बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

सुखस्वप्ने सावजाची.... |





प्रतिक्षेच्या अंधारात
प्राण माझे थकले रे
वाट तुझी पाहतांना  
श्वास सारे संपले रे  

सारी रात्र या इथे मी  
नाही तुझा पदरव
भरूनि फक्त राहिले
निष्प्राण गूढ निरव

सारे भास चांदण्याचे
अश्रूत होती काजळ
ओघळून गेला व्यर्थ    
जीवनाचा या ओघळ

उभी मी इथे कधीची  
ठाव तुज असेल का
एक उल्का जळणारी
काय तुज कळेल का

पुन:पुन्हा यातना ही
होऊ दे रे या मनाला
अज्ञानवश जरी का
मोह स्पर्शे विखाराला

जळू देत रात्र सारी
काहिली होत जीवाची 
आज नीज येवू नये
सुखस्वप्ने सावजाची 

विक्रांत प्रभाकर तिकोणे




  

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

|| अक्कलकोट ||







चालली आरती
सळसळे वट
कृपेचा वर्षाव
देवाच्या दारात  
काय हवे तुज
विचारते ज्योत
मागता येईना
विसरलो खंत
मागितले प्रेम
तयाच्या नामाचे
ज्ञान भक्ती अन
वैराग्य ते साचे
फुटावे अंकूर
बुद्धीला भाग्याचे
पानांतून यावे
आशिष प्रेमाचे
आणि काय हवे
ओढाळ मनाला
परत बोलावी
तुझिया पदाला

विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

मरता आले जर कधी






मरता आले जर कधी
खरे मरण ते येण्याआधी
जगण्याची कला कळून
सुटून जाईल जन्मव्याधी


कसे मरावे लाख उपाय
हात मध्ये एकही नाही
या मरणाचे भय असे का
ते ही सांगता येत नाही


मरो जोगी मरण मिठा है
गोरख बाबा सांगून गेला
गोड त्या मरणाचा पण
रस्ता कुणासच मिळाला   


इकडे तिकडे उगाच भटकत  
जन्म असे का मी ढकलत
कळल्यावाचून जणू निद्रेत 
रोज स्वत:ला आहे लोटत


खरच हवी आहे का सुटका
शंका मरता येईल का ही
जीवनाचा लोभ असा की
अजून हातचे सुटत नाही


विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...