गुरुवार, ४ जून, २०१५

पितो भूतकाळ




काजळल्या पथी
डोळ्यांना दिसेना
शेवटचे पावूल
कुठले कळेना

तसे तर आधार
लाख सोबतीला  
कुणी न आपला
कळे या जीवाला

घर भरलेले
बरे चाललेले
अतृप्त मागणे
परी मनातले

एकाच लाटेत
सरेल सारेही
वाळूत शब्द
लिहितो तरीही

उजेडावीन छाया
नसतेच कशाला  
पितो भूतकाळ
आज नि उद्याला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in/




जन्म सारा नव्याने...





 


तुज करता न आले मज निभावता आले
रंग प्रीतीचे ओले कुणा जपता न आले
ओथंबले मेघ असे जड भरुन आले
व्याकुळ आस उरी मी सर्वस्व दिधले  
आता त्या क्षणावर गर्द कालथर दाटले
तुझ्यासवे तया उरी खोल मी दफनले
उठतात पिशाच्च देतात त्रास काही
मजविन कुणा ती दिसत परी नाही
नवे गीत नवे वळण कुणी उभा दारावर   
अन सोडून जुनेर मी नव्या देही अलवार  
विझतील डंख जुने फुलुनी स्वप्न सुमने
उभी मूकप्रीत इथे जन्म सारा नव्याने

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २ जून, २०१५

तुझ्या दारी..





हे माझे उदास गाणे
तुझ्या दारी आले कधी
हाकलून त्यांना दूरवर
घालवू नकोस कधी
चोचभर पाणी दे
घासभर प्रेम दे

शेवटचे कडवे
लांबलेच जर कधी
कंटाळून तयास सोडून
जावू नकोस कधी
क्षणभर साथ दे
मनभर दाद दे

फार काही सांगत नाही
गळा ओळ घालत नाही  
तुझ्यासाठी लिहिले तरी
तुला मी मागत नाही
ओठावर हसू दे
पुसलेले आसू दे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, ३१ मे, २०१५

मिठीत मृत्यू प्रियाच्या... (फोटो पाहून सुचलेली कविता...)




 मिठीत जगणे होते
मिठीत मरण आले
हाती जपायचे होते
हातीच सारे संपले

मोडुनी घर पडले
स्वप्न मातीत संपले
स्वप्नांतील पाखरांचे
पंख धुळीत मिटले

कसला खेळ असे हा
रे कोण खेळतो क्रूर  
विझलेले श्वास तप्त
थिजला वेदना पूर

देहाचा कोट भेदुनी
कृतांत गेला घेवूनी
एका फुलल्या बागेचा
क्षणी पाचोळा करुनी

मिठीत मृत्यू प्रियाच्या
भाग्य असते कुणाचे
परि असह्य भीषण  
का वरदान शापाचे

मिठीत गेल्या युगुला
नकळे काय वदावे
करी प्रार्थना प्रभुला
असे कुणा न न्यावे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


 



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...