बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

डस्टबिनचे माझे प्राक्तन..





मनातील आशा मेली की
जगणे फार सोपे असते
कारण आता तुम्हाला
कसलीच भीती नसते
जशी भिकाऱ्याला
चोरीची भीती नसते
अथवा वेश्येला
अब्रूची भीती नसते
थोडक्यात घालवण्यासारखे
काही राहिलेले नसते
अन मिळविण्यासारखे
काही उरलेले नसते
तुझ्या प्रेमाबाबतही
मला असेच काही
होवून गेले आहे
ओल्या टिश्यूपेपरगत
जगणे झाले आहे
डस्टबिनचे माझे प्राक्तन
मी स्वीकारले आहे

विक्रांत प्रभाकर

तिज कसे उमजावे ..



चार थेंब पाण्यासाठी
जळुनिया कोंब गेले
तिच्याहाती भांडे तरी
तिने हात बांधलेले

मरणार्‍या प्रत्येकाला  
जीवनाचे दान हवे
कोण किती रुजलेला
तिज कसे उमजावे

तसे तर माळ सारे
उभे सारे तहानले
कुणाकुणा तिने द्यावे
तनमन थकलेले

एक आता भरवसा
मेघुटांच्या मालकाचा
वाहुनिया क्षोभ जावा
लादलेल्या जीवनाचा

विक्रांत प्रभाकर
kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

रस्त्यावरील म्हातारी






पावलो पावली
थबकत थांबत
चाले म्हातारी
पाय ओढत

धापा टाकत
कपाळ पुसत
नकळे कुठले
ओझे वाहत

शुभ्र केस
त्वचा रापली
चेहऱ्यावरती
विणली जाळी

जुनेर साडी
जुनाट पोलके
जीर्ण पायताण
अंगठा तुटके

होती सभोवत
गर्दी धावत
कुणी न पाहत
कुणी न थांबत

नाव जणू ती
पाण्यामधली
शीड सुकाणू
नांगर तुटली

हळू हळू ती
वळणावरती
सांज उन्हागत
गेली निघुनी

मनी माझ्या
एक उदासीन
कातर संध्या
आली दाटून

मला कदाचित
असेल दिसले
शेवटचे दिस
माझे उरले

अथवा अर्थहीन
जगण्यामधले
सत्य उजाड
पथी सांडले

विक्रांत प्रभाकर

रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

माय नर्मदा






तीच खळखळ
पुन्हा कानात
तीच हिरवळ
पुन्हा डोळ्यात
तोच गंध
ओला प्राणात
शीतल स्पर्श
कणाकणात
ओढ लागली
या हृदयात
माय नर्मदा
घाली साद
तिथेच माझा
स्वर्ग साठला
पावुलात अन
मोक्ष दाटला

विक्रांत प्रभाकर

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...