शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०१६

पोर गोरटी


 

पोर गोरटी 
चित्त चोरटी 
गोड कलिका 
मुग्ध हासती । 
कोण कुणाची 
स्वप्न परांची 
राणी गुलाब 
जणू देशाची   
हासताच तू 
मी न उरलो 
बालपणीचा 
गंध जाहलो । 
तरुवेली या 
तुझ्या सोबती 
जीवन रंगी 
नव्या खुलती । 
हरित तृणे 
लाख करांनी  
तुज भेटती 
वाटा सजती   
ऋषी कन्या वा 
फुलराणी तू 
लेक लाडकी 
ती माझीच तू । 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in



 

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

माझ्या नोटा तुला घेई



माझ्या नोटा तुला घेई
तुझ्या नोटा मला देई ||
काल फुगलेला खिसा
आज रद्दीवाला होई
लांब लागलेल्या रांगा
नंबर लागत नाही ||
झाला तर होऊ देत
तोटा मला वांधा नाही
काळा गोरा होण्यासाठी
समजकी ही फि भाई ||
कसे कुठे कमावले
कश्यासाठी चौकशी ही
बोलावून गँग तुझी   
गंगेत न्हावून घेई ||
ज्याच्या त्याच्या कडे आहे
जो तो म्हणे नाही नाही
राज्याच्या घरात काय
तिजोरी ती मुळी नाही ||
अडचण आहे खरी
आज उद्या सरेल ही
नोटा बदलून साऱ्या
वृत्ती बदलेल का ही ||
खरतर प्रश्न तसा
पैशाचा मुळी नाही
नोटा नसता खिशात   
चैन मनास नाही  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

दत्तव्यापी







दत्त गाण्यात बोलतो
दत्त पाण्यात वाहतो
दत्त कानात सांगतो
गुज त्याचे ||१ ||
दत्त आकाश मोकळे
दत्त आभाळ सावळे
दत्त सोनेरी कोवळे
सूर्यबिंब ||२||
दत्त मूर्तीत सजला
दत्त विश्वात भरला
दत्त भक्तास दिसला
अंतर्बाह्य ||३||
दत्त जीवन विराट  
दत्त सूक्ष्मातली वाट
दत्त उदेली पहाट
उन्मेषाची ||४ ||
दत्त हृदयाची गती
दत्त श्वास पुकारती
दत्त म्हणू किती किती
तृप्ती ये ना ||५ ||
दत्त भजिला जगात
दत्त पाहिला मनात
दत्त तत्व स्वरुपात
विक्रांतच्या ||६ ||

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...