मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४

देई भक्ती

देई भक्ती
*****
आधीचे ते जन्म नसे मज ठाव
काय तुझे नाव मुखी होते   ॥१

आताही कितीक वाया गेले दिस
जाग ही जीवास काही आली ॥ २

इवलीशी ज्योत जागली अंतरी 
हृदय मंदिरी भाग्यवशे ॥२

तियेची उजडी तुजला नमितो 
वारंवार ध्यातो हृदयात ॥३

ठेवी पाऊलांशी जागी राहो भक्ती 
ऐसी काही रिती  दे जीवना॥४

नकोस देऊस अंतर यावर 
सांभाळ सावर सर्वकाळ ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

रेडे व पार्किंग

रेडे व पार्किंग
**********

डोकं नसलेल्या रेडा कुठे कसाही बसावा 
तसे आपण पार्किंग करत असतो भावा ।

रेड्याला हवी असते फक्त रिकामी जागा 
आणि पाणी साठून झालेला राडा  रोडा ।

प्रत्येक रेडा शोधत असतो ऐसपैस जागा
प्रत्येक रेडा होत असतो जागेसाठी वेडा ।

कुण्या रेड्याला दुसऱ्याची मुळीच पर्वा नसते 
त्याचे पोट भरलेले त्याला कुठे जायचे नसते ।

रस्ता कुणाचा तरी अडतो कोण संकटात पडतो
पण बिनडोक चढावर हा संथ रवंथ करत बसतो

त्या तळ्याचा मालक दुरून सारे पहात असतो 
आणि हसता हसता लोडवर गडबडा लोळतो ।

हे रेडे अडलेले कधी कुठे जाणार नाहीत ते
अनुभवाने इतक्या त्याला पक्के माहीत असते

कधीकधी भांडतात अन चिडतात हे रेडे
एकमेकांवर शिंगे ही उगा उगारतात रेडे ।

चिखल वाळून गेल्यावर शहाणे होतात रेडे
गळ्यात गळे घालतात पण शिकत नाही धडे ।

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


रविवार, ४ ऑगस्ट, २०२४

चित्र

चित्र
*****
या चित्रात गुरफटलेल्या आहेत
आईभोवती रुंजी घालणाऱ्या 
असंख्य आठवणी 
 
हे चित्र पाहिले की मला आठवते 
ते  घेऊन येणारी आई
हि चित्र गुंडाळी 
आणि पूजेचं बरंच सामान ही
मग ती लावायची ते भिंतीवर 
त्याला  घालायली माळ
कधी कापसाची कधी फुलाची 
कधी कसली कसली .
अन करायची पूजा .
आम्हाला चाहूल लागायची 
पुढे येणाऱ्या उपवासांची फराळाची

त्या जिवत्या त्या तो बुध तो ब्रहस्पती
त्यांची काहीच माहिती नव्हती
पण दरवर्षी ही भेट घडायची 
अगदी आईला सुद्धा 
त्यांची माहिती असेल की नाही 
याबद्दल शंका आहे मला

पण मला याची खात्री आहे की 
तिला कृपेची जाणीव होती 
तिच्या मनात एक प्रार्थना होती
या घरासाठी 
तिच्या मुलांच्या कल्याणाची 
भरभराटीची सुरक्षिततेची 
त्या माहित असणाऱ्या 
आणि माहीत नसणाऱ्या देवतांकडे .

ते तिच्या प्रार्थनेचे आणि 
आशीर्वादाचे बळ पाठीशी घेऊन .
आम्ही जगलो वाढलो सुरक्षित राहीलो 
आयुष्याच्या या टप्प्यापर्यंत 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 


शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

सांत्वना

 सांत्वना
.*****
झरतात नेत्र माझे 
वादळूनी अंतरात 
जळतेय रक्त माझे 
भावनांच्या वणव्यात 

पेटवली तूच वात 
सांभाळली आहे आत
उजळून प्रकाशात 
जगू दे रे उजेडात 

जरी जीवा धीर नाही 
शिरी भार सोसवत 
हर दिसी हर निशी
शूल सले काळजात 

तुझ्याविना मुळी सुद्धा 
अर्थ नाही जगण्यात 
चाचपडे जन्म सारा 
वाट नाही सापडत 

क्षणभर स्पर्श दे रे 
ओथंबल्या स्पंदनात 
व्यर्थतेची खंत जावो 
धीर तुझ्या सांत्वनात ।

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

मरणा




मरणा
*****
जरा थांब ना रे माझिया मरणा 
जाणून घेऊ दे मज या जीवना ॥
सुखाचे दुःखाचे घेऊ दे उखाणे 
कधी चांदण्यात गाईन मी गाणे ॥
परी ते अवघे वर वरचे रे 
खोलवर मज डुबी घेऊ दे रे ॥
भिजलेले अंग छान ते रे होते 
उडवले पाणी गोड ते रे होते ॥
लेवूनी जीवन घडावे जगणे 
थांब ना जरासा बाकी ते रे होणे ॥
जाणल्या वाचून जीवन सुटणे 
प्रेमळा निर्मळा हे लाजिरवाणे ॥
नाही कधी तुज कोण म्हणू शके 
तुझी गोड मिठी सांग कुणा चुके ॥
अडकल्या विना पण घडो येणे 
त्यासाठी हवे रे मजला जाणणे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

खांब

खांब
*****
घणाणली घंटा बधिरले कान
 कुठले कशाचे गारठून भान 

उंच उंच खांब अंगठा त्यावर 
खोली नसलेला अथांग अंधार

डोळे मिटुनिया तेच दृश्य भान
चढला कुठून असे हा रे कोण ?

भय हे कुठले सुख नि कशाचे 
झुलणे तरीही चालले देहाचे 

अस्तित्वाचा तिढा सुटता सुटेना
 तन मन घट्ट धरून जीवना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ३१ जुलै, २०२४

स्वप्न वाट


स्वप्न वाट
********
कधीतरी वाट वाकडी करून 
स्वप्नांना भेटायचं असतं 
नभातल तारांगण 
डोळ्यांनी पाहायचं असतं 
तो प्रकाश पाझरणारा 
कणकण व्यापणारा
त्यात स्वतःला 
झोकून द्यायचं असतं
जगणं तर रोजचंच असतं
घडाळ्याच्या काट्यावर 
नित्य धावणं असतं 
पण येताच गंध फुलांचा 
आडवळणानं जायचं असतं
त्या तिथं कुणीच नसतं 
फक्त तुमचं स्वप्न असतं
येताच तुम्ही स्वागत करतं
अन कवटाळून बाहुत घेतं
त्या स्वप्नावर करावीत कुरबान
 मग लाखो जन्म 
अन लाखो मरण

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...