शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

जिथे दत्त



एकच ती वाट
असो पावुलात
घेवून जी जात 
दत्ताकडे 

एकच ती साथ 
हवी जीवनात 
ध्यानीमनी  फक्त 
दत्त जया 

द्वैताच्या सुखात 
भक्तीच्या प्रेमात 
राहे मी सुखात 
जेणे गुणे 

असे त्रिभुवनी 
सजून त्रिगुणी 
तोच भरो मनी 
काठोकाठ 

नको धावाधाव 

भक्तीचा बाजार 
ऐसे तयावर 
प्रेम जडो 

दत्त दत्त दत्त 

म्हणो वाणी पुन्हा 
तया पावुलांना 
आठवीत 

विक्रांता प्रिय ही 

असे पायवाट 
जिथे दत्तनाथ
सर्व काळ

डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

राधा




राधा

हसतील तुला सारे
नको तयाकडे पाहू
जग नियमांचे वेढे
नको मनावरी घेवू

प्रीत केली राधिके तू
नाकारुनी जगता या
कटू बोल शब्द त्यांचे
नको कानावरी घेवू

लाभलीस कृष्ण प्रीती
भाग्याचीच तू ग राणी
काय आले गेले हाती
तू नकोस कधी पाहू

दे धार्ष्ट तुझे सखये
आवेग मम मनाला
मी आलो शरण तुला
तू  नकोस दूर लोटू

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

दत्त भेटता भेटेना






दिन सरता सरेना
दत्त भेटता भेटेना

येते प्रार्थना ओठात
का रे ठेवीशी देहात

देहा लागली उपाधी
मन विकारांचे हाती

जन्मा मिरवतो तरी
रिक्त आशेचा घागरी

डाव संसार संपेना
वाटा मुद्दल जाईना

असे बांधले बंधना
फासे फेकता येईना

जय तुझाच सदैव
मज हरण्याची हाव

यशा चिमुट गोडस
माझा वाढवी दिवस

बस अवधूता आता
गाथा गुंडाळा स्वहाता

म्हणा येऊन कृपाळा
चल पुरे रे विक्रांता
.
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

दत्त व्यापून


दत्त व्यापून
*******

दत्त धावतो गर्दीत 
दत्त दिसतो वर्दीत 
दत्त उगाच गुर्मीत 
जाब मागे 
दत्त घुसतो डब्यात 
दत्त राही लटकत 
दत्त चाले ढकलत
दाराकडे 
दत्त सिग्नली धावतो 
दत्त भिक्षेकरी होतो 
दत्त दत्ता  धुत्कारतो 
गूढ मोठे  
दत्त दप्तरी दाखल 
दत्त वाहतोय माल 
दत्त हप्त्याचा दलाल 
रोज ठाम 
दत्त दत्ताला ओळखी 
दत्त दत्ताला नाकारी 
दत्त दत्ताची चाकरी 
करू जाणे 
दत्त विक्रांत मनात 
दत्त व्यापून जगात 
दत्त सागर थेंबात 
सामावला

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

**

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

दत्त होय गीती




दत्त होय गीती
शब्द अलवार  
भक्तीचे भांडार
सुखकारी 1

सजवून काव्य
पुरवी हवाव
मनातले भाव
चितारतो 2

स्वप्नच होवून
जाय जरतारी
साहित्य किनारी
आणी मज 3

लिहणे बोलणे
श्वासाचे चालणे
घडते जगणे
हळूवार 4

विक्रांत दत्ताचा
शब्द्चि जाहला
अभंगी रंगला
नंदमयी 5  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍



मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

भेट म्हणतो




भेट गा म्हणतो

************

सुगंध होवून
दत्त ये भरुन
सारा  दर्वळुन
आसमंत

सुवर्ण चंपक
भिणतो देहात
आस हृदयात
पालवून

दत्त पाहण्यास  
कासाविस होतो 
अधीर मी जातो 
इथे तिथे

निळ्या अवकाशी 
मन गाभार्‍यात
अस्तित्वा सकट 
सर्वत्र तो  

उणा जरी कुठे 
जरा ही नसतो
डोळा मी वांछीतो 
रूप पाहू

विक्रांत दत्ताचा
दत्ताला नमितो
भेट गा म्हणतो 
माय बापा


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

नाते अवधुती




नाते अवधुती
********

दत्त माझिया मनात
होय आनंद आकाश
कण कण उजळून
भरे सोन्याचा प्रकाश

दत्त माझिया गीतात
होय शब्द अलवार
काव्य सजल्या किनारी  
भाव भावना लहर

दत्त श्वासात हळूच
येई सुगंध होवून
दरवळून चाफ्याने  
जाते अंगण भरून 

दत्त पाहण्यास जाता   
उणा कुठे तो  नुरतो
चिंब भरून डोळ्यात
गर्द आषाढच होतो   

माझे पुसुन अस्तित्व  
दत्त पदा मी नमितो
गूढ दत्ततत्व अर्थ   
माझ्या मनी उजळतो

नाते अवधुती  माझे  
बहू जन्माचे कळतो  
ओढ अनाम उत्सुक
दर्या पुनवेचा होतो


 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...