रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

अश्रुविन हातात न राहिले काही






अश्रुविन हातात न राहिले काही
आक्रंदन मनात या भरुनिया राही

घोड्यावरी बसुनी तो मंडपी आला
सजुनी पैठणीत ती खांद्यावरी शेला
सनईसवे मंगलाष्टक नाद नभी मिनला
कोपऱ्यात दूर मी विवश सारे पाही

 
अश्रुविन हातात न राहिले काही
आक्रंदन मनात या भरुनिया राही


उधळल्या अक्षता वाजंत्री वाजली
तयाच्या जीवनाची वाट सुरु झाली
जाहली बिदाई गाडी निघून गेली
प्रीत परि माझी मी भग्न उरी वाही

अश्रुविन हातात न राहिले काही
आक्रंदन मनात या भरुनिया राही

विक्रांत प्रभाकर

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

माळवे (मनात राहणार व्यक्तिमत्व )




आवाज कुणाचा !!
कामगार एकजुटीचा विजय असो !!
ही वाक्य कानी आली की
मागे वळून पहायची गरजच नसे  
ते माळवेच असणार
यात मुळी शंकाच नसे .

धीरगंभीर चेहऱ्याने,आवाजाने
कामगारांचे नेतृत्व करणारा
त्यांचे प्रश्न मांडणारा
तर कधी कधी त्यांना
वडिलकीच्या नात्याने
उपदेशांचे डोस पाजणारा
खराखुरा कामगार नेता .

तरीही आपल्या कामात
कुठलीही कुचराई न करता
वरिष्ठांचा अपमान न करता
दोन्ही पक्ष सांभाळले त्यांनी
तारेवरची कसरत करता करता

आवाजात नम्रता आर्जव
आणि कळकळ असे त्यांच्या
निर्भीडपणा स्पष्टवक्तेपणा
आणि खास माळवी खर्ज
स्वरात उमटायचा न चुकता

त्यांनी केले एक स्थान
मनात आपल्या सर्वांच्या
खरतर इथे सत्काराहून
ठेचाच जास्त बसल्या त्यांना
स्वीकारले सारे त्यांनी
कुठलीही कटकट न करता
अन सतीचे वाण समजून
झेलली संकटे लढता लढता 

अश्या व्यक्ती दुर्मिळ असतात
सदैव आपल्या मनात राहतात
मनात ठेवायला त्यांना
मित्रही धन्यता मानतात

डॉ.विक्रांत प्रभाकर  



शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

“ सेल “





सुखाच्या या बाजारात
दु:ख असे मांडलेले
धावतात वेडेपिसे
सेलसाठी हाकारले

रंग रुपी सजलेला
सनातन माल नवा
काळ घेतो मोल व्याजे
तरी प्रत्येकाला हवा

कुणासाठी व्यापार हा
चाललाय नच कळे
देणे घेणे जुने किंवा
अर्थहीन खेळ खुळे

विक्रांत प्रभाकर


गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

उतार




उतार तर कधीच सुरु झालाय
अर्धा अधिक तर संपूनही गेलाय
उतारावर कळत नाही
पावुले कशी भराभर पडतात ती
वर्ष कधी झरझर सरतात ती
सर्व काही तसे ठिक चाललेले असते
अन अचानक वाटते
आपण हा चढच चढलो नसतो तर
तर कदाचित दुसऱ्या उतारावर असतो
अन ठरवूनही टाकतो
तो दुसरा वेगळा चढ उतार
याहून सुंदर असता
अर्थात त्याला काही अर्थ नसतो
ना चढ बदलणार नसतो वा उतार
ना ते चालणे कधी थांबणार     
वा थबकणार झिरपणारा अंधार
पण त्या निर्णयाचा आपला निश्चय
किती तरी वेळा
प्रश्नचिन्ह उभे करतो आपल्यासमोर
मग कधी मेघा आठवते तर कधी रीना
विसलेली कितीतरी नावे ...
डोळ्यासमोर येतात धूसर चेहरे...
अंधुक प्रसंग...
अन जाणवते इतकी वर्ष झाली तरी
आपण अजून तेच आहोत
सुखाच्या शोधात निघालेल्या  
सिंदबादा सारखे
सफरीची हौस न फिटलेले
वेडे मुसाफिर
या संपत आलेल्या उतारावरही

विक्रांत प्रभाकर


प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...