गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

अभिलाषा




अभिलाषा हि
भविष्यातील आसक्ती असते
आणि प्रत्येक आसक्तीत
अंतर्भूत असतात
भीती मत्सर द्वेष चिंता
अन सर्व व्यापी पराधीनता
या पराधीनतेतून
जावे वाटते मुक्त होऊन म्हणून
सुखभोगाचा मानसन्मानाचा यशाचा
पाठलाग करते मन
अन जाते स्वत: पासून दूरवर पळून
पण जेव्हा जाते भूल उतरून
आणि वेदना घेते वेटाळून
तसेच मन पुन्हा
तडफडते होते उदासीन
या पाळण्यातील निरर्थकता जाणून
कुणीतरी या आसक्तीतून
मुक्ती देईल  म्हणून
धावते मठ मठातून
मग त्याला मिळते मुक्तीचे आश्वासन
सोबत त्याच्या असतात पण
अटी,पाळायचे नियम, कडक व्रताचरण
याचे यथावकाश  फळ
"निरासक्ती " नक्की मिळेन
सांगीतले  जाते आवर्जून
पण या फळाची आसक्ती
कशी देऊ शकेल निरासक्ती......?
अभिलाषेपासून  मुक्ती.......?

 विक्रांत प्रभाकर

एकाकीपणा





हेतू कल्पना फलापेक्षा आणि अभिलाषा
या सा-या आहेत आसक्तीच्या सावल्या
आसक्तीच्या मुळाशी असतो एकाकीपणा

या एकाकीपणातून सुटका करून घेणे
हेच आसक्तीचे मूळ कारण असते

हा एकाकीपणा का निर्माण झाला
याला अर्थात अनेक उत्तर आहेत
आनुवांशिकता उपजत गुण वगैरे

पण या उत्तरांनी काय साध्य होणार
एकाकीपणा तर तसाच राहणार

म्हणून अत्यंत उत्कटतेने
सावधपणे डोळ्यात तेल घालून
हे एकाकीपण जेव्हा मी स्वतः पाहीन

त्या पासून न पळता त्याला न घाबरता
त्याला न नाकारीता तर तो एकाकीपणा
आपले स्वरूप उघडे करून जरूर दाखवीन

असे पाहत असतांना कुठल्याही विचाराविना
कुठल्याही सिधान्ताविना आराखाडयाविना
सर्व शक्ती लाऊन पणा उत्तर मिळणे क्रमप्राप्त आहे
प्रत्यक्ष......

विक्रांत प्रभाकर

सत्याचे आकलन



सत्याचे आकलन
का असते जहांगिरी कुणाची
का मालकी कधी कुणाची
व्रतस्थ राहून वासनांचे
दमन करणा-या तापसांची
पुस्तकी ज्ञानाने वाकलेल्या
जड मतांध पंडिताची
गाडीवर बसून धनिक शिष्यांची
फौज उभारणा-या गुरूंची
तिथे नम्र अतिनम्र होऊन
बाहेर फुत्कारणा-या शिष्यांची

सत्याचा उदय होण्यास
कश्याचीही कुणाचीही
मुळीच गरज नाही
गरज आहे ती फक्त
स्वत:त असलेल्या तळमळीची
अन जाणवणाऱ्या तातडीची

सत्याच्या आकलनास हवे अंतर
अत्यंत नम्र ऋजू नितांत सुंदर
तितकेच दृढ आणि सशक्त
नाना मतांच्या गजबजाटात
नाना निष्टांच्या अरण्यात
न हरवता वाट जे राहते सदैव
शांत निस्तब्ध विमुक्त

विक्रांत प्रभाकर

प्रज्ञेचा प्रारंभ





अहंचे अविष्काररुपी मन
जेव्हा बसते बळकावून
जीवनाची सारी सूत्रे
तेव्हा जातो नष्ट होऊन
सत्याचा प्रकाश अन
त्यातून होणारा परमानंद
म्हणून हे निजज्ञान होणे
अहम चे ज्ञान करून घेणे
हाच प्रज्ञेचा प्रारंभ आहे

विक्रांत

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...