रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

माता मृत्यू





तीन वाजता जन्मलेला
तिचा मुलगा
नऊ वाजता अनाथ झाला
जणू कुणी कुणावर
होता सूड उगवला
सटवाईने लिहिण्याआधी
काळलेख नशीबा आला ..

कळले मग की   
तिज रक्त गोठण्याचा  
कुठला आजार होता
हे मातृत्व तिच्यासाठी
एक जुगार होता
अन तिने तो खेळला होता
सहा तासाचे मातृत्व
कदाचित
मृत्यूपेक्षा श्रेठ होते
का माता होणे
तिजसाठी सक्तीचेच होते
प्रश्न हे तिच्याचसवेच पण  
आता जळणार होते ...

मातामृत्यू गंभीर घटना
उद्या त्यावर कमिटी बसेल
प्रत्येक पेपर खणून काढेल
अन कदाचित
कुणावर तरी खापर फुटेल  ..

पण मी पाहिले तिचे डोळे
आनंदाने उजळलेले
अन मरणाने कोमेजलेले
अन ते बाळ शांतपणे
पाळण्यात निजलेले  
दु:खाच्या गाठोडीत माझ्या
अजून ओझे जमा झाले
आणि मनावर काही उमटले
जाणार जे ना कधीच पुसले  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

जाणाऱ्यास ...





प्रवासाच्या शेवटी शेवटी
कुणा लागू नये कधी ठेच
जमा केलेल्या सौख्याचा
असा होऊ नये कधी वेच 

उन वारा पाऊस खातांना
निवाऱ्यास रात्र काढतांना
थकते शरीर कण्हते मन
नि चालू पडते उजाडतांना

त्या दुःखाचा अंत होतो
मुक्काम येवून ठेपतांना
शीणभाग अवघा हरवतो
पडाव असा ओलांडताना

का नकळे ही माणसे अशी
उगाच वैर जागते ठेवतात   
देणे घेणे संपणार असते  
तरी जीव जाळत बसतात   

जाणाऱ्यास त्या जावू द्यावे
चूक भूल अन पदरी घ्यावे
आज चालला तो ज्या वाटे
उद्या आपली ध्यानी ठेवावे

तो गेल्यावर स्मृती कसली
आली गेली किती टिकली
जणू धुक्यांनी रेखाटलेली 
आरश्यावरील चित्र इवली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५

जगणे ..






येणारा प्रत्येक दिवस 
जगतो आपण

म्हणजे तीच चाकोरी 
तोच नित्यक्रम

एक मार्ग 
एक ठरलेली कृती

अन पक्क्या प्रतिक्रिया 
यात

वाहत असतो आपण



पोटपाणी तर आहेच रोजचं

पण या इवलाल्या सुख सवयी 

यांत्रिक म्हटल्या तरी चालेल

इतक्या अंगवळणी पडलेल्या

सिगारेटच्या धुरा पासून

ते बाईकच्या किक पर्यंतच्या

लिपस्टिकच्या ब्रांड पासून

नेलपॉलिशच्या रंगापर्यंतच्या

अन यात एक जरी चुकलं

वा मनासारखं नाही झालं

तरी बैचेन होते मन  

अन तरीही आपल्याला वाटतं

हेच तर आहे जीवन



पण हे सर वरवरच

अन अव्याहत चालू राहिलेलं

का चाललंय कळत नाही

जे थांबवता येत नाही

वा थांबायला हवे 
हे सुद्धा कळत नाही

अन आत चालू असतो 

तोच गोंधळ तीच रडारड

तीच अतृप्ती अन तीच व्यथा 

प्रत्येक जन असतो

एक रिकामा फुटका घडा



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...