शनिवार, १० एप्रिल, २०२१

वस्त्र

  वस्त्र
🌸🌸

ल्याईलो सुखाचे 
वस्त्र भरजरी 
श्रीदत्त माहेरी 
मिरविले ॥

घेतले कौतुक 
करुनिया किती 
उमटते गीती 
स्वानंदाच्या ॥

पुरविले हट्ट 
दत्तात्रेय देवे 
नुरले मागावे 
ऐसे काही ॥

सुखाचा महाल 
जणू भिंतीविन 
सुखाने भरून 
ओसंडला ॥

सुखाचे निधान 
दत्त भगवान 
सुख वरदान 
स्वयं होती ॥

विक्रांत सुखाला 
ऐसा लाचावला 
दत्त कोंदाटला 
कणोकणी ॥



🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘





शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

मुकूट

मुकूट
*****

माझ्या माथ्यावरी 
नको तो मुकुट 
काट्यांचा फुकट 
दत्तात्रेया ॥

चोरांच्या बाजारी 
पुसताच भाव 
जाते नाव गाव 
वस्त्रानिशी ॥

बोजड शब्दांची 
नीरस दूनिया 
मज स्वामीराया 
देऊ नको ॥

देणे जर काही 
देई काही सेवा 
जनहित भावा 
ठेवलेली ॥

मग हा विक्रांत 
राहील सुखात 
तुजला पूजित 
जनार्दनी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

पापे जळता

पापे जळता
*********

दत्त स्मरतो सतत 
पान पिंपळाचे होतं 
दत्त जगतो मनात 
फळ उंबरी पिकत ॥

दत्त भजतो रे होतं 
बिल्व पान लहरत
दत्ता करतो संगत 
गंध चंदना सवेत ॥

दत्ता लिहतो रे गीत 
भाव आतला ओतीत 
दीप ओवाळतो मंद 
ज्योत प्राणाची डोळ्यात ॥

दत्ता शरण विक्रांत 
दत्त भरला जगता
दत्त करेल रे कृपा 
पापे तपात जळता ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

उकळी

उकळी
******

दत्त प्रेमाची उकळी 
माझ्या मनात उठली 
तेणे आटुनिया वृत्ती 
देह दशा ही मिटली ॥

दत्त प्रेमाच्या आगटी 
माझ्या मनास लागली 
जळे आसक्ती जगाची 
लोभ डोंगर पेटली ॥

दत्त प्रेमाची हवा ही 
माझ्या मनात शिरली 
जड जगताचे पाश 
मृत्यू श्रुंखला तुटली ॥

दत्त प्रेमाची भरती 
कणाकणात भरली 
गेली सरुनिया भ्रांती 
मूर्ती एकटी उरली ॥

दत्त  प्रेमाचा विश्वास
नवी पालवी फुटली 
स्फुरे  व्याकुळ ह्रदय  
नेत्री पौर्णिमा दाटली॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

अतृप्ती

अतृप्ती
******

अतृप्तीचा वृक्ष तुझा 
तूच वाढवू नको रे 
कुढुनिया जल त्यास
रोज ते देऊ नको रे ॥

तुझ्याहून दु:खी इथे 
बघ बहू जग आहे 
डोकावून पहा जरा 
जिथेतिथे आग आहे ॥

भेटली जी सुखे तुला 
मूल्य त्याचे थोर आहे 
प्राक्तनाच‍ा हिशोब हा
बघ काटेकोर आहे ॥

दत्त दाखवितो खुणा 
सोहं ध्वनि गुंजे काना 
निद्रा असो जाग किंवा 
प्रश्न नको आता मना  ॥

दत्ती जीव रमे कैसा 
भजुनिया पहा जरा 
वाहतो विक्रांत वारा
शिखरी मस्त भरारा


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

भिकारी

भिकारी
******

दत्ताचिया दारी 
सदा मी भिकारी 
भक्तीची भाकरी 
मागतसे  ॥१

नको हिरे-मोती 
सुवर्णाची नाणी 
ओठी देई गाणी 
प्रेमाची रे ॥२

तुझ्या दर्शनाची 
आस आहे मनी 
लोचनी अजुनी 
दिसेना तू ॥३

घडो घडेल ते  
जेव्हा जसे जसे 
मज प्रेम पिसे 
लागो तुझे ॥४

विक्रांत याचक 
जन्म जन्मांतरी 
तुझ्या दारावरी 
राहो परी ॥५
****  

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

गढूळ पाणी

गढूळ पाणी
****

पाणी गढूळ मनाचे 
आहे वाहत कधीचे 
कणकण ओघळतो 
ओझे कुठल्या जन्माचे ॥

पाणी इथले का खारे 
पाणी तिथले का गोड 
अशा असंख्य प्रश्नांचे 
कुणा सुटते ना कोड ॥

मना असतो का रंग 
हे तो वासनांचे अंग 
तरी भोगतो अवघे 
जणू होऊन सवंग ॥

जरा वाहू दे वाहू दे 
कुण्या गंगेला मिळू दे 
सारे मिटतील क्षोभ 
अंती सागर पाहू दे  ॥

रंग पिवळा मातट
लाल सावळा ही कधी 
त्याचे नव्हतेच कधी 
झाला वृतीतला बंदी॥

रंग कर्पुरगौराचा 
आज मागे अवधूता 
रंग मिटुनिया सारे 
करी निर्मळ विक्रांता ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...