शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

वळचणीचे पाणी

वळचणीचे पाणी
************

निरोपवाचून कितीदा दारी तुझ्या मी आलो
अन् ओलांडल्याविनाच उंबरा परत मी गेलो , ॥१

कसलीही ओढ असे मजला नच कळते 
आंधळेच डोळे परी तुला शोधत मी गेलो ॥२

नसशील जर आत तू  काय मी रे करावे 
साठविल्या तपा माझ्या जपत मी गेलो ॥३

मोडू नये स्वप्न खुळे कुणाचेच इथे कधी 
पाहताच जाग येवू चादर ओढत मी गेलो ॥४

बरसला पाऊस असा वळचणीस पाणी आले धजले ना पाऊल भिजाया कोरडा मी राहीलो ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

गाणी

गाणी
******
तुझ्यासाठी आकाशाची फुले किती सजवावी  
मनातील गाणी माझ्या किती किती उधळावी ॥१

ठाव नसे तुला जरी तुझ्यासाठी येती सरी 
मिटलेल्या वादळाची वाट सरे तुझ्या दारी ॥२

खिडकीत डोळे तुझे किती कुणी न्याहाळले 
पसरल्या हातावरी ओले स्पर्श थरारले ॥३

वेडे हसू उमलले चोरूनिया कुणी नेले 
कवितेत विखरून किती त्यांचे शब्द केले ॥४

नाही नाही तुज मुळी काहीच ते ठाव नाही 
खळीमध्ये अडकले शब्द तुझे माझे नाही ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

देव भुरळ

देव भुरळ
*****
कैसी ही भुरळ पडे या मनाला 
देव गणेशाला पाहतांना ॥
पदोपदी माया जाणवते त्याची 
सावली सुखाची अंगावरी ॥
रेखीव आकार प्रकट ॐकार 
सुख डोळ्यावर पांघरते ॥
प्रेम वर्षावात करावे कौतुक .
पायी वा मस्तक ठेवावे त्या ॥
कळेनासे होते चाकाटून मन 
गहीवर दाटून येतो उरी ॥
होते वेडी कुडी दुर्वांची ती जुडी
पडे मौन घडी अंतरात ॥
देतोस जगता काय अन किती 
तयाची गणती नाही कुठे ॥
विक्रांत मागतो तुझ्या पायी सेवा 
हृदयात देवा सदा रहा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

सॉफ्टवेअर

सॉफ्टवेअर
*********
जन्मापासून मरेपर्यंत मेंदूचे हे सॉफ्टवेअर 
कसे बदलत जाते अपडेट होत जाते 
हे एक कोडेच आहे ?
लहानपणी खेळात रमणारे 
तरुणपणी रमणीच्या मागे धावणारे 
प्रौढ वयात कुटुंब सांभाळणारे 
अन वार्धक्यात मरणाला घाबरणारे 
हे सॉफ्टवेअर जसजसे वय बदलते 
वातावरण बदलते कार्यक्षमता बदलते 
तसतसे बदलत जाते 
अन आपण सॉफ्टवेअर आहोत 
याचा त्याला पत्ताही नसतो 
त्याचे अपडेटिंग कोण करतो 
त्याला माहीत नसते 
या जगातील प्रत्येक माणसाची 
प्रतिक्रिया सारखीच का असते 
सगळ्यांची सुख दुःख राग द्वेष स्वार्थ 
अप्पलपोटीपणा सारखाच का असतो 
भाषा वेष भूगोल वेगळा असूनही 
एकमेकांना कधीही न पाहूनही 

आपल्यात काही फॅमिली इन बिल्ड 
सॉफ्टवेअर असतात ते काढता येत नाही 
आई-बाबा आजोबा काका यांनी भरलेले 
वा समाजाने कोंबलेले काही वेगळे असतात 
कधी कधी ते भक्तीचे असतात 
कधी व्यापाराचे असतात 
कधी शूद्रपणाचे असतात 
धूर्तपणाचे असतात तर 
कधी मूर्खपणाचे असतात

त्यावर फॉरमॅट मारायची कुणाची इच्छाही नसते 
किंवा तो फॉरमॅट मारला जाऊ शकतो 
हे कुणाला माहीतही नसते 
माहित झाले तरी तेवढे मेहनत घेणे नसते कदाचित दुसरे सॉफ्टवेअर तरी 
वेगळे काय करणार 
ही अनाम जाणीव असेल त्यांना 
पण तो  सॉफ्टवेअरचा नियामक समायोजक 
मालक तो बिल गेट 
तो कुणालाच दिसत नाही कळत नाही 

ही जगाची समाजाची कुटुंबाची 
आणि मनाची क्लिष्ट रचना 
परस्पर व्यवहार त्यातील भावनांची ओढाताण
प्रेम मोह माया यांचा आविष्कार 
द्वेष ईर्षा तिटकारा यांचा संचार 
हे सारे यांत्रिक आहे 
मेंदूत जाणारा सिग्नल ठरवतो 
कुठले सॉफ्टवेअर वापरायचे 
आणि काय प्रतिक्रिया द्यायची ते
मग हे जीवन फक्त संवेदन आणि 
त्याला होणारी प्रतिक्रिया एवढेच आहे काय?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

सुख


सुख
******
सुख ज्याला सुख मिळते 
तो हसतो नाचतो आणि आनंदाने ओरडतो 
पण ओसरतात ती नशा तो आवेग 
पुन्हा रिक्त हस्त होतो 
आणि पुन्हा धावू लागतो 
नव्या सुखाच्या शोधात 
सुख मिळते डोळ्यांना कानाला 
नाकाला त्वचेला आणि जिभेला 
सुख असते फक्त 
एक न्युरोकेमिकल प्रोसेस
मेंदूला का कुठे चव घेता येते 
वा गंध घेता येतो स्पर्श करता येतो 
मेंदूला पोहोचते ती 
फक्त एक संवेदना एक सिग्नल 
मेंदूला सांगितले गेले असते 
मेंदूत संग्रहित केले गेले असते 
तो तसा सिग्नल मिळताच ते सुख ठरते 
अन् आनंदाचे हार्मोन 
स्त्रवू लागतात रक्तात 
पण काही क्षणातच हरवून जातात 
सुख येते सुख जाते 

खरं तर रस रंग गंध स्पर्श यांची 
गरज असते देहाला आणि मनाला 
अस्तित्वाची निरंतरता टिकवण्यासाठी 
रोग टाळण्यासाठी 
पशुचे भय ठेवण्यासाठी
विषारी फळांचे गंधाचे कीटकांचे 
स्पर्श टाळण्यासाठी 
विषसेवन टाळण्यासाठी 
कारण या संवेदना करत असतात 
संकटांचे निराकरण जीवाचे रक्षण
या पंच ज्ञानेंद्रिया मुळे 
पण ना कळे  कुणास ठावूक
ती कधी अन् कशी झाली सुखाची साधनं 
अन मग सुरू झाली सुखाची स्पर्धा 
हव्यासाची युद्धाची स्वार्थाची विषारी मुळे
रुजली गेली खोलवर मना मनात

जर ही सुख उपभोगाची प्रक्रिया संपली 
कधी तरी कश्यानेतरी नष्ट झाली तर ?
तर हे जग खरोखर सुखी होईल का?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

अर्थ

अर्थ 
****
म्हटला तर अर्थ कशालाच नाही
जन्माला येण्यास जगण्यास मरण्यासही 
एक निसर्ग प्रक्रिया आहे या देह मनाची ही
उत्पत्ती स्थिती आणि लय घडवणारी 
जसे की लाखो कोट्यावधी जीव 
इथे जन्माला येतात आणि मरतात 
समुद्रकिनारी पडलेल्या शिंपल्याची गणती 
कोण करू शकणार, कोण ठेवू शकणार ?
आणि ठेवूनही काय करणार म्हणा !
नाव वैभव किती क्षणिक हास्यास्पद गोष्टी आहेत 
नाही म्हटले तरी जगतांना पोटात पडणारी आग 
ती तेवढी खरी असते आणि तेवढीच खरी असते 
वस्त्र निवाऱ्याची गरज ही
जगणे आणि जिवंत राहणे वंश सातत्य टिकवणे 
या पलीकडे प्रेरणा येतात 
तथाकथित बुद्धिमत्तेतून अन्
रक्तात पाझरणाऱ्या संप्रेरका मधून 
सेरोटोनिन डोपामिन ऍड्रीनालिन टेस्टोस्टरोन प्रोजेस्टरोन  ओक्सिटोसीन वगैरे वगैरे ..
आनंद सुख स्वप्न भीती यांचे हे इवलाले डोस 
देतात हातात टाळ, उभारतात प्रार्थना घरे 
जमवतात गर्दी शुक्रवारी रविवारी गुरुवारी 
कुणालाच कळत नसतं, पछाडल्यागत अन्
संमोहित होत सारे चालत असतात त्याच रस्त्याने
चपला वेगळ्या असतात टोप्या वेगळ्या असतात 
पण डोळे तसेच असतात मनही तीच असतात 
अन् रक्तात मुरलेली जगण्याची चाकोरीही 
ती असते कणाकणात वाहत 
जगत जगत मरत मरत पुढे पुढे सरकत 
असले हे जीवन तसे पाहिले तर 
खरंच अर्थहीन आहे.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

उमेश परमार

उमेश परमार 
**********
परस्पर विरोधी गुणावगुणांनी 
भरलेले व्यक्तिमत्व असलेला उमेश परमार 
जीवना इतकाच मृत्यूलाही खेळ समजणारा 
सहजच पटात गेला मृत्यूच्या 
कबड्डी खेळणाऱ्या खेळाडू सारखा .
खरं तर अनेकदा त्याला 
स्पर्शून हसून हसून परत आलेला हा गडी 
या डावात मात्र, फसला कैचीत त्याच्या 
अन् परत आलाच नाही 

जीवनाच्या लाटावर स्वार झालेल्या
होडीगत तो जगत होता
हिंदकळत गरगर फिरत 
कुठे आपटत कोणावर आपटत 
कुणाला नदी पार नेत तर 
कोणाला मध्येच उतरवत 

त्याच्या आक्रमक आवाजामागे 
बेछूट देहबोलीमागे बेफिकीर वृत्तीमागे 
काय दडले असेल कोणालाच कळले नाही 
त्याचे प्रश्न आर्थिक होते का ?
सामाजिक होते का ?कौटुंबिक होते का ?
या चर्चेला आता काहीच अर्थ नाही 
कारण हे कोणीही सोडवायला गेले नाही 
आणि कुणाला सोडवता येणे नव्हते शक्यही 

मला मात्र आठवते ती रूग्णालयात 
त्याची परत येण्याची आर्जवी  विनंती 
आणि मी त्याला दिलेली संमती 
फक्त स्वत:ला बदल 
एवढी एकच अट ठेवलेली 
पण त्याचे बदलणे हे जणू 
अशक्य कोटीमधले होते 
हेही मला उमगत होते 

पण त्याने चीफ मेडिकल ऑफिसरच्या खुर्चीला 
देव मानले होते हे मला नक्कीच कळत होते 
त्याची ती श्रद्धा आणि आदर 
त्या बाहेरच्या वादळाचे अगदीच विरुद्ध रूप होते 

मला उमेश आठवता आठवता आठवू लागतात 
अनेक चेहरे उमेश सारखे 
माझ्या आजूबाजूला या रुग्णालयात वावरलेले 
आणि असेच अचानक निघून गेलेले 
जीवनाची तमा नसलेले 
भावनांच्या लाटेवर वाहणारे 
व्यसनात सुख शोधणारे 
सदैव अनुत्तरीत प्रश्न असलेले

आणि वाटते हे चेहरे या व्यक्ती 
 मूक हाका तर मारत नव्हते 
आपल्या सर्वांना आजूबाजूच्या सवंगड्यांना 
मानलेल्या मित्रांना सहकामगारांना 
त्याच्या त्या वर्तणुकीतून 
ज्या कधीच पडल्या नाहीत कानावर 
आम्हा कुणाच्याच?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...