बुधवार, ९ जुलै, २०१४

तिचे केस धुतांना ...






डोईवरी मेंदी तिच्या
अचानक पाणी गेले
भाग्यवशे माझ्या मग
तिचे केस धुणे आले

झुकलेली मान थोडी
मिटलेले घट्ट डोळे
हिरवट पाणी होते
गालावरी ओघळले

दीर्घ ओले श्वास उष्ण
जलामध्ये भिजलेले
रक्तवर्ण ओठ आणि
हुंकारात उघडले

भिजलेल्या केसांवरी
हात तरंगत होते
मुलायम स्पर्शामध्ये
मन उंडारत होते

पुसूनिया गेली मेंदी
वाहुनिया गेले पाणी
गुंतलो मी केसांमध्ये
वदलो नि धजावूनी

आज सखी केस तुझे
देवू काय मी पुसुनी
हलकेच हसुनी ती
होय म्हणाली मानेनी

पुसतांना केस, मेंदी
रोमरोमी गंधाळली
अलगद मिठीमध्ये
येवूनिया बिलगली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

आषाढी





साऱ्या वेड्या वाटा
दाही दिशातुनी
मिळाल्या येवूनी
एका दारी
संपली वाहणी
कालच्या जीण्याची
खाच खळग्याची
आज इथे
लाज लत्कारांची
दरिद्री देहाची
जाहली मनाची
मांडलिक
काही पेटलेले
जळू घातलेले
भिजुनिया डोळे
मावळले
तरंग जळाचा
जळी विसावला
आषाढी दाटला
महापूर
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



सोमवार, ७ जुलै, २०१४

तीट एक ये लावूनी






वाऱ्यावर उडणारे
मोकळे कुरळे केस
मोरपंखी महिरपी
अन सजलेला वेष

पावसाने भिजलेला
गोड हसरा चेहरा
प्राजक्तागत प्रसन्न
लोभस मुग्ध साजरा

गडद गहिरे डोळे
आरपार घुसणारे
तनामनावर वीज
उर्जा उरी जागणारे

लागेल कुणाची दृष्ट
लोभस रूपा पाहुनी
ऐक सांगतो साजणी
तीट एक ये लावूनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


रविवार, ६ जुलै, २०१४

येईल कुणी तुझ्यासाठी








एक हात सुटला
म्हणून काय झालं
एक डाव मोडला
म्हणून काय झालं
तू प्रेम केलं होतं
प्रेमाचच भाग्य होतं
कुणीतरी तोडून गेलं
त्याचं नशीब खोटं होतं
कुणावरी प्रेम जडतं
वेड स्वप्न जागं होतं
तन मन मोहरून
कोसळणारं आकाश होतं
कुठेतरी काहीतरी पण
नकळे काय चुकत
वाऱ्यावर बांधलेलं
स्वप्न विरून जातं
तो गेला तरी पण
प्रेम मागंच उरतं
कारण काही झाल तरी
ते प्रेम आपलच असतं
आपलं प्रेम आपणच
सांभाळायचं असतं
तुटलं फुटलं वाटलं तरी  
सदैव अभंग असतं
प्रत्येक प्रेमाला लायक
कुणी तरी असतो
कधी लवकर कळतो
कधी उशिरा कळतो
जे हृदय प्रेम शोधतं
त्याला ते नक्की मिळत
तुझं प्रेम फक्त तू
कोंडून ठेवू नकोस
येईल कुणी तुझ्यासाठी
विश्वास हरवू नको

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...