रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

वाळूचा कण






कधी वाटते
असेच एकट
जावे वनात
उगा भटकत

धुंद गारवा
देही भिनवत
सुनी कुठली
वाट तुडवत

धुके कोवळे
हळूच सारत
दवात ओल्या
जरा सावरत

मातीवर त्या
पाय टेकवत
जुने कुठले
नाते आठवत  

वाळूवर अन
कुठल्या पहुडत
स्तब्ध निळाई
देही पांघरत

मागे दूरवर
मनास सोडत
वाळूचा कण
इवला होत


विक्रांत प्रभाकर



राख देहास या लावतो







अवघीच दार बंद करून
ती आता दुसऱ्या जगात
पराभूत मी पुन्हा त्याच  
उदास अंधारल्या घरात

खिडकी एक होती कधी
होते सोनकवडसे खुळे 
झुळकीवर हवेच्या अन
पुष्पगंधित श्वास ओले

येणार ना आता कधी   
हिरव्या पाखरांचे थवे  
सजणार ना आता कधी
काळोखावरती काजवे

सांभाळतो स्मृती काही
स्मृतीत काही ठेचाळतो
विझुनिया गेली आग
राख देहास या लावतो

विक्रांत प्रभाकर








शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

योगानंदाच्या कवितेचा भावानुवाद





गहन गूढ निद्रेच्या कुहुरातून
जागृतीच्या गोल जिन्यावर
चढत असतांना वरवर मी
वदत होतो सदा स्वत:शी
हरी ॐ हरी ॐ हरी ॐ तत्सत ||
तेव्हा तूच माझे दिव्य
अन्न परब्रह्म होतास
अन तुझ्या विरहातील
त्या थंड प्रदीर्घ रात्रीतील
सुटला माझा उपवास
माझ्या जाणीवेच्या अंतापर्यंत
मी तुला प्राशन केले
अन माझ्या मनात शब्द उमटले
हरी ॐ हरी ॐ हरी ॐ तत्सत ||
कुठे कधी कसा जरी गेलो मी
माझ्या मनातील दिपमाळेचे 
किरण असतात सदैव वळलेले
तुझ्याच प्रिय चरणाकडे
अन या युद्धसदृष जगण्यातील
प्रत्येक घणाघाती लढाईत
एकच गीत असते चाललेले
हरी ॐ हरी ॐ हरी ॐ तत्सत ||
सत्वपरीक्षेचे वादळ कधी
बेभान होत घोंघावते  
भेसूर चिंता मनी झेपावते
बुडवून टाकतो मी त्यांचा आवाज
मोठ्याने तुझेच गीत गात
हरी ॐ हरी ॐ हरी ॐ तत्सत ||

 परमहंस योगानंद
अनु.विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/










वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...