१५

रे तू कोण






जीवनाचा शोध घेवून
मन गेले आहे थकून
अनुत्तरीत प्रश्नामधून
प्राण गेला आहे पिंजून

तरीही प्रत्येक क्षणामधून
उमटत आहे एकच धून
विचारे जी फिरून फिरून
कोण कोण रे तू कोण

धडपडणारा एकच प्रश्न
उत्तर येती लाख कुठून
लाख बुडबुडे पाण्यामधून
येती अन जाती फुटून

परंतु अंतर दुगंभून
यावे वाटते ते न येवून
तेच उरी पिसाटलेपण
घेवून चाले अतृप्त जीवन


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

आपला रस्ता नि आपलेच पाय






पुन्हा कोसळलो
आदळलो खाली
खरचटलेली
जखम कण्हली

पुन्हा उसळलो
जरी होत लाही
कुठे जायचे ते   
कळलेच नाही

स्वप्न सजविले
हिम पांघरले   
परंतु मातीत
मन अडकले

असे कुणाचे
भाग्य थोरले
पावसात जे
वाहून गेले

आणि शेवटी  
उरले ते काय
आपला रस्ता नि
आपलेच पाय

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १४ जानेवारी, २०१५

सहाऱ्यातील चंद्र





गौर तनुवर
वस्त्र अबोली
चंद्रकोर अन
गोऱ्या भाळी

गाली सौम्य
कोवळ लाली
ओठ जसे की
गुलाब पाकळी

डोळ्या मध्ये
ताम्र वर्ण तो
सहाऱ्यातील
चंद्र भासतो

मुद्रा मोहक
जादू भरली
मूर्त तुझ्या
या रूपातली

पाहून कविता
माझी बहरली
शब्द तोकडे  
दाटी झाली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

असमाधान






असमाधान..
सतत अस्तित्वमान
अतृप्ती गतिमान
अधिक अधिक अधिकाधिक
उदंड पिकते आहे पिक
एकेक दाणा रुजवून पुन्हा
उगवणारा रुजतो दाणा
आज नाही तर उद्यातरी
करिता करिता जन्मभरी
संपून व्यापून जीवनमान
केवळ उरते असमाधान

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...