सोमवार, ३० एप्रिल, २०१८

शिकार व भूक



भुक लागल्या शिवाय
शिकार करत नाही
वाघ सिंह लांडगे अन   
अगदी कोल्हे कुत्रेही
मग माणसालाच 
हा छंद का असावा
हिंसाचार हा मनोरंजनाचा
भाग का व्हावा
हे मला पडलेले
एक अगम्य कोडे आहे
श्वापद होवून श्वापदाचा
पाठलाग करणे
दबा धरून जीवावर
हल्ला करणे
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला
तडफडणारा प्राणी पाहून
कुठलातरी आसुरी
आनंद घेणे
हे माणसातील पशुत्वाचे
समर्थन आहे
की संवर्धन
अथवा स्वत:च्या
पशुत्व अंत:प्रेरेनेतून
काबूत न येणारे
एक अटळ वर्तन

  
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 

रविवार, २९ एप्रिल, २०१८

वय

वय !
*****

वय असते एक गणना
काळ चक्रातील आपल्या या
अस्तित्वाची मर्यादा सांगणारी
तशी ही गणना असते उपयोगी
जीवनाचे समायोजन करण्यासाठी
कारण तेवढेच असते आपल्या हाती

वय होते किंवा वाढत जाते
ही नैसर्गिक प्रक्रिया आहे .
शेवटी बालपण म्हणजे काय असते
तर पेशींची वाढ होणे
तारुण्य म्हणजे पेशींनी बहरून येणे
अन् वार्धक्य म्हणजे कार्य सरताच
स्वतः चे विलोपन करणे
तशी तर प्रत्येक जीवाची इच्छा असते
कायम अस्तित्व मान राहायची
अमरतेत वास करायची .
पण ते घडत नाही
वेळेच्या चाकाला बांधलेला देह
जातो फरफटत
वयाची गावे ओलांडत

घटन विघटनाचा हा खेळ
पाहिले की वाटते
कुणीतरी पेशींच्या या समूहाला
घट्ट जोडून ठेवू पाहतो
तर कुणी तरी त्यांना
विस्कळीत करू पाहतो
या न दिसणाऱ्या शक्तीत
मोडणारी विध्वंसक शक्ती
विजयी होताना दिसते
तिच्या यशाची पताका म्हणजे वय असते

नव सृजनाचा उ:शाप घेऊन
अन तो भोगून
संपून जातेय अस्तित्व
सरताच शक्ती स्वत:ला टिकवण्याची
अन् आपण म्हणतो त्याचे वय झाले होते

जसे माणसाचे वय होते
तसेच घरांचेही वय होते
झाडांचे पशुपक्ष्यांचेही वय होते
दिसणारी प्रत्येक गोष्ट विलय होते
एका अज्ञात अपरिहार्य शून्यात

ती विघटन करणारी शक्ती
ती रुद्र शक्ती ती शिवशक्ती
दिसते अविरत कार्यरत .
पण सहजच की बुद्धयाचच
हे कळायला मार्ग नसतो
म्हणून हाती आलेला
काळाचा हा तुकडा घेऊन
आपण जाणू इच्छितो हे रहस्य
काळाला जाणण्याचे व जिंकण्याचे
जे असते अवगुंठीत
कुण्या एका ज्ञानदेवांच्या शब्दात
कुण्या एका बुद्धाच्या संदेशात
कुण्या एका अवधुताच्या मौनात
जे पुसून टाकते
काळाची सीमा
गणनेची मर्यादा
अन् अस्तित्वाचा अंत होतो जाणिवेत
जाणीव जी असते देहातीत अन् वयातीत ...
अकाल !!


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २५ एप्रिल, २०१८

थिजलेल्या देहासवे





थिजलेल्या देहासवे
चाकोरीत जगतांना
उधळतो शब्द काही
हसू मनी पेरतांना||

मळलेला बहर तो
येतो जरी फांद्यावर
पोखरल्या खोडांचा या
जीवन घेते आधार||

दूर वर जाते वाट
घूसे दाट जंगलात
उमटल्या पावूलांना
जपे आत हृदयात ||

अजूनही शहारते
वेल स्पर्श झेलतांना
घालमेल होते उरी
कुणा निरोप देतांना ||

अदृष्याच्या गूढ हाका
काना मध्ये गुंजतात
डोहातल्या पाण्यावर
नवे जन्म उठतात ||

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in  

बुधवार, १८ एप्रिल, २०१८

थकले गाणे




थकले गाणे

माझे थकले रे गाणे
घुमघुमूनी मनात
चंद्र बहर सरला
काल सजला शब्दात ।।

दूर क्षितिजा पर्यंत
धूळ फुफाट्याचे थर
ओल हिरवी कोवळी
स्वप्न गमते उधार ।।

अश्या भाकड जन्माचे
हवे कशाला नगारे
दुमदुमतात घोष
कान ऐकती बहिरे ।।

कुण्या कृपाळ मेघाचे 
घर डोंगरात दूर
झरा कुठला लपला
मौन समाधीत चुर ।।

ठेच मरणाची भीती
पाय तरीही चालती
ओल सरल्या थैलीचे
काठ ओठी बिलगती ।।

किती मातीने गिळले
किती हवेत उडाले
देशोदेशीचे महाल
किती सजले मोडले ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

मंदिरातला देव अन. . .



मंदिरातला देव अन. . .

कोण म्हणतो देव मंदिरात असतो
अन तो खराही असतो
तुमचे पापपुण्य पाहतो
तुम्हाला बक्षिस वा शिक्षा देतो

अरे तो तर तुमच्या मनाचा
केवळ आरसा असतो
तुमच्या आशेचे प्रतिनिधित्व करतो
कधी तो कृष्ण असतो
कधी तो बुद्ध असतो
इसा कधी तो महावीर होतो

जग जळू लागले तरीही
तो उठून कधी येत नसतो
त्यांचे तुकडेही केले तरीही
तो उलटा वार करत नसतो

कारण सैतानांचा देव
जसा मातीचा असतो
तसा भाविकांचा देवही
मातीचाच असतो
मूर्ती कुठलीही असु देत
रूप कुठलेही दिसू देत
पूजा कुठलीही सजू देत
देव फक्त उपकरण असतो
आपणच केलेले
आपल्यातील
दिवत्वाच्या शोधासाठी
त्याला कधीही जोडू नका
देवळात होणाऱ्या अनाचाराशी
भ्रष्टाचाराशी अन क्रूरतेशी

तसा तर अवघा देश ...
सारे जग मंदिर आहे
तरीही होतात येथे दंगली
घडवल्या जातात कत्तली
निष्पाप अजान पापभिरू
मरतात तडफडत
कधी रक्ताच्या थारोळ्यात
तर कधी विषारी वायूत गुदमरत
प्रत्येक मृत्यू प्रत्येक अनाचार
प्रत्येक अत्याचार असतो
एक लांछन मनुष्य जातीवर
अन् त्या दिव्य मंदिरावर

कुठलाही देव मानू नकोस भाऊ
कुठल्याही मंदिरात नकोस जाऊ
पण मनुष्याच्या कृत्याचे
दोषारोपण करू नकोस
देवतांवर अन् देवळावर
त्या सुंदर प्रेममय रूपकावर
मनुष्याच्या सगळ्यात लाडक्या स्वप्नांवर
समजून घे हे सारे
कारण देव फक्त फक्त तूच आहेस
अन राक्षसही.

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

जगाला सांभाळी





जग कर्माच्या व्यापारी
सुख दु:खाच्या कपारी
चाले आपुल्याच परी
गमे जरी ||

दत्त जगाला सांभाळी   
दत्त देहाला सांभाळी  
दत्त मनाला सांभाळी  
अहोरात्र ||

दत्त भक्तांचा कैवारी
नित्य तापसांच्या दारी
दत्त दत्त क्षणभरी
स्मरताच ||

भक्ती भावाच्या अंतरी
त्याची चाले रहदारी
भाग्यवान तया स्मरी
सुकृताने ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
(कवितेसाठी कविता )


मंगळवार, १० एप्रिल, २०१८

रिटायर होता होता

रिटायर होता होता..


सांगून बघतो
बघून सांगतो
करता करता
वर्षे गेली उलटून
बरेच काही
केले तरीही
वाटते अजून
बरेच काही करायचे
गेले आहे राहून

पंचवीस तीस
वर्ष आयुष्याची
तशी मोठी असतात
तरीही कशी
बघता बघता
सहज निघून जातात

अन एक दिवस
अचानक
येते कळून
अरे रिटायर
होणार आपण
म्हणजे हेच
आणि एवढेच
का होते जीवन
अन्न वस्त्र
निवारा अन
पुढच्या पिढीचे
भरण पोषण

अस्तित्वाला आपुल्या
वर्षानुवर्षे सांभाळत
साजरे करत
तेच सण तेच उत्सव
त्याच जयंत्या
अन त्याच पुण्यतिथ्या

मग
इतके दिवस
घट्ट बंद केलेली
आपली मुठ
होते चक्क
रिकामी ओंजळ

नाही म्हणजे
काही इन्क्रीमेंट
काही प्रोमोशन
थोडा अधिकार
वेगळा कारभार
याचे सुख
नव्हतेच असे नाही
पण ते प्रवासात
येणारे पुढचे स्टेशन
माहीत असावे
तसे होते काही

स्थैर्य आश्वासकता
अन उद्याची चिंता नसणे
होते त्यात
मग आणखी
काय हवे होते ?
बुचकळ्यात
पडलेले चेहरे
पाहता पाहता
आले सहज लक्षात
अरे मला पंख हवे होते
ते नव्हते त्यात


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...