रविवार, १७ मे, २०२०

ऐसा हा गोरक्ष




ऐसा हा गोरक्ष
************


मोहाच्या राज्यात 
मग्न आत्मदेव 
देई त्या आठव
स्वरूपाचा 

ऐसा हा गोरक्ष
करूणा कृपाळ
करतो सांभाळ
जिवलगा 

कुठून आलास 
कुठे ते जायचे 
कल्याण जगाचे 
करताना 

ऐसी जीव सेवा 
शिकवी जनास 
आपल्या शिष्यास 
सर्वकाळ 

सोनियाची वीट 
धरिता मनात 
सोन्याचा पर्वत 
दावितसे 

 
ठसावी निवृत्ती 
ठासून मनात 
करे यातायात 
म्हणूनिया 

सुटुनिया वीट 
घडवी दर्शन
सरे विस्मरण 
झालेले ते 

आणि मातीतून 
घडविले गुरु 
केला अंगीकारू
अवघ्यांचा

जात-पात वृत्ती 
देखिली न डोळा 
भक्तीचीया खेळा 
रंगविले 

दत्त जिवलग 
गोरक्ष प्रकट 
माझे ह्रदयात 
वास करो 

म्हणून विक्रांत
वदे काकुळती 
उतावीळ पंथी 
मिरावया .

**********
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 

शनिवार, १६ मे, २०२०

कलीत




कलीत.
*****
मातल्या कलित
भरलेले पापी 
संसारी या सोपी 
मुक्ती नसे॥

दांभिके मलिन 
केला धर्माचार
अवनी आचार 
बुडविला ॥

पडले ग्लानीत 
सारे संभावित 
धर्मज्ञ पतित 
धना साठी ॥

मजला आधार 
तुझिया भक्तीचा
संत वचनाचा
फक्त येथे॥

विक्रांत कलीच्या 
विळख्यात जरी
तूच त्याला तारी 
सदा दत्ता ॥

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

शुक्रवार, १५ मे, २०२०

गुरू ते सारे






गुरू ते सारे
 *********

आधी भेटलेले 
आणि भेटणारे 
गुरू ते हि सारे 
तुम्हीच की ॥

आधी वंदियले
पुढे दिसणारे
पाय ते हि सारे 
तुमचेच ॥

रूपारूपातून 
होवून प्रकट 
मज शिकवित 
आहा तुम्ही ॥

चैतन्याची मूर्ती 
ऊर्जेचा सागर 
घेत अंकावर 
आहे मज॥

विक्रांता सहज 
कळू आले सारे 
प्रेमाच्या उमाळे
डोळा पाणी..॥



©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

गुरुवार, १४ मे, २०२०

गुरू चैतन्य





गुरू चैतन्य 
*********

चैतन्य चालते 
चैतन्य बोलते 
चैतन्य सांगते 
ज्ञान सारे

चैतन्या चैतन्ये
प्रेमाने भरले
प्रकट झाले 
उत्कतेने

चैतन्य ओठात 
चैतन्य पोटात 
चैतन्य जगात
वाटे स्वतः

चैतन्य सांगते 
चैतन्य पुराण
चैतन्य गायन 
सर्वकाळ 

चैतन्य कुडीत 
चैतन्य बसले 
चैतन्य उरले 
बाहेरही 

चैतन्य उतरे
चैतन्य शब्दात 
चैतन्य विक्रांत 
लिहियले.


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, १३ मे, २०२०

गुरुची वचन



 गुरुची वचन
*************

माझिया कृपाळू 
गुरुची वचन
येतात होऊन
काव्य मनी 

वसो गुरुवाणी 
माझ्या ह्रदयात 
क्षणोक्षणी साथ 
देणारी ती 

अवघी तयांच्या 
तेज दिव्यातली 
दिप्ती साठवली 
मनात या

घडे उजळणी 
अक्षरे येऊनी 
विक्रांत स्मरणी
पुन्हा पुन्हा 

गुरू मायबाप 
सांभाळी लेकरू 
वेडे हे कोकरू 
भटकते


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

करोना

आता पाणी डोक्यावरून जात आहे करोना 
किती घरादारांची वाताहत होत आहे करोना। 

माणुसकीस पुन्हा कलंक लागत आहे करोना 
एक एक दार आतून घट्ट बंद होत आहे करोना

मृत्यू भय साऱ्यांनाच तू दहशत आहे करोना
बघ तुझ्या सावलीत स्वप्न जळत आहे करोना 

सारे विस्थापित कष्टकरी धावत आहे करोना जगण्या मरण्यासाठी मातीत जात आहे करोना

झालाय तुझाच विजय दुमदुमत आहे करोना 
पुरे करं जाई आता जग म्हणत आहे करोना 

तुझ्या चिनी पित्यागत का वागत आहे करोना 
तुझे घर फक्त वटवाघूळ वस्ती त्यात आहे करोना

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...