शुक्रवार, १४ मार्च, २०१४

भगवा माझा

निळ्या आकाशी फडफडणारा
जरी पटक्यातील भगवा माझा ||
शिवरायांच्या पराक्रमाचा
नीतीयुक्ती अन दूरदृष्टीचा
कृतार्थ हिंदू तप्त मनाचा
हुंकार हसरा भगवा माझा ||
समर्थांच्या कृपाबळाचा
ज्ञान वैराग्य आदर्शाचा
पिढ्यापिढ्यांनी सांभाळला
जागृत वसा भगवा माझा ||
तोरणगडी फडफडला जो
अटक पार करुनी आला
बुलुंद मराठी अस्मितेचा
कणा ताठ हा भगवा माझा ||
अजून ध्वज तो फडफडतो
जगण्याचे मज बळ देतो
वादळ वारे ऊन झेलता
पाठीराखा हा भगवा माझा ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मतासाठी



दर एक पाच साली
दारोदारी धावताती
हात जोडी पाया पडी  
एक एक मतासाठी

निवडुनी आल्यावरी
भुर्रकन जाते गाडी
टक्केवारी साठी मग
लाडीगोडी तोडाफोडी

याची टोपी त्याची टोपी
टोपीखाली तीच डोकी
तोच राव तोच डाव
जमा करी पेट्या खोकी

याला मिळे त्याला मिळे
ज्याला मिळे तोच गिळे
ज्यांनी दिले दान राज्य  
त्याचे हात सदा लुळे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


बुधवार, १२ मार्च, २०१४

|| काली ||




 
विशाल डोळ्यात क्रुद्ध
वडवानळ अंगार
रूधीर स्नान झालेली
हाती नग्न तलवार |
विश्व सारे थरारले
आधार डळमळले
नर पशूच्या शिरांनी
रण अवघे व्यापले |
रक्त हेच वस्त्र देही
रक्ताचीच आभूषणे
रक्ताचा शृंगार तिचा
रक्त ओठी प्यायलेले |
कृष्णकांती कालरात्री
रक्तबीज जिव्हेवरी
तीक्ष्ण घोर शस्त्र हाती
बेफान तांडव करी  |
समोर ठाकले तया
स्वाहा करीत चालली
क्रोध त्वेष चीड देही  
वीज होवून वादळी   |
दुष्टांवरी बरसली
देह फाडीत सगळी
वधेविन त्यांस गती
न अन्य म्हणे कुठली  |
खदाखदा हसे उच्च  
रक्तमद्य घेत घोट
नर सुरसुरा उर
भये होते धडाडत |
ये ग माय माझ्या देशी
पुन्हा अशी अघोरशी
चट्टा मट्टा कर सारी
दुष्ट सत्ता मुजोरशी |
दे ग तुझी वत्सलता
हृदयात भरलेली
रक्षणास लेकरांच्या    
शस्त्रे हाती घेतलेली |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, ११ मार्च, २०१४

साक्षी ...



साक्षीला नसतो आधार आकार
मंत्रध्वनी अन श्वासांचा प्रकार |
अद्भुत निळूल्या प्रकाशी अपार
साक्षीला भेटतो यार दिलदार |
साक्षीला नसे करणे सवरणे
कुणास अथवा काहीही मागणे |
अपेक्षे वाचून एकांती रमणे
जाणीवी नेणीवी स्वानंद भोगणे |
साक्षीला नसते नटणे दिसणे
आपल्यातच वा रडणे कुढणे |
मागीतल्या वाचून अवघे देणे
रंग रूप काया कुर्बान करणे |
शोधल्या वाचून कुणास शोधणे
हरवल्या विन हरवून जाणे |
आतल्या दिव्याचे क्षणात पेटणे
तेलवाती विन अखंड जळणे |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


  

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...