सोमवार, १३ जुलै, २०१५

खेळ..






जितुके मी
जवळ यावे     
तितुके तू  
दूर जावे  

का रे असे  
खेळ खेळशी 
आणि कुठवर
मजला छळशी 

इथे धाडसी  
तिथे पाडसी
प्राण कंठात
उगा आणसी   

असा सदा मी
तुज बोलावतो
व्याकूळ होत
साद घालतो

तुजला नाही 
भान कश्याचे
नाट्य सदा 
का दुराव्याचे

आता खेळ   
असा डाव  
तुच भोज्या
तुच धाव  

तुच शोध   
तुझा तुला   
रे माझ्या  
या मनातला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १२ जुलै, २०१५

नकार नाही होकार नाही..





मला डोळे कळतात
प्रत्येकाच्या मनातील
भावही उमजतात
असे मी समजायचो
अन हे सारे सगळ्यांना
छातीठोक सांगायचो
पण ती भेटे पर्यंतच
कारण नंतर मग..
कशाचे काय नि कशाचे काय
मला डोंबलाचे तिचेच काय
कुणाचेच मन कळत नाही
हे अगदी स्पष्ट झाले


का ती भेटल्यापासून
माझे मनच बदलले
कळण्या न कळण्याच्या
अगदी पलीकडे गेले
कुणास ठावूक पण
ही शक्यताही अगदीच
नाकरता येत नाही .

आपलेपणानं ओथंबून
चमकणारे डोळे
मनावर प्रेमाची सावली
धरणारे डोळे
क्षणोक्षणी अस्तित्व जाणवून
देणारे डोळे
जाता जाता निमिषभर
थबकणारे डोळे
डोळ्यात डोळे मिसळता
उजळणारे डोळे

कीती शोधले पण
कधी दिसलेच नाही
बरे नाहीतर नाही
निदान दिसावेत म्हटले

सदा नाकारणारे थंड
निर्विकार डोळे
पाहूनही न पाहता दूर
वळणारे डोळे
परकेपणाची सीमारेखेत
जखडलेले डोळे
अहंकाराचा फणा ठाम
ठेचणारे डोळे
वा निकाल लावून नीप
तोडणारे डोळे
पण तसेही कधी काही
दिसले नाही मला

ते डोळे भेटायचे रोज
सुप्रभात म्हणत
बोलायचे हसायचे अगदी
फॉर्मल वागत
नकार नाही होकार नाही
आणि पाणी केवळ
राहायचे डूचमळत

वारे आले नाही
बोट हलली नाही
वादळ आले नाही
बोट बुडाली नाही
अश्याच एका दिवसानंतर
ती सुद्धा कधीच आली नाही
मला डोळे कळतात असे मग
मी कधीच म्हटले नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, १० जुलै, २०१५

माझा डोळा तुझ्यावर






माझा डोळा तुझ्यावर
तुझा डोळा दत्तूवर
दत्तू मरे पुष्पावर
पुष्पा काळ्या रघुवर

रघु लतापायी वेडा
लता माझ्या मागावर 
असे कसे विचित्रसे
चाले प्रीतीचे हे चक्र

आणि मग कधीतरी
कुठल्याश्या दगडावर
गाडी कोलमडणार  
सारे जग हसणार

मन का आसक्त होते
दूरच्याच चंद्रावर
मना का हवे असते
सुख उसने उधार

कुणासाठी वेडे असे
कालचे स्वप्न लाचार
रोज बसे रोज उठे
शोध सुखाचा बाजार

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...