गुरुवार, ८ मे, २०१४

विलास आपटे (हिमोफिलियाचा शाप )



विलास आपटे ( श्रध्दांजली )

हिमोफिलियाचा शाप घेवून
आलेला देखणा गंधर्व .
आजारानं आलेल्या
अपंगत्वाला न जुमानता
रुबाबात जगणारा
मनस्वी रसिक माणूस .
त्याला माहित होतं कुवती पेक्षा
खूपच खालच काम करतो आपण
पण आलेलं प्रत्येक काम
संपूर्णपणे निभावलं त्यानं
मरणाशी पैजा घेत जगतांना
आजाराशी शांतपणे लढतांना
त्रागा त्रास वैताग कधीही
दिसला नाही वागतांना
कितीवेळा कुठ कुठ 
रक्तस्त्राव व्हायचा त्याला
महागडं इंजेक्शन घेवून
हसत हसत पुन्हा तो
रुजू व्हायचा कामाला
हात वर करून बराय म्हणायचा
त्या आजारावर पीचडी करू शकेल
एवढी माहिती होती त्याला
सारे कॉम्प्लिकेशन सारे उपचार
भोगून माहीत होते त्याला
शेअर मार्केटची मैत्री होती
खाण्यावर भक्ती होती
मित्रांवर प्रीती होती
सौंदर्यासक्त दृष्टी होती
तरीही लग्न कधी केले नाही
चार दिवसाच्या चैनी साठी
कुणाचे आयुष्य बरबाद केले नाही
भाळी आलेलं प्राक्तन
कुणाच्या माथ्यावर लादलं नाही
सदैव प्रसन्न हजरजबाबी
विलक्षण बुद्धिवान व्यक्ती होती
आजाराआडून आलेल्या आजारानं
त्याचा घात केला
चतुर चाणाक्ष मित्र आमचा
आम्हाला सोडून गेला
कधी कधी म्हणायचा तो
इंजिन ऑईल गळणारी
गाडी आहे आमची
कधीतरी कुठल्या वळणावर
थांबली कि थांबलीच
ऑईल आपलं अनरिप्लेसेबल
चालेल तेवढ चालेल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, ७ मे, २०१४

विजयी हार..


अजुनी माझ्या हृदयात
अव्यक्त अधीर थरथर आहे
शिणल्या या वेड्या मनात
अतृप्त धुंद काहूर आहे
मोडून गेल्या वाटा तरीही
व्याकूळ उत्सुक नजर आहे
तिचे अबोध खट्याळ डोळे
निग्रह जळला कापूर आहे
किणकिणते हास्य भोवती  
शीतल शांत लहर आहे
माझी माझ्यासमोर सदैव  
एक विजयी हार आहे
  
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, ६ मे, २०१४

मरे संन्यासी



मरे भिकारी 
भिकाऱ्या गत 
मरे राजाही 
सारे कवळत 
परि असेही 
दिसते कौतुक 
मरे संन्यासी
खरे  हासत
देहा कधीच 
होते  टाकले 
मनही होते 
पुसून गेले 
चितेवरच्या 
सांगती ज्वाला 
आग मिळतसे  
पुन्हा आगीला 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ५ मे, २०१४

बहाणा



ज्या एका क्षणी
कळते आपल्याला
जीवनाची व्यर्थता
त्यात असलेल्या
सुखदुःखाच्या
घट्ट मोळीसकट  
आपण एक
बहाणा शोधतो
ती व्यर्थता
सदैव नाकारतो
"तसा तर
सूर्यास्त रोजच
होत असतो.."
आपण म्हणतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


ट्राफिक


  

गोंधळ गदारोळ धावाधाव
प्रत्येकाला पुढं जायचं होतं
लागलेल्या सिग्नलशी
प्रत्येकाचं वैर होतं
इंचाइंचाने सरकणारे टायर
क्षणाक्षणाला ओकणारा धूर
क्लच ब्रेक एक्सलेटर
अन इंजिनचे गुरगुर  
दचकून वैतागून चुकून
वाजणारे कर्कश हॉर्न
आवाजात विरघळणारी
एखाद शिवी कचकन
रस्त्यास नव्हती उसंत
अन गतीला अंत
माणसाचा शब्द ना
कुठला चेहरा जिवंत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...