सोमवार, २३ जून, २०१४

माझी मैत्रीण





अति सलगी करता
डंख बसतो जहरी
ती माझी मैत्रीण आहे
अगदी स्पष्ट करारी

अवाढव्य शहरात
कांक्रीटच्या जंगलात
वाघ असती बसले
संभावित पोषांखात

माहित तिला सगळे  
जग असते कसले
कसे हेरती सावज
दबा धरून बसले

कधीकधी कुणी तिला
बागेत चल म्हणतो
सिनेमाची कुठल्याश्या  
गळ मुद्दाम घालतो

कुणी खुश करण्यास
गिफ्टही घेवून येतो
असा तसा गळ तिथे   
संधी पाहत असतो    

चाबकाच्या फटक्याने
कधी त्यांना थांबवत
गोड सावध शब्दाने
दूरवर थोपवत  

ती तिच्या जीवलगाला
असते मनी पाहत
त्याचे चित्र मनोहारी
हृदयात चितारत

बरसतो सूर्य कधी
वीज नभी कडाडते
ग्रीष्म तीच तीच वर्षा
होवूनिया वावरते

सदा लाभो सौख तिला
माझ्या मनी वाटतसे
तिच्यासाठी का न कळे
मैत्र सदा जागतसे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २२ जून, २०१४

संगीतकार रोशन






(लोकसत्ता मध्ये रोशन वरील डॉ.मृदुला जोशी यांचे लेख वाचल्यावर सुचलेली कविता

हसता हसता सुंदर जीवन
ठसका लागून गेले संपून
पण सुरांचे रेशमी झुंबर
अढळ झाले व्यापून अंबर
त्यांचे दैवी लयीत बांधले  
गाणे हरेक हृदयी भिनले
कधी फुलावर हळू झुलणारे
कधी वाऱ्यावर भिरभिरणारे
गाडीवाना मुखी कधीतर
सम्राटाच्या चीर दु:खावर  
अवघे रंग ते प्रेमामधले
अलगद येवून सूर बनले
जीवन अर्थ कधी झंकारत
सात सुरातून आले लहरत
अपार आर्त उरात दाटले
नयनामधुनी कधी ओघळले
सूर गंधर्वा त्या जादूगारा
माझ्या शब्दांचा हा मुजरा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, २० जून, २०१४

पोलीस भरतीत मेलेल्या मुलांना




गावामधुनी दूरदूरच्या
वेडी आशा घेवून आली
भरतीमध्ये उष्माघाती
पाच लेकरं मरून गेली
घर विझले द:ख फुटले
माळावरती कुणी आक्रंदले
अन मातीच्या छपराखाली
त्या आईचे  दूध जळले
**
भक्कम देह निधडी छाती
काटक राकट पोरं मराठी
कुणा तुघलक लहरी साठी  
होवून गेले होते माती
कुठल्या तरी अजान जागी
मरतो का कळल्या वाचूनी
तडफडणारी क्षुब्ध यात्रा
भडकून क्षणात गेली विझुनी
**
आणि तरीही जीव हजारो
पाणवठ्यावर येतच होते
कोण जाणार कोण राहणार
जरी कुणाला माहित नव्हते
रस्त्यावरती कुठेतरी ते  
यमदूत ही बसले होते
जगण्यासाठी मरणाला  
कित्येक स्पर्शून जात होते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




नकोस करू चिंता सखी ...




अवघडलेले जीवन माझे
सुटलेले आधार आहे
मी न मागतो हात कुणाचे
हाती दु:ख अपार आहे

नकोस करू चिंता सखी
मैत्र मी राखणार आहे
माझ्या सवे दु:ख माझे
मी सरणावर नेणार आहे

ते प्रेमाचे बोल हळवे
तुझे मजवर उधार आहे
उगाच हसणे शुभ्र चांदणे
उरल्या श्वासा आधार आहे

जाशील तू ही तव वाटेने
दु:खात भर पडणार आहे
मी गेल्यावर दुनियेमधुनी
तू ही थोडी रडणार आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


  

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...