सोमवार, १७ नोव्हेंबर, २०१४

तुझ्यामध्ये माझेपण







तूच माझे दु;ख आहे
चांदण्यात पेटलेले
तूच माझे सुख आहे
आकाशाला भिडलेले ||

तुझ्यामुळे अस्तित्व हे
मुक्त असे आकारले
तझ्या विना होईल ते
शून्य सारे भांबावले ||

तुझ्यामध्ये माझेपण 
काठोकाठ सामावले  
पेटलेल्या धुनीतील
जणू काही आग झाले ||

जगण्याचा अर्थ तूच
मरण्याला सार्थ कर
तेवणारा दीप स्निग्ध
मला तुझी वात कर ||

विक्रांत प्रभाकर







ती





कुठलेतरी जुने पुराने
कुठल्यातरी जमान्यातले
कपडे जेव्हा ती
बिनधास्त घालून येते
तेव्हा तिचे ते
निर्धास्तपण
मनात जावून बसते

चेहऱ्यावर रंग न लावता
उन्हातान्हात
थंडी वाऱ्यात
कामाला जावून भिडते
अंगावरती धूळ झेलते
तेव्हा तिचे वावरणे  
मनास जिंकून घेते  

मनातील स्पष्ट मते ती
समोर तोंडावर बोलते
कुणा न वळता
फशी व पडता
रोखठोक जबाब देते
तेव्हा तिचे वेगळेपण
अचूक दिसून येते
मन अचंबित होते    

कधी चिडते अडूनही बसते
गाल फुगवून कट्टी करते
चुकल्यावर स्वारी म्हणते
तरी परि क्वचितच चुकते
तिचे असणे सभोवताली
राज्य मनावर करते  

ती आगळी मुलुखावेगळी
क्वचितच कुणास कळली
कुणी मुद्दामच दूर ठेवली
तिला पाहता कधी वाटते
राणी असे ही राज्य हरवली
स्पष्ट निडर अढळ ठाम
स्वसामर्थे सजलेली
मन तिला सलाम करते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

सर्वस्व देणे






असो नसो नाव काही
ते नाते एक असते
शब्द अर्था वाचूनही
ते गाणे एक फुलते 

मागणे नसते जरी  
आर्त उरात दाटते
मेघांचे धरतीवरी
ते कोसळणे असते

ती शामला निरागस
ग्रीष्मात म्लानसी होते
तिज पाहुनी तयाचे   
घन मन हेलावते

ते प्रेम असले तरी
ते नाव तया नसते
कुणास्तव कुणाचे ते
सर्वस्व देणे असते

विक्रांत प्रभाकर



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...