शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

तुझे बोल (उपक्रमासाठी)


तुझे बोल 
************

तुझे बोल चांदण्याचे 
अवसेच्या विभ्रमाचे 
दव होतं ओघळत्या
अलवार वा शीताचे 

तुझे हासू पावसाचे 
उसळत्या तूषाराचे 
लहरत्या फेसाळत्या
गंगौघाच्या उगमाचे 

तुझी दिठी आभाळाची 
निळ्याभोर सागराची 
गुढ काळ्या भरलेल्या 
यमुनेच्या गं डोहाची 

तुझी मिठी कुसुमांची 
गंध धुंद झुळुकांची 
मृदु मंद अलगद 
पिंजलेल्या मेघुटाची

शब्दातीत तुझी प्रीती 
अवतरे माझ्या गीती
मानतो मी तुझ्यासाठी
शब्द अपुरे हे किती 

*********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

गुरूवर

गुरूवर
******

याहो संत जन 
या हो एक वार 
मज गुरुवर 
भेटवा हो ॥
मी तू पणाचा हा 
मिटुनिया खेळ 
आत्मतत्वि मेळ
करू द्या हो ॥
सारी दलदल
देहाची मनाची 
साचल्या भोगाची
हटवा हो ॥
व्यर्थ नातीगोती 
व्यर्थ उठाठेव 
निरुद्देश गाव 
सुटू द्या हो ॥
गुरुराव असे 
मुक्तीचे ते द्वार 
असे पूर्वापार 
ऐकुनी हो ॥
बहु शोधियले
परि दिसेनाची 
जन्म अंधाराची 
कोठडी हो ॥
विक्रांत जगात 
तिमिराचा भास
मिटूनी डोळ्यास
असे काय॥
प्रकाश होऊनी
तेजाने भरूनी
मज सामावूनी
त्यात घ्या हो॥

*********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

डॉ.पिपळे सर (M.S. of K.B.B.Hospital)

डॉ.पिपळे सर (M.S. of K.B.B.Hospital)
*********::****
निवृत्तीचा हा पडाव 
गाठलात तुम्ही ,
पिंपळे सर .
तुम्हाला निरोप देणारे 
आम्ही ही 
तसे फार दूर नाही 
येऊ लवकरच बरोबर .

येथे कोणी काय मिळवले 
आणि काय मिळवायचे 
हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो 
पण इथे जो माणसं मिळवतो 
तोच खरेतर जिंकतो 
त्या अर्थाने तुम्ही 
नुसते विजयी नाही 
तर महा विजयी आहात .

पाहता क्षणी 
भेटता क्षणी 
डोळ्यात भरणारी 
सज्जनता सौम्यता 
तुमच्या रूपात अवतरीत होते 
तुमच्या आभामंडळात 
अन भासमान होते .

सर ,
आपण भेटलो फक्त 
काही मिटिंगमध्ये 
आणि बोललो फारच कमी 
तुटक बरेचसे जुबबी 
कामापुरते 

पण कळत होते 
आकाशाचे पाखरू 
जमिनीवर चालत आहे ते .

आता पिंजऱ्याचे जग सरले आहे 
आता साखळीचे बंध तुटले आहे
उंच-उंच उडा 
आपल्या मनस्वी आकाशात 
आणि द्या प्रेरणा ती,
आम्हालाही  !!
भरारण्याची!!

निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा सर !!

डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

शब्द चकवा

काय या शब्दांचे 
करावे ते आता 
भार झाला माथा 
जगतांना ॥१॥
किती उपदेश 
ज्ञानाच्या या वार्ता 
परी घडा रिता 
सर्वथैव ॥२॥
बहु गोड वाटे
भक्तांचिया कथा 
देव त्या भेटता 
गोष्टींमध्ये ॥३॥
धाव धावुनिया 
सरेना हा रस्ता 
कारे अवधूता 
माझा असा ॥४॥
साऱ्या जीवनाचा 
जाहला चकवा 
कुणाला सांगू दावा 
दिशा मज ॥५॥
विक्रांत उदास 
दिसेना प्रकाश 
शब्द महारास 
निरुद्देश ॥६॥

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

अनंग

अनंगा
*****

नाचविले मज 
बहु तू अनंगा 
आता रंगू दे रे 
अवधूत रंगा  ॥

जाहलो किती रे 
सेवुनिया धुंद 
जाई-जुई गंध 
निशिगंध मंद ॥

डोळ्यात कुणाच्या 
हरवून खोल
शब्दात कुणाच्या 
हरपून बोल ॥

स्पर्शी रेशमी त्या 
जाहलो बेफान 
जाणले पाहिले 
यौवनाचे गाण ॥

हाय परी त्यात 
आकंठ अतृप्ती 
जाळणारी आग 
पडती आहुती 

विझू देत आता 
आवेग तनुचे 
पडू देत आता 
स्वप्न या प्रभुचे ॥

सोड सोड आता 
मनाचे या ठाण 
कणोकणी आता 
येवो शिव गाण ॥

दग्ध तुला पुन्हा 
कोण जाळू शके
अग्नि पोटी तुला 
कोण पाहू शके ॥

तूच आता देवा
कृपा करी थोर 
माझ्यासाठी होई 
 नाथ जालंधर ॥

धरुनिया हाता 
करी कानिफा वा
गोपीचंदा सम 
 मार्ग थोर दावा ॥

विक्रांत दारात 
तुला आन मागे 
रंग भगवा दे 
आस मनी लागे ॥

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

काया

काया
*****
अवधूता काया 
आता ही सरावी 
दुनिया मिटावी 
मांडलेली ॥

कधी सरणार 
असा हा प्रवास 
मिटणार ध्यास 
अंतरीचा ॥

एक तूच जरी 
असे ध्यानीमनी 
दिसेना अजुनी 
मुर्त तुझी ॥

सकळ इंद्रिया 
लागे तुझी आस 
दत्तात्रेया वास
जीवी करा ॥

सरो तळमळ 
जीवा लागलेली 
करुनी सावली 
मेघवर्णा ॥

विक्रांत आटला 
जीवन जिव्हाळा 
कोमल कृपाळा 
आषाढ व्हा  ॥

**
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

सुटावा संसार


सुटावा संसार
*********

सुटावा संसार 
माझा भगवंत 
विरक्त संन्यस्त 
भाव व्हावा '॥
सेवावा सुंदर 
नर्मदेचा तीर 
किंवा गिरनार 
परिसर ॥
जगा लखलाभ 
होवाे व्यवहार 
एकांत अंतर 
मज लाभो ॥
मन व्हावे लीन 
नामात ध्यानात 
माझ्या मी शोधात 
हरवावा ॥
कोडे हे जन्माचे 
भोगाचे रोगाचे 
आणिक मृत्यूचे 
सुटूनिया ॥
दाव या विक्रांता 
वाट सुटलेली 
कधी चुकलेली 
दत्तात्रेया.॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...