रविवार, २९ जुलै, २०१२

पैजणे

थबकत थिरकत तुझी पावुले
येता वाजत
रुणझुण रुणझुण गाण वाटते
चाले पायात

डौल तुझा दंभ ही उमटतो
अचूक तालात
नाजूक पावला भार होतसे
असे जाणवत

या ध्वनीने चकित झाला
थबकून राहिला वात
पद तळीची मृतिकाही
शहारली सुखावत

पुराण वृक्ष वट म्हणाला
ऐकले हे प्रथमत
पुन्हा उर्वशी म्हटला पर्वत
डोळे आपले उघडत

आणि आसमंत धुंद झाले
राहिले तुजकडे  पाहत
तशीच चालते मंदपणे तू
सा-यांना  दुर्लक्षत

पायी ल्याली  सजली तुझिया
ती पैजणे धन्य होत
हाय अभागा करतो हेवा
त्याचा मी सतत

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २७ जुलै, २०१२

फार फार वर्षापूर्वी

फार फार वर्षापूर्वी
या जगात काही
निराळीच माणस होती .
त्या निराळ्यात..
एक वेगळीच ईच्छा होती
एक वेगळीच आस होती
आपल्या उगम पर्यंत पोहचायची
त्यांची तळमळ तीव्र होती
त्यांचे जीवन भेदून ती
शून्या पर्यंत भिडत होती
अंतरात खदखदते पेटलेपण 
डोळ्यात सैरभैर  वेडेपण
घेवून ती जगत होती
ब्रह्मांडातील कणाकणात
त्याची आच पोहचत होती
त्याची दाहकता अशी होती
की सृष्टीकर्ताही स्तंभित झाला
मनात म्हणाला
कळले रहस्य सृष्टीचे तर
जगणेच संपून जाईन
नकळे त्याला काय सुचले
दुसऱ्या दिवशी पहिले
तर त्या पेटलेल्या माणसांची
होती झाडे झालेली
हिरवीगार तजेलेदार
जणू आपल्या आदिमा
पर्यंत पोहचलेली
अन तेव्हापासून
ज्याला जीवन कळते आहे
तो झाड होत आहे

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २६ जुलै, २०१२

ये तूच मग तेथे

दारात ज्यांच्या धुत्कार गर्जतात
पायरीवरी अन श्वान भुंकतात 
स्वामित्व त्या घराचे नकोच केव्हा मला
दरिद्री स्वागताचे अप्रूप असे मला

त्या उभारल्या भिंती भीतीत चिणलेल्या
अन रोखल्या झडपा संदेही आक्रसलेल्या
घेवूनी धानिकतेला काय करावे असल्या
जगणेच शाप त्यांना पदी बांधल्या साखळ्या

दे मोकळे आकाश  झोपडी  विस्कटलेली
दे स्वतंत्रता  हृदयी  स्वागता  उत्सुकलेली
दे प्रेममयता ती भीती मुळी नसलेली
ये तूच मग तेथे  शोधीत जागा आपुली

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २५ जुलै, २०१२

श्री साईंनाथाय नम:

श्री साईंनाथाय नम:

तुझी करुणा दयाघना
ओघळली पुन्हा जीवना
तव प्रीतीची प्रचिती आली
पुन्हा एकदा मना

तू तो माझा तारणहार
सदा संकटी सावरणारा
हात धरुनी हाक मारता
सुखरूप घरी पोहचवणारा

तूच घडविले वाढवले मज
नकळत माझ्या मम दातारा
तव प्रेमाच्या ऋणात राहू दे
हेच मागणे पुन्हा उदारा

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २३ जुलै, २०१२

व्यर्थाच्या झाडाला

व्यर्थाच्या झाडाला
अर्थाचेच फळ
अर्थाच्या फळात
व्यर्थाचेच बीज
असा वृक्ष तू
वाढता वाढतो
व्यापुनिया  विश्व
कुठेही नसतो

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspt.in/

हा जन्म गूढ

जिथे जीव जडतो
स्वप्ने पाहू  लागतो 
जळतात फुले तिथे
प्राणात तम भरतो

हे प्राक्तन कसले
सूड भरल्या हाताने
कुणा सटवीने लिहले
मज कळेना असले

का पाहूच नये ती
बाग फुलांनी भरली
का धावूच नये ती
वाट हिरवळ दाटली

हा छंद तारकांचा
का मनातून जाईना
रुतले पाय मातीत
नजर खाली ढळेना

हा जन्म गूढ कोण
कुण्या वाटेवर चालवी
हे गंभीर इशारे का
दिश्या सारख्या वळवी


विक्रांत

http://kavitesathikavita.blogspot.in/

नीरव

   


नीरव शांततेत
सरोवर प्रशांत
घनदाट वृक्षात
वेढलेला एकांत

निळ्या आकाशात
निस्तब्ध वात
मनातील तरंग
स्तब्ध मनात

तुझ्या अस्तित्वाचे
स्पंदन  कणाकणात
आनंदाची उर्मी
दाटलेली अंतरात

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, १९ जुलै, २०१२

केले तर होते

केले तर होते मनाचे उन्मन
अन्यथा विचारी  राहते  पांगुन
केले तर होते सत्याचे आचरण
असत्य अंधारी अन्यथा पतन 
केले तर होते निश्चये   साधन
अन्यथा जीवन जातसे वाहून
केले तर होते जन्माचे कल्याण
अन्यथा विक्रान्ता तीच वणवण

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

देवाच्या दारात गट होतात

देवाच्या  दारात
गट होतात
लोक भांडतात
निष्ठेने  किती 

जरी असे  एक
आराध्य  दैवत
गाठणे  जीवनी 
एकच  ध्येय

भक्तात श्रेष्टत्व
उच्य    नीचत्व
अहंता वाढवत
घड़े का साधन

इथे ही जर
द्वेष मत्सर
काय  संसार
मग वाईट 

विक्रांत

सोमवार, १६ जुलै, २०१२

समर्थ समाधि

समर्थ समाधि  
सज्जन गडी
शांतीची घडी   
घातलेली
आसमंत शांत 
गाभारा शांत
खोल ह्रदयात   
नीरव शांत
मनाची जळमट  
कामना  कळकट
गेली वाहत    
सहज आज
श्रद्धा शक्तीचा  
घेता प्रसाद
साधना पथ   
साधका स्पष्ट

विक्रांत

पैसा येवून जर

पैसा येवून जर
मी असेन तुला विसरणार
तू दिलेल्या बुद्धीने
अन संधीने
मिळालेल्या सुखभोगावर
स्वत:चाच   हक्क सांगत
असेन गर्वाने फुगणार
तर हे भगवन
दारिद्राचे वरदान देवून
मजवर कृपा कर

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

तुझ्या प्रसन्न हसण्यातून

तुझ्या प्रसन्न  हसण्यातून
अन सोनेरी डोळ्यातून
एक चैतन्य उमटते
श्वासात माझ्या संगीत होते
तुझ्या नितळ ओठातून
अन सुवर्ण कांतीतून
जे सौंदर्य पसरते
मला मंत्रमुग्ध करते
तुझे बोलणे रोखून  पाहणे 
सहजतेने वावरणे
माझे मन मोहून टाकते
तुलाच फक्त पाहत राहते 

विक्रांत

मंगळवार, १० जुलै, २०१२

मिटलेली मैत्री

 मिटलेली मैत्री
मिटलेलीच असू द्यावी
उमलली कधी तर
अलगद उमलू द्यावी

मिटलेपणात ही
ती मैत्रिच असते
सुखद स्मृतीचे
पराग हुंगित असते 

उचकटून तिला
उगा मरू नको
जपला गंध कोष
उगा जाळू  नको

मागुन कुणालाच
कधी मैत्री मिळत नाही
वठलेल्या फांदीवर
फुल कधीच उमलत नाही

ज्याला लोक
जमवलेली मैत्री म्हणतात
त्यांच्या  डोक्यात फ़क्त
फायद्याचे हिशोब असतात

विक्रांत 

प-या सारखा चेहरा शिल्पा सारख शरीर

प-या सारखा चेहरा
शिल्पा सारख शरीर 
यांचा जेव्हा होतो
बुभुक्षिता साठी बाजार
अभिरुचिचे तेव्हा कोसळतात
दिमाखदार झुम्बर

रेखीव चेह-यावर
अन कमनिय देहावर
जेव्हा होतात प्रहार
शब्दांचे, नजरेचे, स्पर्शांचे
असभ्य आणि असंस्कृत
तेव्हा अस वाटत
हे लोक  का थुंकतात
असे गुलाबावर

नितळ सुंदर चेहरा
अन तसच सुंदर
शरीर पाहिल्यावर
मनात उठावी वाहवा
अन असा आनंद व्हावा
की अश्रू जमावेत
डोळ्याच्या कडावर

सुंदरतेतील सत्य
सुंदरतेतील शिवत्व
झेलुन आपल्या अस्तित्वावर
रसिकतेने करावे
प्रेम त्या रूपावर
अन अरुपावरही .

विक्रांत 

सोमवार, ९ जुलै, २०१२

हातावर जर रेषा नसत्या

हातावर जर रेषा नसत्या
तर काय झाले असते
नवप्रेमिकांच बिचा-या
कस झाले  असते
तिची नुकतीच भेट होते
भेटी मधून प्रीती फुलते
फुलता फुलता मनी एक
अनावर ओढ जागी होते
तिचे हात हाती घ्यावे
स्पर्श स्पर्श फक्त बोलावे
शब्द सारे दूर सरावे
दोघामधले दुराव्याचे
अवघे अंतर मिटून जावे
म्हणून असे काही करावे
हस्त जोतिष्य येते म्हणावे
धनरेषा आयुष्य स्वभाव
उगाचच काहीतरी बडबडावे
येत नसले तरीही नाटक वठवावे
तिचे हात अलगद हाती घ्यावे
खरतर तिलाही माहित असते
तुम्हाला भविष्य वगैरे येत नाही ते
अन तिला ते माहित आहे
हे माहित असूनही
तुम्हाला भविष्य येतेच येते
हे मात्र तुम्ही कधीही
विसरायचे नसते
हातावरील रेषा रोज बदलत असते
असे बिनदिक्कत ठोकून द्यायचे असते
अन आपले भविष्य ठरे पर्यंत
त्यांना बदलत ठेवायचे असते
खरतर हस्त जोतिष्य म्हणूनच असते
सुज्ञास हे काय सांगावे लागते

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in

तुला पाहता

तुला पाहता वाजू लागतो
आसमंती अलगुज
तुला पाहता होऊ लागते
फुलाफुलात कुजबुज
तुझे पडावे स्वप्न म्हणून
जाती पाखरे निजून
तुला पहावे नव्या प्रभाती
म्हणून फुले येती फुलून
तुला पाहण्या चन्द्र उगवतो
कलेकलेने मुग्ध होतो
अप्राप्तिने तुझ्या दु:खे 
झुरुन झुरुन विरक्त होतो

विक्रांत

रविवार, ८ जुलै, २०१२

नदीकिनारी गाव

नदीकिनारी गाव हिरव्या कोकणी इवले
नाही दिसणे दाखवणे गर्द झाडीत लपले
दाट करवंदाची जाळी काही नारळ पोफळी
आंबा फणसाची कुठे स्वारी ऐटीत बसली
लाल मातीने  तिथल्या पाय माझे  रंगवले
ओढ्या डोहानी असे नित्य जगणे शिकवले 
भोळी ठाकर प्रेमळ उभे उद्दाम कातळ
घर तिथले प्रत्येक माझे अजून आजोळ
पूर बेफान तिथला माझ्या नाचतो नसात
वेग  तुफान वा-याचा सळसळतो श्वासात 
हिरवी भाताची खाचर  मंद वा-याने हाले
पाटी झुळझुळते पाणी  गाणे  मनात फुले
देह वाहतो मी इथे पोट भरत्या जगात
गाव स्मरतो सदैव माझ्या व्याकूळ मनात 

विक्रांत
 

शनिवार, ७ जुलै, २०१२

अपार शिष्य भक्त अनावर

अपार शिष्य  भक्त अनावर
त्या दारावर खाल्ल्या खस्त्ता
कुठे जयजयकार ऐकला थोर 
खिसा खाली पार झाला तिथे
जागृत समाधी जाता स्थानावर
पहिला बाजार जणू लूटमार
कुठे अशी भक्ती संप्रदाय सक्ती
मेंढरांचे चालती जणू कळप
काही विचारिता बसतात थपड़ा
आपुल्या झापड़ा काढाया मना
तीच तुणतुण विरक्तीचे गुण
उपभोगी सजुन ऐकायची
कुठे राजकारण चाले संवर्धन
फौज उभारण धर्मिकांची
अथवा पैश्याची देउनी नशा
भोगाची आशा शिष्यगणा
निवडून सधन उच्यपद जन
चाले तत्वज्ञान यश वृद्धिचे
असा हा प्रवास चाले रात्रंदिस
श्र ध्देचा प्रकाश दिसेना कुठे
थकलो आता शोध शोधुनी
प्राण हा विझुनी जाऊ पाहे


विक्रांत

शुक्रवार, ६ जुलै, २०१२

अवघी काया

अवघी काया शिनली 
आता अवघी माया आटली
आतबाहेर पुकार  आता 
इथली वस्ती संपली
खूप घेतले खूप वाटले 
बाकी काही नाही उरले
त्या वाटेवर नजर आता
साथी मागे राहिले
तो कैफही छान होता 
पण मजा आता नुरली
आग लागली आत आता
दवा तिला न  कुठली
व्याकुळलेले  प्राण माझे  
तन मन अधीर झाले

विक्रांत

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...