शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

चितेच्या भस्मात







भ्रमाचा भोवरा | संसार हा सारा |
धनमान दारा | फास गळा ||
रुतु दे मनात | शब्दांचे हे बाण |
कृपेचे प्रमाण | देई देवा ||
अहा अपमान | वाटे किती छान |
अहंचे निधान | लुटू जावे ||
माया सखे बाई | तुटो तुझा चुडा |
उलथो करंडा | कुंकुवाचा ||
मरावा विक्रांत | जावो सरणात |
चितेच्या भस्मात | महाकाळी ||

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

माझा हा निरोप







माझा हा निरोप | द्या माझ्या देवास |
धरुनी देहास |आहे इथे ||१ ||
यावी आठवण | दीनाची दयाळा |
लाभावी जीवाला | कृपा दृष्टी  ||२ ||
भाग्ये अंकुरावे | देहाचे या बीज |
जन्मा आलो काज| काही व्हावे ||३ ||
अंगी नाही बळ | जगणे लाचार |
परी पदावर | थारा द्यावा ||४ ||
भक्त कैवारी तू |प्रभू गिरनारी |
विक्रांतास दूरी | ठेवू नको ||५ ||


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने 
https://kavitesathikavita.blogspot.in




शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

माझे शोधणे मजला भेटले








लागली आग त्या शब्दांनी माय
वाचण्याचे नि सरले उपाय
आता मी लपवू कुठे स्वत:ला
साऱ्या शून्याचा सुटला गुंडाळा
धावतो अहं जरी कासावीस
जमीन उरली नाही पायास
वाजती चाबूक वळ न उमटे
मिटताच डोळे लख्ख दिसते
पेटे जाणीव अंगण भरते
माझे मीपण मलाच पुसते
शोधता काही हरवून गेले
माझे शोधणे मजला कळले

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने









शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

मी उंचावर




मी उंचावर
मुकुट शिरावर
परी एकटा ।
..
कुणा क्वचित
हे मिळते वांछित
परी शापित ।
...  

अरे उठू दे
ते गीत मनातून
माझ्यावाचून ।
.....

तीच तहान
रे जन्मांतरीची
कृष्ण घनाची ।
.....

व्याकुळ आस
कधी कळेल त्यास
निशब्द टोहो ।
.....

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
https://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...