बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

काळ





काळ !
************

रवी मध्यानीचा
खाली उतरला
काळ्या काजळीची
किनार नभाला

सरलेले वर्ष
मानलेला काळ
जाय उतरणी
देहाचा ओघळ

कल्लोळ भरला
जल्लोष चालला
एकेक दिवस
क्षणांचा सोहळा

कालही मी होतो
आहे नि आजला
काळ कल्पनेत  
जन्म वर्तुळाला

कळताच मन
भ्रम मावळला
अनादि जीवन
हुंकार उरला

विक्रांत नावाचा
आकार मानिला
इथेच होता नि
असेल नसला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

संत कृपा






संत कृपा

सुखाचा पावूस
आसावल्या मनी
संत मेघूटांनी
कृपा केली ||

कृपेचे ते बोल
अनुभूति खोल
हृदयात ओल
पालविली ||

माझेच मजला
पुन्हा दाखविले
रूप विसरले
भ्रमातले ||

काही शब्दातून
काही शब्दविन  
सहज साधन
व्यक्त केले ||

भांडे डागाळले
पुन्हा विसळले
भरून ठेविले
शुद्धपणे  ||

जाहला सार्थक
दिन आज काही
विक्रांत प्रवाही
चैतन्याच्या ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in







रविवार, २३ डिसेंबर, २०१८

देई दत्ता मज



देई दत्ता मज
*********

देई दत्ता मज
जन्म पुन्हा पुन्हा
परी तुझा तान्हा
करी सदा

मोकल संसारी
जगाच्या बाजारी
हृदय मंदिरी
विराजून

फिरव तिर्थांची
कर वा संन्यासी
एकांती वनांसी
मौन ठेवी

जन्मोजन्मी पण
देई प्रेमसुख
भक्ती कवतुक
दावी सदा 

विक्रांत विनवी
दत्ता अवधूता
सांभाळ अनंता
लेकरास


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

स्वप्नभंग


स्वप्नभंग
********** *

वाट तुझी अडलेली
दार अन बंद आहे
धाव घेणे माझे व्यर्थ
एक मूर्ख छंद आहे

देणे तुझे खरकटे
आंबला त्या गंध आहे
कसे म्हणू किती वेळ
जगणे हे धुंद आहे  

जानतो अवमान हा  
उरामध्ये खंत आहे
उतरणे खालती नि
अस्तित्वास डंख आहे

होतो तरी श्वान पुन्हा  
पावुले ओढत आहे
फेकलेले कण तुझे
मानतो आनंद आहे

लोभ हा कसला अन
कसले हे बंध आहे
माये तुझे खेळणे वा
मारणे उदंड आहे

मिट माझे डोळे अन
बुडवून तुझ्यात घे
फेक दूर असे किंवा
होणे शतखंड आहे 

अर्धवट जागेपणी
जगणे दुभंग आहे
विसरणे माझे मला
माझा स्वप्नभंग आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

दत्तास्तव


दत्तास्तव 
********

दत्तास्तव मी
जगतो रे
ह्रदयी खडावा
धरतो रे 
अलख अंतरी ।।
गातो रे 
कळी काळा न 
भितो रे  ।।
दत्ता मजला
तुझा करी  
तुझेच प्रेम 
उरी भरी ।।
जीवन मरण 
माझे वारी
मधली माया 
दूर निवारी ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

दत्ताचिये वाटे


दत्ताचिया वाटे जाता
मन हरवून जाते
भक्ती सुखात रमते
पुन्हा माघारी न येते ।।

दत्ताचिया प्रेमामध्ये
देहभान विसरते
घरदार संसार वा
नच आपुले उरते ॥२॥

दत्ता तुझ्या वाटेवरी
मला सदा राहू दे रे.
दत्ता तुझे गीत नित्य
माझ्या ओठी येवू दे रे ।।

दत्ता तुझे रूप सदा
डोळा भर पाहू दे रे .
दत्ता तुझा भक्त खुळा
असा मला होवू दे रे ॥॥

दत्ताचिया वाटेवरी
विक्रांत बहु रमला
स्वप्न सत्य सुषुप्तीत
दत्त रूपासी जडला।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

घरदार


घरदार
******
ज्याचे त्याला असे
घरदार प्रिय
जपती स्वकीय
आप्त काम ॥

निवाऱ्याची साथ
निवाऱ्यास पिल्ले
निवारा भरले
घरकुल ॥

कुणा जागा वर
कुणास ती खाली
घरटी टांगली
जागोजाग ॥

सहस्त्र घरटी
एका झाडावर
वृक्ष धरेवर
कोटी कोटी ॥

विक्रांत ढोलीत
कुठल्या बसला
स्वर्गात रमला
मनाचिया ॥

खेळ मांडियेला
अनिकेता खुळा
आरंभ अंताला
पार नाही॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.in

आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...