शनिवार, १७ मे, २०१४

ययाती ..




पेगमधील उंची मद्याचा
शेवटचा घोट घेवून
चढू लागलेली झिंग
डोक्यामध्ये साठवून
हळू हळू तो उठला.
जडावलेल्या देहाने
आपल्या प्रचंड मोठ्या
स्टुडीओत फिरू लागला
कित्येक सुवर्ण आणि
रौप्य महोत्सवी यश
साजरी झाली होती इथे
कित्येक महत्वकांक्षी स्वप्नं
उधळली गेली होती इथे
पद पैसा प्रतिष्ठा प्रेम
मान सन्मान वैर अभिमान
पडद्या शिवाय तेच जग
प्रत्यक्ष जगत होता तो
पंच मकारांच्या यज्ञात
देवच झाला होता तो
आता ही त्याचे नाव होते
दरारा होता भय होते  
दरबारात वजन अन
वाढणारे धन होते  
पण ..
पण ते दिवस गेले होते  
तसे भोगणे घडत नव्हते
तो स्पर्श हर्ष विरघळणे  
तो गंध सुगंध धुंदावणे
ती मस्ती सुस्ती उधळणे
हाती असून सारे काही     
जणू काही काही नव्हते   
विकल गात्रे अन मन अभिलाषी
सुखपोभोगाच्या लहरी लक्षी
“आयुष्य किती छोटे असते “
गर्द सिगारी धूर फेकत
जणू स्वत:ला धुरात दडवत
स्वत:शीच पुटपुटला तो .
थोडा लडखडत तोल सावरत
त्याच त्याच्या मयखान्यात
पुन्हा एकदा शिरला तो
ती ययाती दीर्घ आसक्ती
सर्वव्यापी घेवून अतृप्ती   
स्कॉच शरण गेला तो .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, १६ मे, २०१४

नवा पुरोहित





असहायतेत तडफडणारा
माणूस जागा होत आहे
क्रोध हा विद्रोह होवून
आता उफाळत आहे

मेलेल्या डोळ्यात त्या
आगडोंब जळत आहे
त्या आगीत सुप्त सूड
वर्ग होवून वाढत आहे

शांती प्रेम अहिंसा
देवघरात मूर्तीत आहे
आग्रही गंभीर कट्टरता
गर्दीमध्ये मिरवत आहे 

मोठमोठ्या घोषणा देत   
ते आता सांगत आहे
आहोत आम्ही आहोत रे
लाऊडस्पीकर घुमत आहे    

अमुक देव मानू नका
त्या प्रार्थना व्यर्थ आहे
तमुक पुजा करू नका
करणारेही धूर्त आहे

आग्रहाने शपथा वचने
दिल्या घेतल्या जात आहे
श्रद्धे वाचून धर्म जीवनी
पुन्हा परत येत आहे

एका पुरोहिताची जागा
आणि दुसरा घेत आहे
झुकण्यासाठी मस्तक
नवी जागा शोधत आहे 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



गुरुवार, १५ मे, २०१४

सात पोलीस


पोटासाठी सात पोलीस
बॉम्बस्फोटात ठार झाले
आम्ही आपलं म्हणतो उगा
देशासाठी शहीद झाले
या आधी कुणास ठावूक
किती एक वाया गेले
दोन दिवसा बातम्या
भिंतीवर फोटो उरले
तुमच्या माझ्या सारखेच 
साधेसुधे लोक होते
सुनील सुभाष दीपक
आजुबाजुस राहत होते
झाली असती बदली
एका पायी गेले असते
आयपीएल ग्राउंड वर
बंदोबस्ती बसले असते 
बदलीसाठी टक्का नव्हता
दरबारी एक्का नव्हता
मरणाशी नाईलाजे म्हणून
सौदा पक्का होता
...........
सैन्य हवे जिथे तिथे
कवायत केली जाते
निरपराधांच्या हत्येने 
का कधी क्रांती होते

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


 


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...