रविवार, २८ जुलै, २०१३

म्हाताऱ्याच्या डेडबॉडी जवळ



साठ वर्ष
म्हातारा म्हातारी
संसार करत होते 
खेड्यातील घरामध्ये
दोघेच राहत होते .
एकदा म्हातारा
खूप आजारी पडला
अचानक एका रात्री
मरुन गेला
घरात एकटी म्हातारी
कडी लावून बाहेर पडली
दूरवर शेजारी
आमच्या घरी आली
आणि म्हणाली
सांगायाला बर वाटत नाही,
पण मला फार
भीती वाटू लागली !
म्हातारा तर गेला
वाटले ,
मला घेवून गेला तर ?
आणि जर पुन्हा उठला
तो तोच नसला तर ?
जिता होता तोवर
कधी काही वाटले नाही
आजारपण काढले त्याचे
कमी केले नाही
पण गेल्यावर तो
आपला वाटत नाही .
भीतीने मन,
थिजून गेले बाई
तिच्या डोळ्यातून 
अश्रू वाहत होते
ते दु:खाचे होते का
भीतीच्या लाजेचे
मला कळलेच नाही .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २५ जुलै, २०१३

स्वप्न मी पाहावे


स्वप्न मी पाहावे
ते नित्य का तुटावे
का उरात स्वप्नाचे
ओझे मी वाहावे |

सूर मी छेडावे
का अधुरेच राहावे
का कंपन हृदयातील
हृदयातच विरावे |

मी लक्षदा झुरावे
प्राण डोळी एकटावे
तिने जमीन निरखीत
तसेच निघून जावे |

या प्रीतीसी भुलावे
मी कितीदा ठरवावे
येताच ती सामोरी
पुन: वादळ का उठावे |

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २३ जुलै, २०१३

पावसात चालतांना




थोडे चालावे थोडे भिजावे
पावसाचे शिंतोडे अंगावर घ्यावे
थोडे शहारावे थोडे थरथरावे
पाण्याचे पागोळे अलगद झेलावे
थोडे थांबावे थोडे जाणावे
वाहत्या पाण्याचे संगीत ऐकावे
पाण्यात जावे पाय ओलवावे
निवळता ढग किरणात हर्षावे
फुलांना वेचावे तृण कुरवाळावे
रंगात हरवून मनमुक्त गावे
भिजल्या अंगाने गारव्यास भेटावे
उडवत पायाने पाण्याशी खेळावे
डोळे मिटावे काळ विसरावे
हरवले जगणे मिळते का पाहावे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २१ जुलै, २०१३

मरणासन्न





रक्त काळे उलटी मधले
रस्त्यावरती पुन्हा पडले
थोडे दुखले आत खुपले
मदिराग्रस्त यकृत सडले
भकास हसणे मरू घातले
थुंकीमध्ये गोळा झाले
तसेच शून्य होवून डोळे
अंधारी पुन: हरवून गेले
मरण कृपाळू उदार झाले
समोर येवुन उभे ठाकले


वेगळ्या form मध्ये    
मरणासन्न
रक्त काळे | उलटी मधले |
पुन्हा पडले | रस्त्यावर ||
थोडे दुखले | आत खुपले ||
यकृत सडले |मदिराग्रस्त |
भकास हसणे | मरू घातले ||
गोळा झाले |  थुंकीमध्ये |
तसेच शून्य | डोळे होवून| |
गेले  हरवून | अंधारात ||
मरण कृपाळू | होत उदार |
येवुन समोर | उभे ठाके || 
विक्रांत प्रभाकर 
http://kavitesathikavita.blogspot.in/


 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...