गुरुवार, १ जानेवारी, २०१५

कविता like होणे !







मला माहित आहे
माझ्या कविता लाईक
करणाऱ्या मित्राला
माझी एकही कविता
आठवणार नाही .
तरीही मी कविता
लिहीतच राहणार
अन तो त्यांना
लाईक करत राहणार .
माझ्या कवितेशी फारसे
देणे घेणे नसते त्याला
त्याला कविता कळावी
असे म्हणणे नसते माझेही  
पण त्याचे लाईक करणे
थाप असते खांद्यावर
चालू दे रे तुझे म्हणणारी  
मैत्रीला दृढ करणारी
..........
अन माझे कविता लिहिणे
म्हणजे तरी दुसरे काय असते
नर्मदेत दिव्याची होडी सोडणे असते
साऱ्याच हळू हळू वाहत
दूर दूरवर जातात
काही छान पेटतात
तर काही क्षणात विझतात
पण मन भरत नाही  
अन दिव्यांनी नटलेला प्रवाह
किती सुंदर दिसतो .
सार्थक होते माझ्या शब्दांचे.

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





सोमवार, २९ डिसेंबर, २०१४

अशनी






तुझ्या झिडकारण्याचा
एक दगड
माझ्या दुःखाच्या
उंच ढीगावर पडला
किंचितसा
आवाज झाला
अन कुणाला
पत्ता ही न लागला
का प्रत्येक चांदणी
माझ्या मनातील
अशनी होऊन
खाली पडणार
हे माहित असते
या जगाला

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २८ डिसेंबर, २०१४

मेलेल्या बकऱ्याला






मेलेल्या बकऱ्याला
नाव नसते गाव नसते
घर नसते दार नसते
प्रत्येक बकरा असतो
प्रथिनाचा ढीग
चविष्ट रुचकर
भूक वाढवणारा
चव जागवणारा
त्याचे हुंदडणे बागडणे
दुध पिणे चरणे
शिंग खाजवणे
सहज पुसून टाकता येते
विस्मृतीच्या फडक्याने
एका क्षणात
मालकाला धन मिळते
कसायाला फायदा
खाणाऱ्याला सुख ..
जन्मलेल्या प्रत्येक जीवाला
मृत्यू हा असतोच
असा नाहीतर तसा
त्याच्या देहाचे जन्माचे
सार्थक झाले
चला पान खावून येवू यात !


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २७ डिसेंबर, २०१४

देखणी





ती सुंदर गोरीपान
नाक डोळे छान असलेली
सुडौल तरुणी
अलीकडेच लग्न झालेली
सौभाग्याची लेणी नवी
देही मिरवणारी
जेव्हा काढू लागे
रस्त्यावरील कचरा
मुन्सिपाल्टीच्या गणवेशात
घेवून खराटा हातात

येणाऱ्या जाणाऱ्या असंख्य नजरा
उंचावत थबकत तिला न्याहाळत
काहीश्या नवलाने अचंब्याने
आणि खूपश्या वैषम्याने
अन जाता जाता बरेचसे ओठ
उगाचच वाकडे होत

ती सराईतपणे
इकडे तिकडे पहिल्या वाचून
आवरत असे आपले काम
जोडीदारीनीला देत साथ
एक एक ढीग उचलत
ढकल गाडी पुढे सरकवत

अन माझ्या डोक्यात
कुठेतरी ऐकलेले ते वाक्य
पुनःपुन्हा तरळून जाई
“नक्षत्रावानी देखणी
आहे माझी पोर
नक्कीच सजवीन
कुण्या राजाचं घर “!

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...