शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

पड पड रे पावसा


पड पड रे पावसा
गड गड रे पावसा
धड धड रे पावसा
मझिया देशी

नको रागावू असा
पाठ फिरवू असा
जीव करून पिसा
जावू दूरदेशी

सदा चुकतो आम्ही
वने तोडूनी तोडूनी
केली उजाड अवनी
तव प्रिय

लाज राजाला नाही
खंत प्रजेला नाही 
दिशा जळती दाही
धगधगत्या

काही भकास डोळे
काही खपाट पोटे
तुझ्या लावून वाटे
बसलीत

त्यांच्या ओठांसाठी
त्यांच्या पोटासाठी
त्यांच्या बाळांसाठी 
तरी पड


विक्रांत 

http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

बॉसच बोलण

तुम्हाला बॉसच बोलण
उगाच रोज ऐकाव लागत
शिव्या खाव्या लागतात
पर्सनल कामे करावी लागतात
आत राग येत असूनही
वर गोड गोड बोलाव लागत
त्याच दु:ख मुळीच वाटून घेवू नका
कारण बॉसलाही एक बॉस असतो
तोही नेमक हेच करत असतो
आज बोलणी खाणारा उद्या बॉस होतो
पण दट्ट्या मिळण त्याच
कधी काळी चुकत नसते
माणसाला सत्तेची सदैव भूक असते
त्याच मुख्य कारण हेच असते
जेवढे तुम्ही वर जाणार
तसे समीकरण बदलत जाते
शिव्या देणे जास्त होते
ऐकणे कमी होत जाते
पण ऐकाव्या तर लागतातच
बॉस होऊन तुम्ही जर
शिव्या देणार नसाल तर
वरून येणाऱ्या शिव्यांचे
ओझे उगाच वाढत जाते
नोकरी सोडून कुणाला
मग घरी बसावे लागते
अकाली कधी कुणा उगा 
निवृत्त व्हावे लागते
अर्थात घरीही सुटका नसते
तिथेही एक बॉस
तुमची वाट पाहत असतो
प्रारब्ध भोगल्या वाचून
का कोण कधी सुटतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २९ जुलै, २०१२

पैजणे

थबकत थिरकत तुझी पावुले
येता वाजत
रुणझुण रुणझुण गाण वाटते
चाले पायात

डौल तुझा दंभ ही उमटतो
अचूक तालात
नाजूक पावला भार होतसे
असे जाणवत

या ध्वनीने चकित झाला
थबकून राहिला वात
पद तळीची मृतिकाही
शहारली सुखावत

पुराण वृक्ष वट म्हणाला
ऐकले हे प्रथमत
पुन्हा उर्वशी म्हटला पर्वत
डोळे आपले उघडत

आणि आसमंत धुंद झाले
राहिले तुजकडे  पाहत
तशीच चालते मंदपणे तू
सा-यांना  दुर्लक्षत

पायी ल्याली  सजली तुझिया
ती पैजणे धन्य होत
हाय अभागा करतो हेवा
त्याचा मी सतत

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २७ जुलै, २०१२

फार फार वर्षापूर्वी

फार फार वर्षापूर्वी
या जगात काही
निराळीच माणस होती .
त्या निराळ्यात..
एक वेगळीच ईच्छा होती
एक वेगळीच आस होती
आपल्या उगम पर्यंत पोहचायची
त्यांची तळमळ तीव्र होती
त्यांचे जीवन भेदून ती
शून्या पर्यंत भिडत होती
अंतरात खदखदते पेटलेपण 
डोळ्यात सैरभैर  वेडेपण
घेवून ती जगत होती
ब्रह्मांडातील कणाकणात
त्याची आच पोहचत होती
त्याची दाहकता अशी होती
की सृष्टीकर्ताही स्तंभित झाला
मनात म्हणाला
कळले रहस्य सृष्टीचे तर
जगणेच संपून जाईन
नकळे त्याला काय सुचले
दुसऱ्या दिवशी पहिले
तर त्या पेटलेल्या माणसांची
होती झाडे झालेली
हिरवीगार तजेलेदार
जणू आपल्या आदिमा
पर्यंत पोहचलेली
अन तेव्हापासून
ज्याला जीवन कळते आहे
तो झाड होत आहे

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २६ जुलै, २०१२

ये तूच मग तेथे

दारात ज्यांच्या धुत्कार गर्जतात
पायरीवरी अन श्वान भुंकतात 
स्वामित्व त्या घराचे नकोच केव्हा मला
दरिद्री स्वागताचे अप्रूप असे मला

त्या उभारल्या भिंती भीतीत चिणलेल्या
अन रोखल्या झडपा संदेही आक्रसलेल्या
घेवूनी धानिकतेला काय करावे असल्या
जगणेच शाप त्यांना पदी बांधल्या साखळ्या

दे मोकळे आकाश  झोपडी  विस्कटलेली
दे स्वतंत्रता  हृदयी  स्वागता  उत्सुकलेली
दे प्रेममयता ती भीती मुळी नसलेली
ये तूच मग तेथे  शोधीत जागा आपुली

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २५ जुलै, २०१२

श्री साईंनाथाय नम:

श्री साईंनाथाय नम:

तुझी करुणा दयाघना
ओघळली पुन्हा जीवना
तव प्रीतीची प्रचिती आली
पुन्हा एकदा मना

तू तो माझा तारणहार
सदा संकटी सावरणारा
हात धरुनी हाक मारता
सुखरूप घरी पोहचवणारा

तूच घडविले वाढवले मज
नकळत माझ्या मम दातारा
तव प्रेमाच्या ऋणात राहू दे
हेच मागणे पुन्हा उदारा

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २३ जुलै, २०१२

व्यर्थाच्या झाडाला

व्यर्थाच्या झाडाला
अर्थाचेच फळ
अर्थाच्या फळात
व्यर्थाचेच बीज
असा वृक्ष तू
वाढता वाढतो
व्यापुनिया  विश्व
कुठेही नसतो

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspt.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...