शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

टक्का मागे आरक्षण





बारा गावचा पाटील
टक्का मागे आरक्षण
देश सोडून निघाला
दूर दृष्टीचा ब्राह्मण

टक्का हवा प्रत्येकाला
जातीमध्ये राखलेला
प्रजा नागडी रानात
तिला कधी ना कळला

देश जातीत बांधला
देश जातींनी तुटला
देश नकाशी उरला
फक्त झेंडा वंदनाला

अशी जातींची डबकी
वर्ष हजार कुजली
धरू धरुनि किड्यांनी
प्रजा वाढ वाढवली

ज्यांनी संपवावी जात
त्यांनी बलवान केली
क्षुद्र करंट्या अंधांनी
घरे भरुनी घेतली

राष्ट्र हवाय कुणाला
धर्म हवाय कुणाला
साऱ्या जातीचेच राज्य
सुख हवंय वंशाला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

साधना ..







साधना ..

तुला भेटू तरी कसे
मज काहीच कळेना
जन्म चालला उगाच   
मज थांबणे घडेना |
ही वाट जन्मांतरीची
कि आताच चालण्याची
कोडे सुटेना काहीच
भूल नकळे कश्याची |
तुवा मानुनी सर्वस्व
जीव ओतला सगुणी
केले सायास कितीक
काही येईना घडुनी |
सत्य सांगतात इथे
हात उभारुनी कुणी
खरे मानावे ते कसे
न ये डोळा जे दिसुनी |
दाह अंतरात असा
मज जाळे दिनरात
वाट सोडूनी धावतो      
कुठकुठल्या वनात |
जरी रंगतो जगाच्या   
कधी सुख सोहळ्यात
भोग भोगतांना उर
तळमळे अंतरात |
ग्रंथ वाचले अपार
माथी बांधीयला भार
ज्योत पेटलीच नाही
तेल ओतले अपार |
जाता संताना शरण
आड आला अभिमान
सूर्य भजता म्हणता
भिते चटक्यांना मन |
वेडी आस पूर्णत्वाची
कशी कुणाला कळावी
घडे टवाळीच घरी
दारी फजितीच व्हावी |
त्याग घडता घडेना
भोग परंतु जमेना
अशी अंतरी बाहेरी
घडे माझी सारी दैना |
कधी सोडूनी पाहीले
परि सुटलेच नाही
विष रक्तात भिनले
ओठ शमलेच नाही |
गेलो शरण कुणाला
झाले तेही अहंकारी
दान दिले मंत्रासाठी
कर्म चक्क व्यवहारी |
यत्न सारेच खुंटले  
मार्ग सारेच अंधारी
आलो वळूनी अंतरी
पुन्हा तुझ्याच मी दारी |
होई कृपेची दामिनी
टाक खंडित करुनी
तुटो अस्तित्व हे जड
जन्ममरण टोचणी |
नच जगण्याची क्षिती  
नच मरणाची भिती
काही कळावे फक्त
मोल जीवनाचे हाती |


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/













मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४

तुझ्या शोधाच नाटक






सारी शक्ती एकवटून
मोठी आशा धरून
मी निघालो होतो
तुझ्या शोधात
त्यांनी सांगितलेला
अन शिकवलेला
प्रत्येक प्रकार
करून पाहत
गावे पालथी घातली
तीर्थक्षेत्रे धुंडाळली
थकून भागून
आलो परत
तू सापडला नाही
पण त्या शोधात
जे काही सापडलं
तेही कमी नव्हत
ते कळाव म्हणून
तुझ्या शोधाच
नाटक कदाचित
रचल गेल होत  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...