शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१३

गोविंदा २






हा बाजार थांबायला हवा
देवाचा धर्माचा
स्वार्थात बरबटल्या
नकदी सणाचा

जत्रा भरू द्या
व्यापार होवू द्या
गावोगावी आनंदाचे
उधान येवूद्या 
पण
लुटलेल्या धनासाठी
झुंजीतल्या बैलागत
लावू नका लढायला
त्या तरुण पोरांना
 
दोन वडा पाव खावून
अर्धी थोडी बिअर पिवून
नुकती मिसरूड फुटलेली
सेना निघते चेव येवून
आणि त्यांचे आई बाप
असतात घरात आपल्या
जीव टांगणीला लावून
संध्याकाळ होई पर्यंत..

ट्रकच्या कडेवर अथवा टपावर
आडवे तिडवे तिघे बाईकवर
पोरं बसतात बिनधास्त
छाती काढून मरणाजवळ

एक पोर मरते
एक जग बुडते
तीन लाख त्यावर
कुणी ओवाळून टाकते 

एक सीमा रेषा हवी
या साऱ्याला
एक बंधन हवे
मग्रुरांच्या साम्राजाला
एक शासन हवे

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

उनाड जगणे




माझे उनाड जगणे
नाही कळत कुणाला
पारा पडला मातीत
येतो कधी का हाताला |
हाय लागता कुणाची
तडा बिलोरी काचेला
कसे पाहावे स्वप्नांना  
मीच दिसेना मजला |
भास होतात उगाच
स्वर्ग चौकोनी सजला
हात लावता तयास  
दिसे अंधार उशाला |
असे आखीव रेखीव
पथ फुलांनी सजला
जाय वनांतरी दूर
कुणी परत न आला |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गोविंदा

रस्त्यावर ओरडत
कर्कश्य किंचाळत
जाणारे गोविंदा,
ट्रक भरलेले
चेहरे पुसलेले
सुटलेले गोविंदा,
शिक्के मारलेले
बनियन घातलेले
बँनरी गोविंदा .
हि शक्ती हा उत्साह
वाहून जात आहे
व्यर्थ रस्त्यावर
धूर्त राजकारण्याच्या
प्रचारकी खेळावर
असेल त्यात आनंद
असेल हि थरार
पण ज्याच्या स्मृतीसाठी
केला जातो हा प्रकार
त्याचे कणभर दर्शनही
या सगळ्यात
मला होत नाही
या गोंधळात या बाजारात
या हुल्लडबाजीत या दादागीरीत
मला दिसत आहे
झुंडीत सापडलेली
अन झुंडीला पकडणारी
रगेल बेदरकार बेहोशी
जी विसरून जावू पाहते
अस्वस्थ अन असमतोल
वर्तमान स्थिती
अन त्यात असलेली
अगतिक बैचेनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

कामचोर माणसं






मला भेटत आहेत
काम टाळणारी माणसं
पैसा पगार घेवूनही
काम नाकारणारी माणसं
अन मी त्यांना काहीही
करु शकत नाही
माझ्याकडे आहे फक्त
थोडीशी विनंती
थाडेसे दडपण
जी ते देवू शकतात
केव्हाही झुगारून ..
आपल्या कोंदणात
घट्ट बसलेली माणसं
नियमांनी वाशिल्यानी
किंवा संघटनेनी
निर्ढावलेली माणसं
हि तीच माणसं असतात
जी हसतात मुलासवे
धावतात प्रियेकडे
हात जोडतात देवापुढे
साजरे करतात
सण उत्सव प्रेमाने
अन रडतात दु:खाने
म्हणजेच माणूसपण
त्यांच्यातले
शाबूत असते अजून
तर मग असे का घडते
का  कामचोरपणा
हि माणसाची
मुलभूत प्रवृतीच असते
 
विक्रांत प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/

रविवार, २५ ऑगस्ट, २०१३

सावज




तसे प्रत्येक स्त्रीला
हे माहित असते
ती केव्हाही कुठेही
होवू शकते सावज
कुठलाही चेहरा
कधीही होवू शकतो
पाशवी कामांध पशु 
या जगात जिथे तिथे
लावलेले असतात
शेकडो फास
शेकडो पारध्यांनी
जे तिच्या न कळत
तिचे सर्वस्व
हिरावून नेवू शकतात
पुन:पुन्हा अन पुन:पुन्हा
मैत्रीच्या नाटकात
प्रेमाच्या आशेत
लग्नाच्या आमिषात
सावज पडतच असतात
एकटेपणी आडजागी
अनोळखी पशूंनी
केलेला हल्ला 
क्लेशकारक असतोच
अस्तित्वाच्या मुळावर
आघात करणारा
पण त्या विरुद्ध निदान
न्याय तरी मागता येतो
अन त्या पशूंना
कधीकधी तरी
कोंबता तरी येते
कारागृहाच्या अंधारात
पण मैत्रीच्या सावलीत
प्रेमाच्या हिरवळीत
नात्याच्या जवळकीत
लपलेल्या सापांचे
काय करायचे
त्यांना कसे ठेचायचे
हा मोठा  प्रश्न आहे

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१३

सातवीतला राजू गुगळे




सातवीतला राजू गुगळे
कुणास ठावूक
किती सिगारेट प्यायचा
सदा त्याच्या कपड्याला
धुराचा वास यायचा
अभ्यासात कच्चा होता
मित्र परी पक्का होता
सोडतो सोडतो नक्की म्हणून
गुपचूप रोज पीत होता
वाया गेलेला, टारगट वगैरे
त्याला सारी भूषणे होती
मारामारीत वर्गात स्वारी
नेहमीच आघाडीवर होती
रोज शाळेत जातांना
दारी दत्त उभा असे
अन शाळा सुटल्यावर
पाठ कधी सोडत नसे
नको असूनही मैत्री
गळ्यात पडली होती
प्रेमा पुढे त्याच्या माझी
टाळाटाळ हतबल होती
देणे घेणे बाकी तसे
मुळी सुद्धा नव्हते
आवडी निवडी काही
काहीच जुळत नव्हते
पिवळे दात काढून
झिपरे केस पिंजारून
तो येई फक्त आपले
उगाच प्रेम घेवून
आठवीत गेल्यावर
अचानक आले कळून
राजूला घरच्यांनी
दिले होते गावी पाठवून
सुटलो एकदाचा असे
मला क्षणभर गेले वाटून 
परि शाळेतून येतांना
एकटेपण आले दाटून
विना कारण प्रेमाने
काठोकाठ भरलेले
एक जहाज माझे
जणू गेले होते हरवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...