बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

मनातून या ती गेली नाही






अजून आशा संपली नाही
अजून चिता पेटली नाही
लोचट स्वप्न रेंगाळलेले
मनातून या ती गेली नाही

किती उधळू जीवन गाणं
जगण्या काया विटली नाही
मनात प्रीत वेल अमर
ओल कधीच जळली नाही 

येईल सखी वा न येईल
नजर वेडी थकली नाही
देहाचीच या वाट जाहली
अन प्रतिक्षा सरली नाही

कठीण असते वाट प्रेमाची
भिणाऱ्यास ती कळली नाही
उगा करणे हिशोब काही
अरे रीत ती इथली नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

विजेला जायचेच असते का






मानही न वळवता तू गेलीस
मला पाहूनही न पहिल्या सारखी
क्षितिजाच्या कडेकडेनी
अंग चोरुन गेलेल्या नभासारखी
अन मी कललेला भिंतीवर
तसूभरही न हलता
उभा होतो मख्खा सारखा
दृष्टीच्या विस्तारातून पाहत तुला
हळू हळू अंधुक होणाऱ्या नजरेनी ..
असेही कधी होईल
वाटले नव्हते मला
तू गेलीस अन
मोहळ उठल्यागत मन
तुझ्या आठवांनी उधाणून आले
तुझे हसणे बोलणे रुसणे ..
अन ते शेवटचे चिडणे
तळव्यात घुसलेल्या काट्यागत
अचानक अनपेक्षित
मी विव्हळ अन विदीर्ण
माझ्यातच भग्न
अन तू सुटलेल्या बाणासारखी
गेलेली माझ्या शब्दांना धुडकारून
कारण न घेता समजून  
तेव्हा ही तुझे अभिमानी मन
लखलखत होते
तुझ्या डोळ्यातून अन चेहऱ्यातून
विजेला जायचेच असते का सारेच जाळून

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



शनिवार, ७ फेब्रुवारी, २०१५

नेमाडे कधी वाचलेच नाही ..



  नेमाने ज्ञानेश्वरी वाचणारे आम्ही
नेमाडे कधी वाचलेच नाही
नाही म्हणजे कधीतरी एकदा दोनदा
हातात कोसला घेतला होता
पण इतका जीव गुदमरला की
कोश कधीच पुरा केला नाही
हिंदुच्या तर नावानेच धसका घेतला
अन त्या पायरीलाही पाय लावला नाही
पण आता या ज्ञानपीठवाल्यांनी
इतकी काही पंचाईत केली आहे
खरच सांगतो माझ्यातील मराठीची
सारीच हवा काढली आहे
सोडून दिलेले कोडे पुन्हा एकदा
द्यावे कुणीतरी सोडवायला
अशीच काहीशी वेळ वगैरे...
आता आली आहे माझ्या वाट्याला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/










झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...