शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

दुनियादारी






लग्न करुनी सुखिया झाला

विनोद हा तो भला थोरला

एकच प्रेम ते खरे चांगले

की जे उलटून आत वळले

पुन्हा बांधला जरी का सुटला

मृग मोहाने न व्याधे मारला

गुरु पदारविंदी तुष्ट जाहला

उठाठेव त्या पुन्हा कशाला

मुक्ती नवरी जया न कळली

व्यर्थ साधना मूढा मिरवली

विक्रांत दत्तचरणी थांबला

दुनियादारी हा खेळ संपला



विक्रांत प्रभाकर तिकोणे


गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

झिजूनिया पाय तुझे







झिजूनिया पाय तुझे
पाप माझे हे झिजेना
पुन्हा पुन्हा प्रदक्षिणा
मी मोजण्यात चुकेना

खांद्यावरी पताका या
गंध भाळी नटलेले 
मिरवितो भक्तपणे 
चित्त का रे मळलेले

म्हणशील जर मला
तुझे तू पाहून घ्यावे 
वज्रलेप पुन:पुन्हा
पायी का मग त्वा हवे

घाटावरी महारोगी
पुण्यवान नाहीत का
अभिषेकी संतसंगी
देहमनात व्यंग का

धावूनी येतील सारे
निकाल घेवूनी हाती
गुन्हेगार पाखंडी मी
शिक्षा ठरलेली होती

युगोयुगी ठेचलेला
प्रश्न अनुतीर्ण माझा
क्रूसावरी तू तसाच
मिटलेल्या डोळियांचा

विक्रांत प्रभाकर तिकोणे




भक्तांची वचने







तुझिया प्रीतीची ऐकुनी कवणे
भक्तांची वचने प्रियकर ||१
प्रेमाने डोळ्यात आसवे भरती
उरी उमटती प्रेम उर्मी ||२
अंतरी दाटते भावना वादळ
अंगी वज्रबळ संचारते ||३
जीवास आधार श्रद्धेस जोजार  
प्रेमास अपार पूर येतो ||४
तुझेच ते दूत हक्काचे हकारी
असे माझ्यावरी ऋण त्यांचे ||५
तयांच्या कथेचे करिता श्रवण 
ओथांबले मन वांच्छा करी ||६
विक्रांत प्रेमाची गोष्ट एक होवो
दत्तराय देवो आलिंगन ||७

विक्रांत प्रभाकर तिकोणे

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

गाणगापुर मंडपी





जाहला गजर नौबत झडली
स्वारी ही आली श्री दत्ताची ||
झपाटली झाडे उठली धडाडी
चढले लोखंडी कमानीस ||
केस सोडलेले मान गरगरी
डोक्यास वर्तुळी घासताती ||
कुणी हुंकारती कुणी भांडताती
दत्ताशी घालती वाद मोठा ||
कुणी गडबडा लोळती सर्वत्र
पायाचे चक्र करुनिया ||
दात करकरा श्वास भरभरा
आता पुरे करा म्हणे कुणी ||
हताश घरचे जिवलग प्रिय
सरता उपाय थकलेले ||
मनाचे आजार भुतांचा बाजार
परंतु आधार भेटलेले ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...