रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

ए .आर .डी .एस पेशंट

रात्री ८ वाजता आलेला पेशंट
होता धापा टाकत सांगत
तीनच दिवसांचा ताप फक्त
दुपार पासून दम आहे लागत

पाहताच त्याला
ऐकताच हिस्टरीला
लगेच कळून चुकले मला
पेशंट ए .आर .डी .एस  आला

तरूण तीस वर्षाचा
धडधाकट देहाचा
कर्ता सवरता स्वामी घराचा
बाप मुलांचा पती कुणाचा

डायग्नोसिस कसले ते
डेथ सर्टिफिकेटच होते  
त्याला कळण्या आधी
मरण मला दिसत होते

भराभरा अॅडमिशन केले
त्याला आय.सी.यु.त नेले
अन वाटले होते तसेच
व्हेंटीलेटर वर टाकले

आता हाती काही नव्हते
मशीन काम करत होते
बघता बघता सॅटूरेशन
आणि झाले खाली पडते

चार तासाचा पाहुणा  
आमचा होता तो
त्याच्या त्या प्रवासाचा
मी फक्त साक्षी होतो

कळूनही मृत्यू
टाळता आला नाही
जाणूनही आजार
रुग्ण बरा झाला नाही

पुढचा सारा सोपस्कार
उरकला खरा  
हात ठेवून खांद्यावर
मृत्यू गेला जरा .

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२

दर्शन रांग


दर्शन रांग लांब पसरत  
होती सरकत नम्रपणे
लक्ष घड्याळी चप्पल आठवत
उजळणी करत मागण्यांची  
अदृष्यातून काही अपेक्षित
श्रद्धा म्हणत लाचारीला  
जे न मिळे ते पकडू पाहत
लाच देत  दिव्यत्वाला
आखडत वर पाकीट सावरत
भाव आणत खात्रीवाचून
मिळवण्याला इहपर लोकात
चाले धूर्त गुंतवणूक

विक्रांत              

आत्मकृपा


कृपेवाचून गुरूच्या
देव भेटणार नाही
कृपेवाचून स्व:तच्या
गुरु भेटणार नाही

विफल  यत्नांच्या
बसून मनोऱ्यावर
साद हृदयातून जोवर
उमटणार नाही

आत्मकृपा तोवर
होणार नाही


विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१२

हॉस्पिटलच्या बेडवर


दोन वर्षाचे पोर
हॉस्पिटलच्या बेडवर
तुटुनिया दोर
आयुष्याचा
भोवताली डॉक्टर
स्वीकारून हार
अन आवारावर
करे आया
वाहे ऑक्सिजन
रित्या नळीतून
अर्धी इंजेक्शन
भोवताली
सुन्न बाप
बहिऱ्या कानान
डॉक्टरांच म्हणन
ऐकत उभा
वऱ्हांड्यात माय
घे भिंतीचा आधार
आसवांचा पूर
वाहे ऐकटीच
रक्त दाटले डोळ्यात
पिळ पडे आतड्यात
मन चिणले भिंतीत
ओल्या दगडी 

विक्रांत



रविवार, ३० सप्टेंबर, २०१२

तू


तू चैतन्य या घरातले
तू स्फुरण माझ्या गाण्यातले
तू चांदणे माझ्या मनातले
तू स्वप्न पूर्णत्व पावले
तू उर्जा मम कार्यातील
तू आस्था या घरातील
तू रक्षा कणा कणातील
तू प्रेमा या जीवनातील 

विक्रांत  

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

घेवूनी हातात बंदुका


घेवूनी हातात बंदुका
जग बदलत नाही
बदलली जरी सत्ता
सत्ताधारी बदलत नाही

तेच नाटक तेच थियेटर
जातात फक्त नट बदलत
आम्हीही तेच प्रेक्षक
राहतो अन टाळ्या पिटत

मान्य आम्हालाही आता
शब्दात नुरली काही ताकद
अन साहित्य झाले आहे
कपाटातील पिवळे कागद

पण आग होऊन जळलेल्यांचे
ऐकतो वा वाचतो वचन
आत विझल्या राखेमध्ये
चमकून उठतात अग्निकण

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२

ती येते अन मुद्दाम

ती येते अन मुद्दाम
मला न भेटताच जाते
तिला कदाचित माझी
का स्वत;ची भिती वाटते

काय अजूनही डोळ्यातून
माझ्या प्रेम आहे झरते
का अजूनही तिला तिचा
नकार आहे दु:ख देते

खूप वर्ष झाली आता
सार विसरायला हवे ते
समजावया हवे तिला 
की वय वेडे होते ते

तेव्हा तर तिला मी
सरळ विचारले होते
नकारातील अश्रूत तिच्या
अन प्रेम वेचले होते

नंतर पण व्रत मैत्रीचे
तरीही पाळले होते
आता ही व्रत माझ्या
मनात दृढ आहे ते

जाळला अंकुर प्रत्येक
प्रीतीची स्मृति तीही
भिती मग कसली तिला
कळेना मज अजूनही

तसे न भेटणे तिचे
स्वीकारले आहे जरी
जाणे तिचे असे परी
टोचते आहेच उरी

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...