रविवार, ७ जून, २०२०

तुझी सत्ता


 
तुझी सत्ता
********
माझ्या अस्तित्वाचे
मज नाही भान

वाहे देहातून
तुझी सत्ता ॥
कशाला म्हणावे
मज मी भिकारी
माझ्या डोईवरी
हात तुझा ॥
आशाळभूत तो
याचक मनात
सांगी त्या कानात
तू तो नाही ॥
जगत सम्राट
असे आत्मराज
जाणुनिया लाज
सारी गेली ॥
गुरुदेव दत्त
देती अनुभूती
संताचिया पदी
बसवून ॥
विक्रांत चैतन्य
झाले अंग अंग
धन्य संत संग
अवधूता॥

**
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, ४ जून, २०२०

भेटी देई

भेटी देई 
*******

रुसू नको दत्ता 
नको रागाऊस 
परत फिरूस
येता येता ॥
लायकी वाचून 
करतो याचना 
भेटीची कामना 
धरुनिया ॥
मळलेले तन 
मळलेले मन 
भोगात जीवन 
सारे जरी ॥
येई गा धावून 
वादळ होऊन 
चिंब भिजवून 
टाक मला ॥
अन्य न उपाय 
तुझ्या कृपेवीण
घेई गा ओढून 
माय बापा ॥
विक्रांत व्याकुळ
तुझ्या पथावर 
फक्त एकवार 
भेटी देई ॥
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, १ जून, २०२०

सखा ज्ञानेश्वर



सखा ज्ञानेश्वर
**********
सखा ज्ञानेश्वर 
शब्दांचा सागर
तया वाणीवर 
जीव माझा ॥१
एक एक ओळ 
प्रबंध काव्याचा 
बोध अध्यात्माचा 
काठोकाठ ॥२
ग्रंथा ग्रंथातून 
प्रेम ओसंडते 
लाडक्यास घेते 
कडेवर ॥३
अपार करुणा 
जगत कारणा 
माऊलीचे  मना 
ओघळते ॥४
विक्रांत करुणा 
लहरीत  ओला 
जन्म फळा आला 
कृपे तया ॥५

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.com

काळ कावळा व मृत्युंजय


काळ कावळा
***********

काळ कावळा 
घिरट्या घाले
कुणास उचलू  
म्हणून न्याहाळे॥
दुष्ट मुळी न 
सुष्ट मुळी न
घेई उचलून 
मरणासन्न ॥
कधी बालक 
कधी तरुण 
वृद्ध कुठला 
गेला जगून ॥
कुणी बुडून  
कुणी पडून 
स्वतःस किंवा 
फास लावून  ॥
गोळी खाऊन 
वध  होवून 
रोगी खचुन 
जाई संपून ॥
जन्म  जिथे 
मृत्यु तिथे 
काळचक्र हे 
सदैव फिरते ॥
साधू वैद्यही 
गेले राजेही 
दीन पथीचे 
गेले धनीही ॥
जाणार तू ही 
जाणार मी ही 
कुणा न चुकते 
काळ झेप ही ॥
परंतु सोडून
निवांत होऊन 
कुणी काळास 
घेई  बोलवून ॥
तो मृत्युंजय 
जावे होऊन 
देह सहजी 
देत फेकून ॥
हीच मनिषा 
मनी बाळगून 
विक्रांत जगतो 
दत्ता स्मरून ॥
**
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

विश्वाचिया आर्ता


विश्वाचिया आर्ता
***************
पांगुळले जग 
चालवी रे दत्ता 
हरवूनी सत्ता 
विषाणूंची ॥
भिंगुळले डोळे 
तोषवी रे दत्ता 
दावूनिया वाटा 
रुळलेल्या ॥
घाबरले जन 
सावर रे दत्ता
बळ देत चित्ता 
विश्वासाचे ॥
हरली उमेद 
जागव रे दत्ता 
चालण्यास रस्ता 
दृढ बळे ॥
आणि चालणाऱ्या 
सांभाळ रे दत्ता 
शितल प्रारब्धा 
करुनिया ॥
थांबव चालणे 
वणवण दत्ता 
निर्विष जगता
 पुन्हा करी ॥
विक्रांत मागतो 
तुजला श्री दत्ता 
विश्वाचिया आर्ता
धाव घेई ॥
****
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, २६ मे, २०२०

प्रयोजन

प्रयोजन
******
वाटले मला भेटल्या विना तुला
जावे लागते की काय मला
पण तू थांबलेस बहुदा पुन्हा एकदा
आशेचा अन श्रद्धेचा दीप घेऊन
मी चालू लागलो पुन्हा तुझ्या पथाला
तशी इथून जायची मला भिती नाही
भिती नाही काही गमावण्याची ही
माझ्या सकट इथे माझे काहीच नाही
 हे केव्हाच कळून चुकलोय मी
तुझ्या या नाटकात आताशा
मला वेगळे पाहू लागलोय मी
तुझे भेटणे कसे असेल या
कल्पनाही मी करीत नाही
उगाच तुझे चित्र रचून डोळ्यासमोर
दिवसाउजेडी  स्वप्नही पाहत नाही
ये तू रुप घेऊन वा ये  रूपा वाचून
भेट समोर येउन वा रे आत उलगडून 
किंवा ये असा माझ्यातच मी होऊन
 कसे ? काय ? केव्हा ?
सारे तुझ्यावर आहे मी सोपवून
कारण मला माहित आहे
तुच एकमेव माझ्या जगण्याचे प्रयोजन आहे
बाकी सारे चाललेय म्हणून जीवन आहे.
****
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २५ मे, २०२०

कोरोना वार्डात

कोरोना वार्डात
**********

कोरोना वार्डात 
चिंतातुर रुग्ण 
दाटलेले प्रश्न 
मुखावरी ॥
कुणा थोडा ताप 
कुणा लागे धाप 
कुणा नसे झोप 
रात्रंदिन ॥
बाहेरून बंद 
कक्षाचे ते द्वार 
चाले येरझार
आतमध्ये ॥
स्वतःहून साऱ्या 
घराचीच चिंता 
जिवलग चित्ता
सदोदित ॥
परी एकमेका 
देऊनी आधार 
चाले व्यवहार
 सबुरीचा ॥
कोरोनाच्या कथा 
डोक्यात नाचती 
सांभाळावे किती 
मनामध्ये ॥
बेचव ते अन्न 
येई भरपूर 
परी जाई चार
घास आत ॥
त्यात काही होते 
काही चिन्हां विना 
नशिबाने त्यांना 
साथ दिली ॥
इतरांस तेही 
होते सांभाळत 
आणि धीर देत
 वेळोवेळी ॥
परी काही केल्या 
नव्हते सरत 
दिन उलटत 
भरभर ॥
मग दिनमान 
तेही उलटले 
आले ते भोगले 
भोग सारे ॥
थंडावले युद्ध 
रोग ओसरला 
परी तो उरला 
बंदिवास ॥
भयाची सावली 
मिटता उरली 
मनी भरलेली
कृतज्ञता ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...