शनिवार, २६ जुलै, २०१४

तिच्यावरील कविता






म्हणालीस मला तू  
अलिकडे मजवरती
कविताच लिहित नाही
नक्की लिहीन म्हटल मी
खरं तर मला
तुला नाही म्हणण
जमतच नाही
पण कसं सांगू तुला  
तुझ्या सवे घालविल्या
क्षणांची धुंदी
उतरता नाही उतरत
मी जगत असतो   
पुन्हा तुझ्या सोबत
त्या क्षणांच्या सोबत
त्या शब्दांच्या सोबत
कविता जगत.. 
तुझ्या हसण्याच्या
प्रफुल्ल किनाऱ्यावर
असतो उगाच भरकटत
खळाळत्या लहरीसवे
दूरवर वाहून जात
वा कधी तुझ्या केसात
अडकलेला माझा जीव
उगाच असतो फडफडत
तुझ्या बटीची इर्षा करत.. 
ते सगळ शब्दात
खरच नाही उतरवता येत
कधी कधी वाटत
मी लिहिलेले शब्द
मलाच हसतात 
पण तुला कबुल केले
लिहायला तर हवच
म्हणून कागद पेन घेतो
डोळ्यासमोर तुला आणतो
पण तुझ्या प्रेमाच्या
धुवांधार पावसात
शब्द शब्द वाहून जातो
या भिजल्या कागदात
आणि भिजल्या शब्दात      
बहुदा तुला कधीतरी
माझी कविता सापडेल
कदाचित मी सुध्दा !

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, २४ जुलै, २०१४

तुझ्यामुळे





माझे गाणे
तुझ्यामुळे
जगणे हे
दरवळे  

माझे स्वप्न
रोज नवे
त्याला तुझे
रूप हवे 

माझा हट्ट
तुझ्यासाठी
डोळा पडो
तुझी दिठी

माझे भान
अनावर 
तुझे नाव
ओठावर 

माझा जन्म
नवा झाला
तुझ्या मुळे
उजळला 

होशील का
कधी माझी
वही तूच
कवितेची

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २३ जुलै, २०१४

तिचे दु;ख आणि पिंपल्स


 

मी देवाला म्हणालो
देवा,
तिचे थोडेतरी दु:ख
तू मला दे !
तिला हसतांना
मला पाहू दे !
अन
सकाळी पाहतो तर
माझ्या चेहऱ्यावर
दोन पिंपल्स आले होते .


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, २२ जुलै, २०१४

बरे झाले संपले ते





आरंभ नव्हता कधी
अंतास कसे रडावे
अरे खेळणे मनाचे
मनास कसे कळावे

एक भूल अनावर
व्यापून उरे मनाला
मिटलेले दार घट्ट  
उगा उघडे कशाला  

असे शब्द बुडबुडे
जगी लाख फुटतात
पोटाचा खड्डा भराया
टके चोख लागतात

बरे झाले संपले ते
आपण टाळ कुटावे
जरतारी पदरा त्या
पडदा अन म्हणावे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...