गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

नर्मदा मैया ...




नर्मदा मैया ...
पाण्याचे खळखळणारे
कुठलेही रूप, माझ्या मनात
तुझी आठवण जागवतात
मी डोळे मिटून घेतो
अन अनुभवू लागतो
तुझ्या शीतल जललहरी
जणू मला गोंजारणारे
प्रेमाने सांभाळणारे
तुझे प्रेमळ हात
तुझ्या दिव्य अथांग कुशीत
मी छोटसं बाळ होतो
अन हुंदडू लागतो
वय देश काळाची
सारी बंधन लया जातात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रेवा माई साद देई




काही नाही काही नाही
इथे माझे कुणी नाही
कासावीस जीव झाला
सारे सारे सोडू पाही

रोज रोज तेच ओझे
भार कमी होत नाही
किती मारू येरझऱ्या
त्याला काही अंत नाही

खुणावते आकाश ते
रेवा माई साद देई
उताविळ पावूलांना
धीर धरवत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

अक्कलकोटी म्हातारा





अक्कलकोटी म्हातारा
मज सोडतो न जरा
दृष्टी भेदक ठेवते
मजवरती पहारा

कुठे हरवून जाता
सदा फिरवी माघारा
मोही फसता खचता
नेई पिटाळून घरा

येता संकटांची सेना
मागे सदैव आधारा
हाक मारो न मारो
दत्त उभा सदा दारा

तया पदी वाहिला मी
माझ्या जन्माचा पसारा
तया प्रेमाचा रे ऋणी
देह कणकण सारा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

पाटी




आता शाळा सुटल्यावर
पाटी कधी फुटत नाही
पाटी काय असते खरतर
शाळेलाही माहित नाही
काळीशार गुळगुळीत
लाकडाच्या काठाची
लिहण्यासाठी पुसण्यासाठी
सदा उत्सुक असलेली
पाटीशिवाय शाळाहि
कधी असू शकते
स्वप्नातही आम्हाला
कधी वाटले नव्हते
वही मध्ये लिहिलेले  
जरी वहीमध्ये राहते
कालच्या अभ्यासाचे
पण आज ओझे होते
ओझ्याविना अभ्यास
पाटीच शिकवू शकते
अट फक्त एकच कि
ती कोरी ठेवावी लागते
कोऱ्या पाटीने त्या
अशी सवय लावली
जीवनाशी नवीकोरी
रोज भेट होवू लागली
कोरे मन ठेवायचे
सदा नवे जगायचे
शिकविले त्या पाटीने  
हे ऋण आहेत तिचे
म्हणून जेव्हा मी पाहतो
पाटी नसलेल्या शाळा
ओझी वाहणारे विद्यार्थी
मला त्यांची कीव वाटते
पाटीच्या आठवणीने
मन गहिवरून येते

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

उन्मळलेली अर्धी वेल .





दुखाचे वादळ
घेते वेटाळून
कधी अचानक
आनंदी जीवन

सुरेख सुखद 
घर विस्कटून
जाती क्षणात
नाती कोमेजून

एका विषारी
जहाल थेंबानी
कुठल्या तरी 
बेसावध क्षणी

शब्द निसटून
जातो तोंडातून
कृती काहीतरी 
घडते चुकून

एका छोट्या
छिद्रामधून 
जाते अवघे
धरण वाहून

झाड जळते
काच तडकते
वस्त्र फाटते
न येते जुळून

नंतरही पण
असते जीवन
काही कोठे
जोडून शिवून

बळेच परी ते
चिटकवलेले
उसने हसू
ओठावरले

तरीही निरंतर
आशा जागते
पहिल्या सारखे 
व्हावे वाटते

त्या आशेच्या 
ओली मधून
जीवन राहते
तग धरून

पण उन्मळली
अर्धी वेल

उघडी मुळे
पाने मलूल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

हळू हळू त्याचा प्याला


हळू हळू त्याचा प्याला
रिता रिता होत होता
हसणारा मित्र माझा
उदासीत बुडत होता 


सदा कदा धडपडणारा
जीवन रसिक कष्ट्णारा
दु:खाने आतल्या आत
हळू हळू खचत होता 


संसाराच्या नावेमध्ये
खूप पाणी भरले होते
उसळत्या प्रवाहात तो
तरी धाव घेत होता 


हळू हळू एक एक
व्यथा उलगडत होता
मी फक्त समोर होतो
स्वत:शीच बोलत होता


भरलेला गळा अन
जडावला स्वर होता
दुसरा पेग खरतर
केवळ बहाणा होता 


दु:खाचे कारण साऱ्या
नाती अपेक्षा असते
हेच मला समजावून
पुन:पुन्हा सांगत होता 


प्याल्यासवे तोही हळू 
रिता रिता होत होता
न पिणारा माझ्यातला
एक प्याला मागत होता

विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१३

एक कविता तुझ्यासाठी





एक कविता तुझ्यासाठी

मी कधी लिहिली होती

जी न कधी तुजला परि

मी दाखवली होती  

तसे कवितेत माझ्या
नवे असे काही नाही

तीच प्रीती तेच झुरणे 

कळ्या फुले देणे काही

आता या कवितेला
तसा काही अर्थ नाही

तुझ्या जगात मी अन

माझ्या जगात तू नाही

कळत नाही तरी का
हि कविता जपतोय मी

वेडेपणाला हसतोय माझ्या
का आत कुठे रडतोय मी


विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...