सोमवार, २० मार्च, २०२३

येत नाही


येत नाही
*******

अंधारल्या दिशा साऱ्या
तरीही तू येत नाही 
ताऱ्यांचे अवगुंठण 
तुला सोडवत नाही ।।

कुठेतरी खोचलेली 
नाती काही प्रारब्धाची 
उपसला बाण तरी 
शल्य ते मिटत नाही ।।

देशील तू सांत्वना ही 
जरी मनी खात्री नाही 
हे भिक्षेचे पात्र अन
मज टाकवत नाही ।।

डोळे घनव्याकुळसे 
तरी कोसळत नाही 
साकळून वेदना हा
उरही फुटत नाही ।।

ठाऊक मला जरी हे 
क्षणाचेच गीत आहे 
साहतो हरेक ऋतु  
सवे तुझी प्रीत आहे ।।

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

रविवार, १९ मार्च, २०२३

तुझ्यासाठी

 तुला न कळते
**********
तुला न कळते तुझे असणे 
असते गाणे 
माझ्यासाठी ॥१
तुला न कळते तुझे बोलणे 
ऊर्जा उधळणे 
माझ्यासाठी ॥२
तुला न कळते तुला पाहणे 
क्षण तो जगणे 
माझ्यासाठी ॥३
तुला न कळते काय असे तू 
आषाढ ऋतू 
माझ्यासाठी ॥४
तुला न कळते तू स्वप्न जागते
सदैव असते
माझ्यासाठी ॥५
तुला न कळते किती काळ मी
उभा जीवनी
तुझ्यासाठी॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .


शनिवार, १८ मार्च, २०२३

नाव

नाव 
****
दत्ता माझी नाव 
डुगडुग करे
प्रवाहात फिरे
गरगर ॥१

माझिया नावेला 
नाही रे नावाडी
ऐल पैल थडी
सुनसान ॥२

झिरपते पाणी 
बघ फटीतून 
गेलेत बुडून
पाऊले ही ॥३

आता करू नको 
उगाच ढिलाई
त्वरे धाव घेई 
गुरुराया ॥४

येई लवकर 
नेई मज पार 
व्याकुळ अपार
जीव झाला ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

कलेवर

कलेवर
******

सुख घेई हवे तर 
दुःख देई हवे तर 
परी मज दावी दत्ता
रूप तुझे मनोहर ॥

धन घेई हवे तर 
मान घेई हवे तर 
परी मज देई दत्ता 
नाम तुझे सुखकर ॥

यश घेई हवे तर 
पाश देई हवा तर
परी जीवनात दत्ता
तुच राही निरंतर ॥

देह घेई हवे तर
गेह घेई हवे तर 
फक्त तुझ्यासाठी दत्ता
ठेवी मज धरेवर ॥

भक्ती नाही मनी तर 
तू नाही जीवनी तर 
जगु कशास मी दत्ता 
वागवू हे कलेवर ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, १६ मार्च, २०२३

पाझर

पाझर
******

तुझ्यासाठी जरी 
लिहितो मी गाणी 
काय तुझ्या कानी 
पडती का ?   ॥

तुज आळवतो 
प्रार्थना करतो
हाकारे घालतो 
पुन:पुन्हा ॥

पाझर फुटेना 
कातळ तुटेना 
मज तू भेटेना
काही केल्या ॥

हळूहळू हाका 
होतात रे क्षीण
ज्योत मिणमिण
विझू पाहे ॥

विक्रांत न मागे 
तव प्रेमाविन 
दत्त दयाघन
अन्य काही  ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १५ मार्च, २०२३

टाइमपास

 टाइमपास
*****
ते तुझे चॅट णे
जुने नि पुराने 
आज वाटतसे 
अर्थ शून्य गाणे 

ते तुझे रुसणे 
ते तुझे हसणे 
मनातील भाव 
स्मायलीत देणे 

आज ना जिवंत 
शब्द भावना ती 
रिते खुळखुळे
जणू वाजताती

सहज हातात 
आज हे आले 
प्रांगणी खणता 
खेळणे मिळाले 

शब्दात नव्हता 
काही अर्थ जरी
विचारपूस ही 
होती वरवरी

जुळणेच होते 
कुठे कुणीतरी 
अजबसे मैत्र 
असे काहीतरी

गप्पाच फुकट 
तोंड न बघता
टाईमपासच
एक खुळा होता

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, १४ मार्च, २०२३

ज्ञानदेवा

ज्ञानदेवा
*******
शब्द प्रकाशाचे 
ज्ञानदेवा तुझे 
करी जीवनाचे 
सोनें माझ्या ॥१

तुझिया प्रज्ञेचा 
प्रकाश किरण 
हृदयी झेलून 
धन्य झालो  ॥ २

अर्थाचे रुजून 
सौंदर्य चित्तात
एकरूप त्यात
बुद्धी झाली ॥३

भ्रांतीचा काळोख 
फिटून मिटून
आनंद दाटून 
मनी येई ॥ ४

विक्रांता पदाशी
घेई गा ठेवूनी
हीच विनवणी 
वारंवार ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .
 

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...