मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

शाळा (बालगीत)



शाळा

रेखीव आखीव
असे माझी शाळा
नीटस नेटका
प्रत्येक फळा ||

शाळेतील माझ्या
गुरुजन ज्ञानी
रमतो आम्ही
विद्येच्या अंगणी ||

देतात आम्हास
सुंदर संस्कार
भावी जीवनास
उद्याच्या आधार ||

सांगतात मंत्र
यशाचे पक्के
घडवती तंत्र
उतुंग नेमके  ||

शाळेविना न मी
कुणीच काही
शाळाच माझी
दुसरी आई ||

धन्य जाहलो
तुजला भेटलो
शाळा अशी ही 
भाग्ये लाभलो ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

सरता सरता ऋतू


सरता सरता ऋतू ।


सरता सरता ॠतु  वृक्ष कधी बहरून येतो
तीच जुनी अभिलाषा पुन्हा उरि घेऊन येतो

पान पान नवे हिरवे कच्च असा फुलून येतो
डिरी डिरीवर मोहरांची आरास लेवून येतो

देहावरी उन्हाचे जरी चटके मिरवित असतो
भग्न जुन्या फांद्यांना अन् स्वीकारत असतो

वृद्ध जुनाट मुळातून रस शोषून घेत असतो
जीवनाला पुन्हा एक आलिंगन देऊ पाहतो

आणि तरीही शेवटी फुलोरा तो गळून पडतो
फळाविना शेवटचा गंध त्याचा हरवून जातो

का न कळे नशिबी काही क्षणांचे सुख असते
मोहरून जन्म पुन्हा धुळीचेच का गाणे होते

म्हणून म्हणती शहाणे आशेच्या या घराला
नसे भिंतीं न छत न मिळे आधार कुणाला


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

दत्ते नादावले



दत्ते नादावले
वाया घालवले
ईह दुरावले
वेडेपणी

गोळा करी पदे
शोधून शोधून
प्रेमाने गायन
मग करी

भिकेची ती झोळी  
प्रिय वाटे भारी
वस्त्र दिगंबरी
घ्यावे  वाटे

देहा लागो राख
मन सोडो लाग
दत्तात्रेय राग
प्रिय जीवा

सुटो नाव गाव
हटो धन मान
नित्य निरंजन  
कळो वाटे

विक्रांत फसला
जगास वाटला  
उलटा फिरला
कृपाफळे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http;//kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

*बालगणेश *




*बालगणेश *

मंदाराच्या बुंध्यावर
कोण बाई बसला ग
गणपती पार्वतीचा
सांगा कुणा दिसला ग

गोल मोठे पोट तरी
पोर किती चपळ ग
मोदकाची पुरचुंडी
घेऊनिया चढला ग

सोबतीला इटुकला
मूषकराज आला ग
गुळखोबरे खावूनी
सेवेलागी सजला ग

पाय हालवी जोराने
वृक्ष दुमदुमला ग
वारा घालीत कानाने
करितो दाणादाण ग

गज ध्वनी करुनिया
मित्रा करी व्याकूळ ग
उतरुनी तया मग
भरवी गोड खाऊ ग

हसूनिया पार्वती त्या  
घेई प्रेमे जवळ ग
कौतुकाने देखे देव
आनंदाचा सुकाळ ग


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http;//kavitesathikavita.blogspot.in



सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

देह पसारा



मातीच्या देहाला जपावे किती
मातीस मिळणे मातीला अंती

चार पाच सहा दशके जीणे
इथले गणित सदैव उणे

आधि व्याधि कधी प्रारब्ध आड
वाढते आणिक मरते झाड

जग रे मानसा मरेस्तोवर
नाव गाव टिंब नसे नंतर

विक्रांत सोड रे व्यर्थ पसारा
आता तरी आत फिरे माघारा 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

माघारी




तू सांगू नकोस काही
तू पाहू नकोस काही
मौन असण्यात तुझ्या
गीत उमलून येई

वळे बाजूस दुसऱ्या
देत केसास झटका
शब्द ठरले तरीही
मौन थबकून ओठा

असे तुटक वागणे
लांब लांबच राहणे
तुज जमतात कसे
हे जीवघेणे बहाणे

चार दिसांची भरती
चार दिसांची ओहटी
म्हणू नकोस असते
हीच जगाची रहाटी

मन उताविळ जरी
सीमा बांधल्या सागरी
घालमेलीच्या वादळी
लाटा जातात माघारी

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

दारावरी कुणाच्या.



दारात कुणाच्या.


दारावरी कुणाच्या मी
अजूनी भिकारी आहे
कणभर दानासाठी
हि किती लाचारी आहे ॥
अन तो दाता उदासिन
फिरतो माघारी आहे
रिती झोळी हेच माझे
भाग्य भाळावर आहे ॥
दरवळे गंध कुठे
हास्य भरजरी आहे
निर्लज्जशी आशा माझी
सदोदित दारी आहे .॥
मरुनियां मन गेले
तरी ओझे शिरी आहे
अभिमान ठेचलेला
कण्हतोय उरी आहे ॥
द्यायचे नसून तुज
होय ओठावरी आहे
का भिती यायची  तुज
सांग रस्त्यांवरी आहे ॥


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे (कवितेसाठी कविता)

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...