सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

रस्त्यावरील म्हातारी






पावलो पावली
थबकत थांबत
चाले म्हातारी
पाय ओढत

धापा टाकत
कपाळ पुसत
नकळे कुठले
ओझे वाहत

शुभ्र केस
त्वचा रापली
चेहऱ्यावरती
विणली जाळी

जुनेर साडी
जुनाट पोलके
जीर्ण पायताण
अंगठा तुटके

होती सभोवत
गर्दी धावत
कुणी न पाहत
कुणी न थांबत

नाव जणू ती
पाण्यामधली
शीड सुकाणू
नांगर तुटली

हळू हळू ती
वळणावरती
सांज उन्हागत
गेली निघुनी

मनी माझ्या
एक उदासीन
कातर संध्या
आली दाटून

मला कदाचित
असेल दिसले
शेवटचे दिस
माझे उरले

अथवा अर्थहीन
जगण्यामधले
सत्य उजाड
पथी सांडले

विक्रांत प्रभाकर

रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

माय नर्मदा






तीच खळखळ
पुन्हा कानात
तीच हिरवळ
पुन्हा डोळ्यात
तोच गंध
ओला प्राणात
शीतल स्पर्श
कणाकणात
ओढ लागली
या हृदयात
माय नर्मदा
घाली साद
तिथेच माझा
स्वर्ग साठला
पावुलात अन
मोक्ष दाटला

विक्रांत प्रभाकर

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

जखमा भरतातच सगळ्या




जखमा भरतातच सगळ्या
असे ते म्हणतात 
पण हे काही खर नाही
सदुसष्ट वर्ष झाली
ती जखम अजून भरत नाही
हिंदुस्तानचा जन्म अजून होत नाही
ती जखम घेवून मेलेत किती
किती मरणार माहित नाही
ती सरहद्द त्या तारा ते कुंपण
ती दुष्मनी तो वैराचा अंगार
का कधीच संपणार नाही
कळत नाही

विक्रांत प्रभाकर

कोसळलं झाड






शेकडो वादळ झेलून शेवटी
कुठल्या तरी एका वादळासमोर  
नतमस्तक होतं झाड
आधार सुटून..
संपूर्ण उन्मळून ..
पडतं कोसळून...
तेव्हा वाटतं
अरे हे वादळ आलं नसतं
तर झाड पडलं जगले असतं
मधुर फुलांनी पुन्हा एकदा
लगडून गेलं असतं
त्यावेळी ..
रस्त्यावर अडकलेलं ट्रफिक
हळू हळू पुढे सरकत असतं
मनातल्या मनात चरफडत..  
स्वत:शीच पुटपुटत..
शिव्या घालत...
सालं या झाडालाही
आजच पडायच होतं का ?
अन ..
कोसळलेल्या त्या झाडाची पानं
असतात हलकेच लहरत 

विक्रांत प्रभाकर

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...