शनिवार, ३० मे, २०१५

तूच शिकवले






तूच शिकवले
सखी मजला
हरवून असे
प्रेम करायला

या मनातील
गंध फुलांची
वर्षा तुजवर
सदा करायला

तुझ्यामुळे मी
चंद्र झालो
अन विरहाचा
अर्थ उमगलो

झुरता झुरता
पुन्हा एकदा
अवघे आभाळ
दाटून आलो

दूर दूरवर तू
किती विरक्त
जाणून मजला
रिक्त तटस्थ

अन सदैव
तुझी सावली
होवून फिरे
मी सभोवताली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २९ मे, २०१५

भेट झाली नाही






इथे भेट झाली नाही
तिथे भेटशील याची
मुळी सुद्धा खात्री नाही 
पण शोधणे प्रारब्ध   

माझ्या मनातील मूर्ती
खंडित होते शतदा
अन नव्या मूर्तीसाठी
हे मन धावते पुन्हा

संगमरवरी छान
कधी पाषाण काळी
मनाचा मोह करतो
सदैव तुझी आरती

खंडित कधी त्यजली
धरतो मी हृदयाशी
अप्राप्त कधी मंदिरी
भजतो भाव भक्तीनी

जन्म साधना झाले हे
जळे व्याकूळ अंतरी
अतृप्त अप्राप्य का रे
सुख कल्पना जगाची

ते कळणे ते झुरणे
सारेच वृथा का होते
चिंब कोसळून वर्षा  
पिक करपून गेले

जरी जाणतो इथल्या
साऱ्याच रीतीभाती मी
दोन दिसाची जिंदगी
अन प्रेम व्यवहारी

बघ चालतो पुन्हा मी
रे त्याच व्यर्थ शोधाला
पडेल विसर जगा
खेळ चाले मरणाचा

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २८ मे, २०१५

काय मी काय तू



मनात तू प्राणात तू
गंध होवून श्वासात तू
स्पर्श होवून देहात तू
तरीही किती दूर तू

कणोकणी उन्मादले
सर्वव्यापी वादळ तू  
कोरूनी बाहुल्यात
साठवली मूर्त तू

जागेपणी सवे माझ्या
स्वप्नातही तूच तू
भास आभास सर्व हे
जीवनाचे पदरव तू

दारात असे दार तरी
सापडत नाहीस तू
असे बंदी पावुलात
काय मी अन काय तू

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



बुधवार, २७ मे, २०१५

कोंबडी ..





मरणाऱ्या कोंबडीचा आक्रोश
कधीच रश्यात उतरत नाही
अन तिची शेवटची तडफड
तवंग जराही हलवत नाही  

वजनावर आडवी ठेवे कसाई  
कधीच जीव म्हणून बघत नाही
अन मिनटात निष्प्राण होते
तरी कधीच काही वाटत नाही

मसाल्यातील मांसाच्या दरवळीने
भाकरी होईस्तो धीर धरवत नाही
तोच रानटी आदिम शिकारी
अजून मनातून हटत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...