मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

किशोर पाटोळे

किशोर पाटोळे  (निवृतिदिना निमित्त)
**"****
जांभळाचे पूर्णपणे 
पाने गळून गेलेले झाड 
कधी कोणी पाहिले आहे का ?
अर्थात कोणीच नाही.
त्याला एक वरदान आहे 
हरितपर्णाचे सदा हिरवे राहायचे

पाटोळे ना पाहिले की मला तो
हिरवागार बहलेला जांभूळ आठवतो .
गेली वीस पंचवीस वर्षे 
मी पाटोळे यांना पाहतो आहे 
पण पाटोळे आहे तसेच आहेत
काहीच फरक पडला नाही
ते तेव्हा जसे दिसायचे 
तसेच आताही दिसतात .

पाटोळे राहायचे 
आपल्या हॉस्पिटलच्या कॉटर्समध्ये 
आणि त्याच्या तळ मजलावर
आमची ए मो रूम होती .
त्यामुळे  पाटोळ्यांची व फॅमिलीची
रोजच भेट गाठ व्हायची.

या हरितपर्णी झाडाचं फुलणे बहरणे 
आणि विस्तारणे आम्ही पाहिले आहे .
त्यांचा स्वभाव सुद्धा त्या पिकलेल्या जांभळासारखा मधुर मृदू 
आणि हवाहवासा वाटणारा आहे
आणि आपली स्मृती मागे ठेवणारा .
जसा तो जांभूळ ठेवतो 
जिभेवर आणि हातावर 

नाकासमोर पाहून चालणारा 
आणि जगणारा माणूस जर 
कुणाला पाहायचा असेल तर 
मी पाटोळ्या कडे बोट दाखवीन 
हा माणूस खरच एक आदर्श पती 
पिता आणि कर्मचारी आहेत.

एक्स रे डिपार्टमेंटच्या बाबतीत म्हणाल तर 
मला तांबे आणि पाटोळे यासारखी
खूप सुंदर माणसं मिळाली इथे
त्यामुळे या डिपार्टमेंटचे टेन्शन 
सिएमो  असताना मला कधीच नव्हते
कुठले ही मशीन बंद पडले 
सीआर काम करायचा थांबला 
किंवा स्क्रू खाली पडले पाणी साठले 
A C आवाज करायला लागला . 
किंवा हालायला लागला 

तर ही गोष्ट माझ्या कानावर यायच्या अगोदर
 त्या टेक्निशियन पर्यंत पोचलेली असायची 
आणि तो टेक्निशियन कधी येणार 
काय करेल हे ही आम्हाला सांगितले जायचे .

तसे पाटोळे घरादारात व मुलाबाळात रमणारा 
आनंदाने संसार करणारा अष्टपैलू संसारी माणूस

 व त्याही पलीकडे त्यांचे 
आणखी एक व्यक्तिमत्त्व आहे 
जे मला सतत जाणवायचे 
पण कळायचे नाही पण पुढे जेव्हा  त्यांनी 
अनिरुद्ध बापूचा पंथ पत्करला 
आणि आपली श्रद्धा त्यांच्यावर ठेवून 
अध्यात्मिक मार्गक्रमण सुरू केले 
त्यावेळेला त्यांच्यातील ते 
मी शोधत असलेले वेगळेपण मला कळले .
त्यांनी आपलं संसार अतिशय नीट ठरवून 
विचारपूर्वक केलेला आहे 
त्यात मुलांचे शिक्षण असो .
कॉटर्समध्ये राहायचा निर्णय असो 
किंवा नंतर भाड्याने घर घेऊन 
जवळच राहायचा निर्णय असो .
त्यांच्या त्या निर्णयामुळे त्यांचा संसार व
नोकरीसुद्धा सोन्यासारखी झाली आहेत.

माझ्यासाठी  तर पाटोळे हाच
सोन्यासारखाच माणूस आहेत .
नम्र वागणे सौम्य बोलणे.
सगळ्या बरोबर स्नेहाचे संबंध असणे. 
सगळ्यांना सांभाळून घेणे. 
जिओ और जिने दो. 
किंवा एकमेका सहाय्य करू .
हे तत्व त्यांनी नीटसपणे सांभाळले

असे अनेक गुण त्यांच्यात आहेत.
वेळ कमी पडेल बोलता बोलता.
तर हा सोन्यासारखा माणूसाला 
आपण निवृती निरोप देत आहोत .
त्यांचे उर्वरित जीवन सुखी समाधानी आनंदी 
निरोगी जावो हीच प्रार्थना .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

नित्य निरंजन

नित्य निरंजन
***********
तन हलते अन्  मन डोलते 
दत्त नाम हळू मनी उमटते 
द्राम द्राम ध्वनीने जग भरते
वीज हृदयाच्या आत नाचते 

कडकड डमडम एक नाद 
राहे उमटत उरी पडसाद 
रंध्रारंध्रा मधून शब्द उमटतो 
दत्त दत्त हाच करीत निनाद 

माथ्यावरती गिरनार हलतो 
येई कृष्णा पूर अन् हृदयात 
रोम रोमा मध्ये फुले औदुंबर 
दिव्य दरवळ भरतो नभात 

उघडून दिठी नाही उघडत
बाप भेटतो आत कळतो 
ताप सरतो व्याप हरतो 
नित्य निरंजन आत तेवतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, २७ एप्रिल, २०२५

मागणे

मागणे
******
आकाश रक्त मागत आहे 
धरती रक्त मागत आहे 
पुसलेल्या भाळा वरचा
ठिपका रक्त मागत आहे ॥

मना मनातील आक्रोश 
पेटून तप्त होत आहे
जळो लंका रावणाची 
हेच मागणे मागत आहे ॥

व्हावा प्रहार शेवटचाच
शस्त्रही  सरसावत आहे 
बळी पडावे न निष्पाप 
हाच न्याय मागत आहे ॥

नकोच साखर पेरणी ती 
सहानभूती निरर्थ आहे 
अस्तनीतील साप सारे 
एकेक आता दिसत आहे ॥

घे नरसिंहाचे उग्र रूप ते
वाट तुझीच पाहत आहे 
उंबरठयावर देश घराच्या
कृत्य कराळ मागत आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

स्वामी समर्था

स्वामी समर्था
***********
मज बोलवा हो स्वामी
तुमच्या दिव्य गावाला 
मज दाखवा समर्था
तुमच्या भव्य रूपाला ॥
महाकाय गौरवर्ण 
अजानुबाहू प्रेमळ 
तेज सूर्याचे तरीही 
चंद्राहून ते शीतळ ॥
पाहीले जे अंतरात
डोळा दिसो एकवार 
आश्वासक तव स्वर 
अन पडो कानावर ॥
जाणतो मी हे दयाळा 
तुम्हीच माझा आधार
येवुनिया एकवार
हात ठेवा डोईवर  ॥
तुम्हाकडे भक्तीविन
मागणे ते आन नाही 
राहावा तुमचाच मी
हेच स्वप्न नित्य पाही ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

साक्षीदार


साक्षीदार
********
अनंत असतो प्रवास जीवाचा
मातीत रुजून अपार व्हायचा ॥१

नव्या रुजण्यात म्हणते जीवन
नव्या उमेदी मी आकाश होईन ॥२

घडते फुलणे घडते फळणे
कणकणात ये सजून जगणे ॥३

पण अवघ्याचा पडतो विसर 
वठणे जोवर न ये अंगावर ॥४

आकाश असते मग्न आकाशात
माती ही असते धन्य आपल्यात ॥५

काळपटावर नाटक घडते
युग साक्षीदार पान उलटते ॥६

घडते वठणे घडते जळणे 
अस्तित्वाचा अन अर्थ हरवणे ॥७

पानोपानी जरी तीच कहाणी
नाटक रंगते नवीन पात्रांनी ॥८
 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

दहशदवाद

दहशतवाद 
*********
मान्य आहे दहशतवादाला धर्म नसतो 
हेही तेवढेच सत्य आहे की
धर्मातच दहशतवाद जन्माला येतो 

तीच तीच नावे तेच तेच नारे 
तेच तेच झेंडे ते तसेच अजंडे 

असे का होते ?
जसे बीज तसेच पीक येते !
त्याला पर्याय नाही का ?

शेवटी धर्म म्हणजे तरी काय आहे 
मेंदूत घातलेले सॉफ्टवेअर आहे 
ज्याला जे सॉफ्टवेअर मिळते 
तसेच तो मेंदू ते यंत्र चालते

पण दुर्दैवाने त्या जुन्या सॉफ्टवेअरचे 
अपडेटेशन होत नाही 
ते अपडेट झाले की कदाचित 
कदाचित काही मूळ प्रश्न मिटतील ही

पण ते होत नाही
त्या सॉफ्टवेअर वर ते हक्क  ठेवणारे
ती प्रथा सातत्य ठेवणारे 
स्वार्थी मालक तथाकथित मालक 
वंशपरंपरागत मालक 
ते तसे होऊ देत नाहीत 

म्हणूनच तीच ती डिफेक्टिव 
कालबाह्य यंत्र येतच राहतात 
आणि सगळ्या जगाला 
क्लेश देतच राहतात .
अन उध्वस्त करत राहतात हे
नवे सर्जनशील सुंदर जग .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

भ्रांत

भ्रांत
***"

कुणाचे ऋण इथे कोण फेडत आहे 
सागराचे पाणी सागरात जात आहे 

निर्मिती जीवांची धरतीत होत आहे
धरतीतच अवघ्याचा अंत होत आहे 

पंच महाभूते हेच वास्तव एथ आहे 
खेळ जीवनाचा अन् होत जात आहे 

येतो प्राण देही  कुणास कळत आहे 
सोडवेना देह ही मोठी फसगत आहे 

जाणे न येणे इथून साऱ्यास ज्ञात आहे
आभास असण्याचा नसणे भ्रांत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...