मंगळवार, २९ जुलै, २०१४

देहाधारी जीवा




देहाधारी जीवा
देहाचीच ओढ
आसक्तीच गोड
सर्वव्यापी |
स्वयंभू खुंटाची  
मुळे पाताळात
व्यर्थ यातायात
खेचण्याची |
अस्तित्वाच्या गळी
जाणिवेची दोरी
देखणी सोयरी
गाठ घट्ट |
पानोपानी गर्द
दाटले जीवन
तरी देहाधीन
सळसळ |
जैसे आहे तैसे
पाहतो डोळ्याने
वाहते जगणे
पाण्यावरी |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




रविवार, २७ जुलै, २०१४

फेसबुकवरील प्रेम







आजकाल माझे इंटरनेट
फक्त फेसबुक झाले आहे  
आणि सारे फेसबुक
तुझ्याभोवती एकवटले आहे
लॉग ऑन केल्यावर
सर्वात आधी तुझा फोटो
त्या बाजूची हिरवी टिकली
दिसताच जीव हरखून जातो
तू हाय केलेला पहिला दिवस
तारीख वेळ ही याद आहे
स्माईली सकट तुझे सारे
उद्गार मला पाठ आहे ..

कधी कधी दिवसभर
खूप वेळा लॉगऑन करूनही
तू येवून गेल्याची
एकही खूण दिसत नाही
तुझ्या चॅट बॉक्स वर
मग ठेवतो काही लिहून
पुन्हा येतो पुन्हा पाहतो
अरे अजुनीही नॉट सिन
हिरमुसने तेव्हा मग  
माझे सारे अस्तित्व होते
अन तो दिवस ती रात्र  
माझे सदैव बिनसत राहते ...

तुझ्याशी मारलेल्या गप्पा
क्वचितच स्पेशल असतात
इकडचे तिकडचे विषय
उगाच मध्ये घुसत असतात
कधी काही सूचक लिहितो
तुझ्या Y ?? ने गडबडतो
सावरा सावर करीत मग
विषय काही बदलतो
तर कधी तुझ्या LOLZ  
शाबासकीने खुलून जातो
शब्द फुलांच्या वर्षावाने
तुला निशब्द करून टाकतो
वेळेचे भान हरवते
जेवणही राहून जाते
उमलून शब्दासमावेत
मन तुजशी एकरूप होते

फेसबुकने या विलक्षण
जादू नक्कीच या केली आहे
माझ्या अबोल प्रेमाची
पेरणी काही झाली आहे


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...