शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

प्रेम फक्त देहाचे ??






जर माझ्या ओठातून
तुझे गीत येवू लागले
तर शिवून टाक त्यांना
चांभाराच्या दाभणीने
चामड्याच्या वादीने 
 
जर माझ्या डोळ्यातून
तुझे प्रेम पाझरू लागले
तर खाचा कर त्यांच्या
काट्यांनी टोचून  
दे अंधारात लोटून 
 
अन हात लिहू लागले
शब्द तुजवरती पुन्हा
ठेचून टाक त्यांना
निर्दयपणे दगडांने
कलम कर वा
धारधार शस्त्राने
 
पण मला माहित आहे
एवढे सारे करूनही
प्रतिमा तुझी या मनातील
तू कधीच नष्ट
करू शकणार नाहीस 
 
माझे अंध डोळेही
तुझेच नाव घेत राहतील
अन शिवलेल्या ओठातून
तुझेच नाव उमटत राहील
माझ्या देहाच्या कंपणात
तुझेच स्पंदन राहील
अन ठेचाललेली बोटे
तुझेच चित्र रेखाटतील
प्रेम फक्त देहाचे
देहावरच असते
समज तुझे
सारेच खोटे ठरतील 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



तिचा हात...










मी चाललो होतो
कधी त्याच परिचित तर
कधी अपरिचित रस्त्यानं
सुखाची वळणं घेत
दु;खाचे खड्डे टाळत
कधी धडपडत
कधी चकित होत
सोबत ती असेलच
हे मनी गृहीत धरत
अन कदाचित
सुटला जरी तिचा हात
तरी ती येईलच
अन पकडेल माझा हात
ही खात्री मनी बाळगत
पण
त्या एका वळणानंतर
तिने दिला नकार
चालण्यास माझ्याबरोबर
अन फिरवली पाठ
माझी प्रत्येक विनंती नाकारत
धरली तिची वेगळी वाट
एकटेपणाच्या व्याकुळतेनं
मी भांबावलो,
थांबलो तिथेच बराच काळ
त्या रस्त्यात
तिची वेड्यागत वाट पाहत
ती अगदी नक्की येणार नाही
हे कळून चुकल्यावरही  
अविश्वासानं ..
हे स्वप्न असावं
अशी प्रार्थना करीत
अन शेवटी निरुपायाने
आता आपल्याला
एकटयालाच चालायचं आहे
हे मनाला समजावत
नेवू लागलो बळेच खेचत
पण मन माघार घेत नव्हत
त्याला अजूनही आशा होती
पण ती तिची नव्हती...
हे मात्र नक्की !!

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४

मेणे लाथाडत आहे





ती सुखाचे ओढून वस्त्र
बेभान अशी नाचत आहे
खदखदणारे दु:ख अंतरी
नाद पावूली उमटत आहे

हास्य ओठी बेफिकीरसे
दावी जगण्यात मस्त आहे
एकेक आठवण त्याची पण
तिच्या मना उकरत आहे

कधी रेशमी मिठी फुलांची 
ओठ अंगार आठवत आहे
तनमन अर्पण केले त्याला
रात्र अजुन ती सलत आहे

लंपट भोगी असतात पुरुष
गाठ मनाशी बांधत आहे
आणि समोर येताच मेणे
कठोर ती लाथाडत आहे .


   विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...