मंगळवार, १५ जानेवारी, २०१९

मी आहे कळतो ज्याला



मी मायेचा तो पुतळा 
जो जन्मा कधी न आला 
जणू तमाचा उमाळा 
घन अंधारी उठला

मी नटची  खेळातला 
राजा क्षणिक बनला 
डगमगत्या तख्ताला  
खरे म्हणून बसला

मी पारा काचेमधला 
जो बिंब रूप जाहला 
नसलेल्या असण्याला 
शून्यात सजवू गेला 

मी भूमी न आधाराला 
आकाश न व्यापायाला  
'"मी आहे" कळतो ज्याला
तो  डोळा जाणीवेतला 


 © डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १४ जानेवारी, २०१९

कफल्लक




कफल्लक
***********

प्राणात घुसणारे
गाणे
लिहावे म्हटले
श्वासात थिरकणारे
गीत
चावे म्हटले
शब्दांची झिंग
काही
वेगळीच असते

पण कफल्लक
दारूड्यागत
मी फिरतोय
त्या 
मयखान्यासमोर
निरुपयाचे
ओझे घेऊन

कानात इतरांचे
रित्या होणाऱ्या
प्याल्याचे
खणखणाट ऐकत
अन माझ्या 
दोन्ही खिशात
भरलेल्या नाण्यांचा
केविलवाणा
खुळखुळाट चाचपडत
   
 © डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, १३ जानेवारी, २०१९

तुझ्यातले माझे पण




तुझ्यातले माझे पण
***************
तुझ्यातले माझे पण
तुजला कळत नाही
परागांचे येणे जाणे
सुमन जाणत नाही
दिखाव्याचे शब्द नाही
नाही तर्क काढलेला
जगण्याने जाणलेला
अर्थ मनी उमटला
हासताच हासू तुझे
माझ्या ओठांवर येते
रडता तू अश्रू तुझे
गालावरी ओघळते
काय सांगू सखी तुला
तू माझी कोण आहे
श्वासातील लय माझा
व्यापलेला प्राण आहे
जगण्याला खोलवर
जपणारी भूमी आहे
आसमंती झेपवण्या
देणारी तू उर्मी आहे
© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

हनुमान



हनुमान
*****
हनुमान तिथे रामनाम
अन नाम तिथे श्रीराम ||
हनुमान तिथे जयघोष
हरतात कलीचे दोष ||
समर्पण तिथे हनुमंत
ज्ञान भक्ती मूर्तीमंत ||
स्मरा सदैव रे हनुमंत
राम अवतरेल हृदयात ||
सदैव सोबत वायूसुत
करतो रक्षण संकटात ||
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९

अंकुरल्या बीजा दत्ता





अंकुरल्या बीजा दत्ता
मातीचा आधार देई
हिरव्या स्वप्नास दत्ता
सत्याचा आकार देई

घेणे देणे सारे तुझे
मागतो मीगा जरी
इवलाले बोल काही
झुलू दे रे पानावरी

येतील ती फूल काही
वाहिल रे तु पायीं
तुझे सारे तुझ्यासाठी
वाहण्याचे सुख देई

अनसूया नंदना रे
माझे बोल कानी घेई
पालट रे दुःख लेख
लिहिलेले भालावरी

तापलेल्या उन्हामध्ये
सावलीचा हात धरी
धुमाकूळ वादळात
आधाराचे छत्र होई

देणे तुझे सारे जरी
मज मान्य आहे देवा
तुझ्याविना मागू कुणा 
विक्रांता या पदी ठेवा


 © डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

तुझ्या पाखरांचे थवे




तुझ्या पाखरांचे थवे 
माझ्या गावी नाही आले 
नभ मेघाविन माझे 
चोचा पाणी न राहिले 

कैसे बोलावू तयाला 
काय खाऊ पिऊ घालू
माझी रिकामी कणगी
खोटे किती काय बोलू 

सांग तुझिया पाखरा 
व्यर्थ सोस माझा केला 
जीव लावून दुःखाला 
जन्म विरही वेचला 

त्यांच्या रुपेरी पंखांचे 
वेड होतेच मजला 
मधु गायन कानात 
जीव होता वेडावला 

सुन्या माळाचा आकांत 
आता उरे जीवनात 
स्वप्न ऋतूचे जळले 
काही अजून मनात

© -डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
 कवितेसाठी कविता ब्लॉगस्पॉट. डॉट. इन


बुधवार, ९ जानेवारी, २०१९

सापड रे !!



सापड रे!!

 त्याच त्याच जीवनाची
तीच तीच बाराखडी
त्याच त्याच रुळावर
धावे तीच रेलगाडी

तोच तोच शब्द अन्
तोच तोच भाव खेळ
त्याच त्याच संवेदना
तोच भैय्या तीच भेळ

तेच पोट भरणारे
बससाठी धावणारे
उलटते पान आणि
कळे वर्ष सरणारे

चाकोरीचा  बंदीवास
ओळखीचा "माझा" भास
नाव गाव जपलेले
म्हणतो अस्तित्व त्यास

सोडविता शोधतांना
शोधणेच झाली वाट
सापड रे कुणा म्हणू
डोळ्यावरी माझा हात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...