शनिवार, २६ जुलै, २०१४

काजळ घातलेले डोळे





काजळ घातलेले
तुझे रेखीव डोळे
खुळ्या जीवाला
भूल पाडणारे
वेड्या मनाला
साद घालणारे
अगम्य कृष्णडोह
चांदण्यात भिजलेले

सारे काही विसरून
सारे काही हरवून
त्यात होवू पाहते
माझे जीवन   
आजन्म बंदिवान
अगदी स्वखुशीन

आता कुठलाही  
इतिहास 
अन कुठलाही 
वनवास
त्याला त्यातून दूर
जावू देणार नाही
तुझे काजळे
पुसून गेले तरीही

एवढीच अट
परतीची पायवाट
टाक पुसून  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



तिच्यावरील कविता






म्हणालीस मला तू  
अलिकडे मजवरती
कविताच लिहित नाही
नक्की लिहीन म्हटल मी
खरं तर मला
तुला नाही म्हणण
जमतच नाही
पण कसं सांगू तुला  
तुझ्या सवे घालविल्या
क्षणांची धुंदी
उतरता नाही उतरत
मी जगत असतो   
पुन्हा तुझ्या सोबत
त्या क्षणांच्या सोबत
त्या शब्दांच्या सोबत
कविता जगत.. 
तुझ्या हसण्याच्या
प्रफुल्ल किनाऱ्यावर
असतो उगाच भरकटत
खळाळत्या लहरीसवे
दूरवर वाहून जात
वा कधी तुझ्या केसात
अडकलेला माझा जीव
उगाच असतो फडफडत
तुझ्या बटीची इर्षा करत.. 
ते सगळ शब्दात
खरच नाही उतरवता येत
कधी कधी वाटत
मी लिहिलेले शब्द
मलाच हसतात 
पण तुला कबुल केले
लिहायला तर हवच
म्हणून कागद पेन घेतो
डोळ्यासमोर तुला आणतो
पण तुझ्या प्रेमाच्या
धुवांधार पावसात
शब्द शब्द वाहून जातो
या भिजल्या कागदात
आणि भिजल्या शब्दात      
बहुदा तुला कधीतरी
माझी कविता सापडेल
कदाचित मी सुध्दा !

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, २४ जुलै, २०१४

तुझ्यामुळे





माझे गाणे
तुझ्यामुळे
जगणे हे
दरवळे  

माझे स्वप्न
रोज नवे
त्याला तुझे
रूप हवे 

माझा हट्ट
तुझ्यासाठी
डोळा पडो
तुझी दिठी

माझे भान
अनावर 
तुझे नाव
ओठावर 

माझा जन्म
नवा झाला
तुझ्या मुळे
उजळला 

होशील का
कधी माझी
वही तूच
कवितेची

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २३ जुलै, २०१४

तिचे दु;ख आणि पिंपल्स


 

मी देवाला म्हणालो
देवा,
तिचे थोडेतरी दु:ख
तू मला दे !
तिला हसतांना
मला पाहू दे !
अन
सकाळी पाहतो तर
माझ्या चेहऱ्यावर
दोन पिंपल्स आले होते .


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...