शनिवार, २५ ऑक्टोबर, २०१४

तुटलेली दोर





एक दिवस
अगदी अचानक
पक्की बांधलेली  
दोर  एकदम
तुटलेली दिसते
आपण म्हणतो
अरे !!
असे कसे झाले !!
तुटेल असे
वाटत नव्हते
वरून पक्की
छान मजबूत
आलबेल तर
दिसत होते ...

ओझे वाहणे
ताण साहाणे
हे तर
प्रत्येक दोरीचे
प्राक्तन असते
पण कधीतरी  
तिचे ओझे
जड होते
वाहता वाहता
सहन शक्ती
संपून जाते
एकेक धागा
हळूहळू मग
तुटत जातो
अंतरीचा पीळ
क्षणोक्षणी अन
सुटत जातो
कापणे ..
एका क्षणाचे
फलित असते
तुटणे ..
युगा युगांचे
मरण असते


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०१४

साक्षीची साधना



साक्षीची ही साधना
किती सोपी साधी वाटते
पण जाता तिच्या वाटेला
अनवट वळण तिचे कळते

तिला वश करायला
प्रयत्न करा कितीही
ती मुळीच बधत नाही
ढुंकूनही पाहत नाही

अशी एवढी आवडूनही
असा जीव जडवूनही
तिच्या स्वरुपी मला
शिरताच येत नाही

लाख यत्न करूनही
मात्रा काही चालत नाही
तिचे अंतरंग मला
मुळीसुद्धा कळत नाही

आज नाही तर उद्या
ती मला नक्की कळेल
या नाहीतर पुढील जन्मी
एकरूपता नक्की घडेल

परंतु तोवर डोळे
तिच्या वाटेवर लावून
तिचे ध्यान धरून
तिच्याच साठी फक्त जगेन

विक्रांत प्रभाकर


गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

देवा माझे मन






देवा माझे मन
नकोस नाकारू
उनाड बाजारू
म्हणूनिया ||
करी झाडलोट
सडा संमार्जन
रांगोळी काढून
ठेवे जरी ||
येते वावटळ
कळल्या वाचून
सारे विस्कटून
जाते पुन्हा ||
तुझाच गोपाळा
केवळ आधारू
सांभाळी वासरू  
उधळले ||

विक्रांत प्रभाकर



भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...