सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

सल ही निवारा

  



सल ही निवारा
 *******
रुतलेला काटा 
सलतो पायात 
दर पावलात 
कळ माथी 

कैसे मी चालावे
कुणाचे सांगावे 
दुःख हे सांडावे 
कुण्या हाती 

जन्मा आलो हीच 
सल आहे थोर 
होऊनिया ढोर 
जगे जगी 

का रे तू घातलें 
मजला देहात 
भोगात रोगात 
काळ गामी 

होऊनिया वैद्य 
धावरे उदारा 
सल ही निवारा 
दत्तात्रेया


 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**
***

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

त्रिगुण

सुखातला वाटा 
हवाय मजला 
घास तुपातला 
मुद्दलात 

पोट भरलेले 
खिसे भरलेले 
पाहिजे भरले 
अजून ती 

कोण किती कुठे 
होणार रे मोठा 
मिरविण्या ताठा
किती काळ 

नकाच विचारू 
असे प्रश्न काही 
आसक्तीला नाही 
अंतपार 

विक्रांत पाहतो 
दत्ता विचारतो 
मज का करतो 
ऐसा देवा 

बोलल्यावाचून 
दावी तो त्रिगुण
सिद्धान्त हसून 
मजलागी 

अवघे कळून 
अंतरी वळून 
राहतो पडून 
मग मी ही


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

सुत्रधार अवधुत




सुत्रधार अवधुत
***********
चाले पोर खेळ
अवघा गोंधळ
श्रीदत्ता सांभाळ
जगाशी या
लबाड नाठाळ
करी चळवळ
हट्टांचे केवळ
मुर्त रुप
कधी होती पोर
कधी होती थोर
कधी होती चोर
सहजीच
तया हवा खावू
सारा गोड गोड
तया साठी धाड
घाली कुठे
देवून थकलो
सांगुन दमलो
कधी रागावलो
व्यर्थ पणे
करी ते सज्ञान
देई काही भान
जगाचे कल्याण
घडो मग
विक्रांत उगाच
करी हळहळ
जर सुत्रधार
अवधुत
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

भक्तीचिया वाटा




***
देहाची फिकीर 
आहे रे कोणाला 
तुजला वाहिला 
दत्तात्रेया॥

जगाची फिकीर 
आहे रे कोणाला 
तुच भरलेला 
दिसे येथे ॥

प्राप्तीची फिकीर 
आहे रे कोणाला 
प्रेमी आळविला 
तूची मस्त ॥

प्रेमाचा आकार
कळे ना कुणाला 
मनी दाटलेला 
देवा तुच  ॥

पाहू जाता सारे 
गमे इवलेसे 
तव प्रेमा पिसे 
भुललो रे ॥

देई तुझे प्रेम
विक्रांता या दत्ता 
भक्तीचिया वाटा 
नेई बळे ॥



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

ज्ञानदेवा


ज्ञानदेवा
*******

मागतो तुजला
एकच मी दान
कृपेचे कवन
करि मज ॥
जरा हे शब्दांचे
तेज मावळून
घडू दे दर्शन
गाभ्यातले ॥
मागतो चांदणे
चकोराच्या चोची
प्रभा निरभ्राची
दिसो मज ॥
थिल्लराचे जीणे
नको नको आता
व्हावा मी वाहता
महा ओघ  ॥
परी घडे सारे
तव कृपा बळे
एवढेच कळे
मज लागी ॥
म्हणूनिया पायी
ठेवी सदा माथा
सांभाळ विक्रांता
ज्ञानदेवा॥
***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.com

मन देव




मन देव
 ***
मना ओरखाडे
नसावे मनाचे
प्रहार शब्दांचे
कधी काळी

मनाचे सुमन
मनाच्या हातांनी
जपावे हसुनी
सर्व काळ

मनाची देवता
ईश गुरुदत्त
दिसावा सतत
मज तिथे

तिथे बसलेल्या
पुजावे देवाला
जरी त्या देहाला
भान नसे

ऐसी  मती देई
विक्रांत पामरा
दत्त प्रभुवरा
मागणी ही
****

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

दत्तात बुडून


***
व्यापुनी राहावा 
श्रीदत्त सतत 
माझिया श्वासात 
नाम रुपे

हृदयी वसावा 
स्पंदनात दत्त
रक्त कनिकात
एकएक

डोळ्यांनी पाहावा
दत्तची सुंदर
आत नि बाहेर 
भरलेला 

कानांनी ऐकावा 
रव दत्त दत्त 
अणुरेणूत 
साठलेला 

अवघाचि व्हावा
रस रंग गंध 
स्वतः अवधुत
मजसाठी

विक्रांत वहावा 
घट हा भरुन
दत्तात बुडून
तनमन



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...