शनिवार, ९ जानेवारी, २०१६

अरे हाड तुझ्या !!








मान खाली घालून
चुकचुकत जगण्यात
काही अर्थ नाही यार  
आहे छडी हातात कुणाच्या
म्हणून आपण मार खाण्यात
काही अर्थ नाही यार
आपले देणे देवून झाल्यावर
काबाडकष्ट करून थांबल्यावर  
घाबरण्यात तर
काहीच अर्थ नाही यार

कामगार आहेस एक
गुलाम मुळीच नाहीस तू
वेळ आणि कष्ट कुणाला  
विकत असतोस तू
आणि दाम त्या कष्टाचे
मोजून घेत असतोस तू
असे मुल्यवान वेळ कष्ट
का कुणा लुटू देतोस तू

आपण जगतो कुणासाठी
घरदार बायकोपोर अन
पोट स्वत:चे भरण्यासाठी
नच कुणा गबर करण्यासाठी
मग देह मनाला ओझ्याखाली
का ओढतोस उगा असा तू
जाणीव पायाखाली कुणाच्या
का घालतोस वृथा असा तू

अरे अपमान अन बलात्कार
आपल्या अभिमानावर
वेश्याही सहन करत नाही
तू तर पांढरपेशी सरळमार्गी
नियमित प्रामाणिक नोकरदार
काय तुझ्यात सत्वच नाही

कधी कधी वाटते
सुशिक्षिता समजूतदारपणा
आदर सन्मान देण्याचे संस्कार
हिजडे तर नाही करत आपल्याला  

कधी कुणी आपल्या दौर्बल्याला
अन हिमटेपणाला लपवत राहतो
पदाच्या पैशाच्या मोठेपणासाठी
अहंच्या इवल्या लोभासाठी
प्रामाणिक कुत्र्या सारखे
दीड दमडीच्या स्वार्थावर नजर ठेवून
अरे हाड तुझ्या हे काय जगणे आहे ?!!

अरे उभा रहा ताठ मानेनी
कधी हात जोडूनी
कधी मुठी आवळूनी
पण आत्मसन्मान आपला
कधीही नको देवूस पायतळी पडूनी

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

जन्म कशाला





 



जगणे  काय जन्म कशाला
प्रश्न उगाच पुन्हा पडला

अस्तित्वाच्या या धाग्याला  
जुनाच ताण थोडा बसला

नावाचीच पाटी होती
काही शब्द पाटीवरती

कोण कुठूनी कधी आला
खबरही नव्हती कुणाला

माझ्यात हा नवीन मजला
कुणी पोसला का कशाला  

कुणाकुणास कळल्या वाचुनि   
तण उगा का आले वाढुनि

एक वन्ही आतून फुटावा  
जगण्याचा या यज्ञचि व्हावा

हवा प्रयत्न थोडा धीर
इथे नसतो कधीच उशीर


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/ 

गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

नाम घ्यावे


अरे नाम घ्यावे ।अरे नाम द्यावे ।जगाशी सांगावे । ओरडून ।।
नामाचा याचक ।येताच दाराला । अवघे तयाला । दान द्यावे ।।
प्रियकर नाम । सुखकर नाम । शुभंकर नाम ।  आवडीचे ।।
नामातून वाटा । नामाच्या फुटती । घेवुनिया जाती । प्रभूदारी।।
एकच ते नाम ।देव वेगाळले ।जरी का वाटले ।अर्चकाला।।
नामाचा संकल्प । मनी उगवला । जन्म उजळला। त्याचा आज ।।
तो माझा सोबती ।मैतर जीवाचा ।घडावा तयाचा ।संग सदा ।।

विक्रांत प्रभाकर
kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...