गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

दु:ख हवेय मज






बेभान उद्दाम
भोवऱ्यामधले
पाणी संथ
होत होते

अंग तळाचे
हलकेच अन
डोळ्यांना
दिसत होते

भलतेच असे    
तिथे काही
जणू आज
घडत होते

अंगारावर
थर पांढरे
राखेचे
जमत होते  

रे दु:ख
हवेय मज
गढूळ हिरवट
धगधग जी  
जाळील सतत

पुन्हा ढवळले
कडवट अंतर
तिरसट कुत्सीत
काढीत उत्तर

पुन्हा डिवचला
मवाळ अंगार
ठिणग्या घेतल्या
अन अंगावर

त्याचं ओल्या
दुखऱ्या जखमी
मीठ घातले
कठोर होवुनी

सन्न वेदना
देही भिनली
तना मनाला  
चिरत गेली

हेच आहे
माझे जगणे
रात्रंदिनी उरी
तडफडणे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०१४

तू फक्त प्रेम कर






वेडी आशा बाळगत
स्वप्न सोनेरी पाहत
तू फक्त प्रेम कर
प्रेमासाठी प्रेम कर

जन्मभर भटकू नकोस
वारा खुळा होवू नकोस
जीव जडव असा कुणावर  
सारे काही लाव पणावर

फक्त तिचा विचार कर
तिच्याशीच मैत्री कर
उगा लांबवर राहू नको
मनात मांडे खाऊ नको  
शब्दामधून शब्दावाचून
तिला येवू देत प्रेम कळून

प्रेम नको फक्त चेहऱ्यावर  
आत्म्यावरही प्रेम कर
आत्मा वगैरे ना कळले तर
प्रेम कर तिच्या मनावर
मन म्हणजे गुणावगुण
स्वीकार सारा मनापासून
    
अन कदाचित कळल्यावाचून
प्रेम बीज जर गेले मरून
दुख जपून मनात ठेवून
जा शोध जा नवी जमीन
पुन्हा पेर पाणी घाल
धीर धर जावू दे काळ
अलगद प्रेम येता रुजून
जीवापाड ठेव जपून

तिथे घाई चालत नाही
अरे तो बाजार नाही
सुरामध्ये भिजल्यावाचून  
गाणे कसे येईल कळून
जेव्हा तुला प्रेम मिळेल
जन्म खराखुरा कळेल
    

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०१४

वळू आणि मी






आज काल मला
फार हेवा वाटतो
तुझ्या हाताखाली
काम करणाऱ्या
त्या वळूचा..
काय नशीब
आहे लेकाचं
सारखा तुझ्याभवती
फिरत असतो
तसा मला त्याचा
फार रागही येतो
जेव्हा ,
तुझं लक्ष नसतांना
तुझ्यावरून तो
तशी नजर फिरवतो
तेव्हा..
तू म्हणतेस,
किती नजरांना
थोपवशील तू असा
अन मी पुन्हा
तपासून पाहू लागतो
माझी नजर
तुझ्यावरची

विक्रांत प्रभाकर


ये कॉफीला





येईल ती
येणार नाही
डोळ्यात वाट
अंथरलेली
खटखट कानी
धकधक मनी
प्रत्येक चाहूल
व्यर्थ गेली
कितीवेळा
मोबाईलवर
काढून नंबर
बंद केला
असेल का ती
येईल का ती
म्हणेल काय ती
प्रश्न पडला
आणि तरीही
फोन लावता
प्रश्न ऑफिसचा
काही काढला
ये कॉफीला
पण ओठातून
शब्द न आला

विक्रांत प्रभाकर


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...